अमेरिकेत भारतीयांची नेतागिरी!

    01-Aug-2023   
Total Views |
Indian-American engineer Hirsh Vardhan Singh enters US Presidential race

भारतात होणार्‍या निवडणुकांकडे ज्याप्रमाणे सर्वांचे लक्ष लागलेले असते, अगदी त्याचप्रमाणे हल्ली भारताबाहेर होणार्‍या इतर राष्ट्रांच्या निवडणुकांकडेही भारतीयांचे लक्ष लागू लागले आहे. त्यात अमेरिकासारखे राष्ट्र असेल तर अधिकच! अमेरिकेत पुढील वर्षी राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुका होतील. या निवडणुकीच्या रिंगणात एका भारतीय वंशाच्या व्यक्तीने उडी मारली आहे. मूळ भारतीय-अमेरिकन अभियंता असलेले राजकारणी हर्षवर्धन सिंग यांनी शुक्रवार, दि. २८ जुलै रोजी ही घोषणा केली.

त्याचबरोबर त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारीच्या स्पर्धेत उतरण्याची घोषणाही केली. दक्षिण कॅरोलिनाच्या माजी गव्हर्नर निक्की हेली आणि उद्योगपती विवेक रामास्वामी या भारतीय वंशाच्या मंडळींनीसुद्धा आगामी निवडणुकांसाठी आपल्या नावांची घोषणा केली आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुकीत उतरणारे हर्षवर्धन हे तिसरे भारतीय-अमेरिकन व्यक्ती ठरले आहेत.

हर्षवर्धन सिंग हे मुळात भारतीय. त्यांनी २००९ मध्ये ‘न्यू-जर्सी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’मधून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. हर्षवर्धन हे व्यावसायिकदृष्ट्या अभियंता. ३८ वर्षांच्या हर्षवर्धनना नेहमीच राजकारणात रस होता. पहिल्यांदा राज्यपालपदाचे उमेदवार म्हणून त्यांनी २०१७ मध्ये न्यूजर्सीच्या राजकारणात प्रवेश केला. केवळ ९.८ टक्के मते मिळवून त्यांना या शर्यतीत तिसर्‍या स्थानावरच समाधान मानावे लागले. २००३ मध्ये ‘अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅरोनॉटिक्स अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रोनॉटिक्स’कडून त्यांना ‘एव्हिएशन अ‍ॅम्बेसेडर’ म्हणून सन्मानित करण्यात आले.

हर्षवर्धन हे स्वतःची ओळख ‘रिपब्लिकन’ म्हणूनच करतात. २०१७ मध्ये त्यांनी न्यूजर्सीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कन्झर्व्हेटिव्हविंगची पुनर्उभारणी करण्यात मदत केली होती. राष्ट्राध्यक्षपदासाठी शर्यतीत असणार्‍या प्रतिस्पर्धींवर निशाणा साधत त्यांनी आपण ’प्युअरब्लड कॅन्डिडेट’ म्हणजे ’आपणच खरे उमेदवार आहोत,’ असे त्यांनी म्हटले. ते म्हणतात की, ’‘कोरोनाच्या काळात त्यांनी कधी हार मानली नाही, तर नेहमीच अमेरिकन लोकांच्या हितासाठी काम केले. गेल्या काही वर्षांत झालेले बदल दुरूस्त करण्यासाठी आणि अमेरिकन मूल्ये पुनर्संचयित करण्यासाठी एका भक्कम आणि मजबूत अशा नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे २०२४च्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी रिंगणात उतरत आहे.” अमेरिकेतील एका नामांकित वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, हर्षवर्धन यांनी अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज गुरुवारी फेडरल निवडणूक आयोगाकडे दाखल केला.

हर्षवर्धन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेत उतरण्याची घोषणा केली असली, तरी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, न्यूजर्सीचे माजी गव्हर्नर क्रिस क्रिस्टी, फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डीसँटिस, माजी उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स, माजी परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ, विवेक रामास्वामी, निक्की हेली, सिनेटर टिम स्कॉट आणि उद्योजक रायन बिंकले आदी मंडळी पूर्वीपासूनच या स्पर्धेत उतरले आहेत. त्यामुळे पुढच्यावर्षी जुलै महिन्यादरम्यान होणार्‍या राष्ट्रीय अधिवेशनादरम्यान रिपब्लिकन पार्टी औपचारिकरित्या आपल्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची निवड करेल. ही परिषद साधारण दि. १५ ते १८ जुलैदरम्यान होणार आहे.

एकीकडे हर्षवर्धन यांनी ही घोषणा केली असतानाच, दुसरीकडे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ‘सिक्रेट डॉक्युमेंट’च्या गैरव्यवहार प्रकरणात तिसर्‍यांदा दोषी ठरवण्यात आले आहे. गुरुवारी रात्रीच फेडरल कोर्टाकडून त्यांच्यावर तिसर्‍यांदा आरोप लावण्यात आला. २०२२ मध्ये ट्रम्प यांनी फ्लोरिडाच्या पाम बीच येथील ‘मार-ए-लागो क्लब’मध्ये बसवण्यात आलेल्या ‘सीसीटीव्ही’ कॅमेर्‍याचे फुटेज हटवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. इराणवर हल्ला करण्याच्या अमेरिकेच्या लष्करी योजनेशी संबंधित एक वर्गीकृत दस्तऐवज लपवल्याचाही ट्रम्प यांच्यावर आरोप आहे. ट्रम्प यांना अशा १०-१२ नव्हे, तर तब्बल ४० आरोपांना सामोरे जावे लागणार आहे. ट्रम्प यांच्याविरोधातील अत्यंत गंभीर प्रकरणांमध्ये जास्तीत जास्त २० वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ट्रम्प यांचे राष्ट्राध्यक्षपदाचे स्वप्न पूर्ण होणार की रिपब्लिकन पार्टीचा नवा चेहरा लोकांना पाहायला मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक