अविश्वास प्रस्तावावर चर्चेची तारीख ठरली; 'या' दिवशी असणार मोदींचे भाषण
01-Aug-2023
Total Views |
नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव स्वीकारला आहे. विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर ८ ते १० ऑगस्ट दरम्यान लोकसभेत चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १० ऑगस्ट रोजी अविश्वास प्रस्तावावर उत्तर देणार आहेत.
विरोधकांच्या वतीने काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी अविश्वास ठराव मांडला होता. विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की त्यांना माहित आहे की मोदी सरकारला विश्वासदर्शक ठरावात पराभूत करण्यासाठी त्यांच्याकडे बहुमत नाही, परंतु मणिपूर हिंसाचारावर सरकारला प्रश्न विचारण्याची ही शेवटची संधी आहे.
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होताच विरोधी पक्षांनी मणिपूर हिंसाचारावर चर्चा करण्याची मागणी केली होती. मात्र सरकार चर्चेला तयार असतांनाही विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः येऊन उत्तर द्यावे, अशी मागणी विरोधक करत होते.
तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, अविश्वास प्रस्ताव सभागृहात येण्याच्या आधीच विरोधी पक्षांमध्ये फुट पडली आहे. एक प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या वायएसआर काँग्रेसने अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात मतदान करणार असल्याचं जाहीर केले आहे.