कलादिग्दर्शक स्व. नितीन देसाई यांच्यासोबत काम केलेली आणि ‘पानिपत’, ‘मणिकर्णिका’, ‘इंदुसरकार’, ‘फर्जंद’ या चित्रपटांसाठी साहाय्यक कलादिग्दर्शन म्हणून काम केलेल्या गायिका मुग्धा कुलकर्णींचा मंत्र‘मुग्ध’ करणारा प्रवास!
कलासंपन्न घराण्यात जन्म घेतलेली मुग्धा सुधीर कुलकर्णी नाशिकची. आई शास्त्रीय गायिका आणि वडील चित्रकार आणि पत्रकार. तिचे आजोळही कलासक्त. तिची आजी गौरी-गणपती उत्सवात सुरेख आरास, नेपथ्य सजवत. अशा कलासंपन्न वातावरणात मुग्धाला कलेची आवड असणे स्वाभाविकच. शालेय जीवनात आईकडून संगीताचे धडे गिरवणारी मुग्धा महाविद्यालयीन जीवनात चित्रपटातील भव्य राजवाडे, वाडे, किल्ले, सेट पाहून भारावून जात. भव्य सेट्स निर्मितीचे तिला अप्रुप वाटे. कलाक्षेत्रात करिअर करत वेगळी ओळख निर्माण करण्याची खुणगाठ तिने मनाशी बांधली. मालिका, चित्रपटातील सेट्सबद्दल तिचा रस वाढतच गेला. शास्त्रीय गायिका आई विद्या कुलकर्णींकडून प्रथम शास्त्रीय संगीताचे धडे गिरवताना छ. संभाजीनगर येथील अमित ओक यांच्याकडे सुगम गायिकाचे धडे तिने गिरवले.
बारावीनंतर करिअरचा पर्याय निवडण्याची वेळ आली, तेव्हा मुग्धाने ललित कलेचाच भाग असलेल्या ‘आर्ट डिझायनिंग’चे क्षेत्र निवडले. ‘मविप्र’च्या ‘एनडीएनव्हीपी‘ महाविद्यालयात ‘बॅचरल इन सेट डिझाईन’ शिक्षणक्रम तिने यशस्वीरित्या पूर्ण केला. शिक्षण संपताच प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकात देसाई यांच्याकडे काम करावे, असेही तिने ठरवले होतेच. तशी संधीही तिला चालून आली. नितीन देसाई यांच्या ‘एनडी स्टुडिओ’मध्ये साहाय्यक म्हणून ती कामे साकारू लागली. 2015 ते 2018 पर्यंत मुग्धाने नितीन देसाई यांच्यासोबत कामात नैपुण्य मिळवले. महेश कोठारे यांच्या ‘अहिल्याबाई होळकर’ मालिकेसाठी तिने देसाई यांच्याकडे साहाय्यक कलादिग्दर्शक म्हणून उत्तम काम केले. त्यानंतर दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा ‘पानिपत’, कंगणा राणावतचा ‘मणिकर्णिका’, मधुर भांडारकरच्या ’इंदुसरकार’, दिग्पाल लांजेकर यांच्या ‘फर्जद‘ अशा चित्रपटांसाठी साहाय्यक कलादिग्दर्शक म्हणून आलेख उंचावत ठेवला.
“नितीन देसाई (दादा) हे माझे गुरू, त्यांच्याशी माझे नाते मुलगी-वडील असेच होते. कलादिग्दर्शनाचे प्रत्यक्ष धडे वडीलकीच्या नात्याने त्यांनीच दिले.” असे मुग्धा सांगते. “दादा जितके उत्तमपणे शिकवत. ते अत्यंत शिस्तप्रिय, तितकेच ’डाऊन टू अर्थ. अनेक वेळा त्यांनी मला रागावले; पण सेट उभारणीच्या बारीकसारीक बाबीही ते समजावून सांगत, सर्वोत्तम कामासाठी उपयुक्त टिप्सही ते देत,” असेही ती नमूद करते.‘कोविड’ नंतर मुग्धाने कला दिग्दर्शक म्हणून स्वतंत्रपणे काही अॅड फिल्मस्, म्युझिक व्हिडिओ आणि वेबसीरिज पूर्ण केल्या. सुभाष घई यांच्या ‘विजेता‘ फिल्मसाठी तिने सुनील निगवेकर यांच्यासोबत साहाय्यक कलादिग्दर्शक म्हणून काम केले.
“एखादा सेट केल्यानंतर तो ‘डिसमेंटल’ होताना अत्यंत वेदना होतात. आम्ही फिल्मच्या फ्रेममध्ये दिसणारे नेपथ्य प्रचंड अभ्यासाने सहा-सहा महिने काम करून उभारतो. त्यामध्ये अनेकांची कला, सर्जनशीलता, अभिनवता पणाला लागते. ते टिमवर्क ‘डिसमेंटल’ होत असताना स्वतःचे बांधलेले घर ’डिमॉलिश’ करण्यासारखी ’फिलिंग ’असतेे,” असे मुग्धा सांगते.मुग्धाला ग्लॅमरची अजिबात ‘के्रझ’ नाही. संगीत, गाणे करताना ‘सेट डिझायनिंग’ आणि संगीत यांचे संतुलन करत ती काम करतेे. ती आज वेबसीरिज, जाहिराती करत आहेत. एका वेबसीरिजवर तिचे काम सुरू आहे. शतकांची परंपरा असलेल्या नाशिकच्या ‘वसंत व्याख्यानमाले’त तिने संत मीराबाईंच्या प्रेमरंगातील भक्ती काव्यावर आधारित ‘रंगराची’ हे सादरीकरण खूप गाजले. तिने काही गाणी स्वतः कंपोझ केली आहेत. ग्लॅमरच्या जगात राहिल्यामुळे तिला ‘लाईमलाईट’मध्ये राहणे मुळीच पसंत नाही. भारंभार कामे घेऊन ती उरकण्यापेक्षा ’क्वालिटी’ कामे करण्यावर तिचा भर असतो.
अनेक वर्षं चित्रपटसृष्टीतील चकचकीत कामे करणारी मुग्धा प्रत्यक्षात मात्र ’लाईमलाईट’ आणि झगमगाटी दुनियेपासून अत्यंत दूर आहे. तिला प्रसिद्धी, ग्लॅमर मुळीच आवडत नाही. कारण, चकचकीत दुनियेतील धोके तिने जवळून पाहिले आहे.येत्या काळात संत साहित्यावर आधारित रचनांवर गाणी, संगीत करण्याचा तिचा मानस आहे. या कलाप्रवासात आई विद्या कुलकर्णी वडील सुधीर कुलकर्णी आजी आणि आजोबा (आईकडील आणि वडिलांकडील) यांचे योगदान मोठे आहे, हे सांगण्यासदेखील ती कदापि विसरत नाही. त्यांच्यानंतर नितीन देसाई हे माझे गुरू आहे, असेही ती नमूद करते.
कलादिग्दर्शन की संगीत, असे विचारातच मुग्धा सांगते की, “कलादिग्दर्शनात माझ्या संगीताचा सूर, लय कामी येतो, तर संगीतात आर्ट डिझायनिंगचा ’व्हिज्युअल’ दृष्टिकोन कामी येते. संगीत क्षेत्रात गायिका म्हणून सर्जनशीलपणे वेगळे काही द्यायचे आहे, तर कलादिग्दर्शन क्षेत्रात चार लोकांपेक्षा अभिनव, युनिक सर्वोत्तम कलाकृती साकारायची. कला सर्वात असतेच.”कलादिग्दर्शक म्हणून सर्जनशील, अभिनव आव्हानात्मक ’व्हिज्युअल’ सेट उभारता येईल, अशा उत्तम कथांंची ती वाट पाहत आहे. संगीतातून नवीन वेगळं काही देण्याचे तिचे स्वप्न आहे, या स्वप्नांसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून कलादिग्दर्शक, गायिका मुग्धा कुलकर्णी यांना अगणित शुभेच्छा...!