ठाणे : ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदाही संपूर्णत: मंडप भाडे माफी द्यावी. असे साकडे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना घातले आहेत. मंगळवारी म्हस्के यांनी यासंदर्भातील निवेदन आयुक्तांना दिले.
ठाणे महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून दरवर्षी शहरात गणेशोत्सव साजरा केला जातो. ही सर्व मंडळे वर्षभर समाजोपयोगी अशी कामे करीत असतात. तसेच शहरामध्ये उद्भवणाऱ्या आपत्तीमध्ये देखील सर्व मंडळांचे पदाधिकारी व सदस्य हिरीरीने सहभाग घेवून हातभार लावत असतात. मागील दोन ते तीन वर्षापासून कोरोना, अतिवृष्टी आदी कारणांमुळे या मंडळांची आर्थिक परिस्थिती सक्षम राहिलेली नाही. सामाजिक बांधिलकी व समाजप्रबोधनाच्या उदात्त हेतूने ही मंडळे उत्सव साजरे करत असतात.
गणेशोत्सवाची परंपरा टिकून रहावी यासाठी या मंडळानी कोरोना काळात साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला. या कालावधीमध्ये त्यांना आर्थिक मदत देखील फारशी मिळालेली नाही. सर्व सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्ते काम करीत असतात व यातूनच भावी पिढी घडण्यास मदत होते. मागील दोन ते तीन वर्षे महापालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक मंडळांना मंडप भाडे माफ करण्याबाबत आपण पुढाकार घेतला होता.तेव्हा यावर्षी देखील गणेश मंडळांना संपूर्णत: मंडप भाडे माफ करण्याबाबत निर्णय घेवून दिलासा द्यावा. अशी मागणी नरेश म्हस्के यांनी केली असुन आयुक्त बांगर सकारात्मक असल्याचे सांगितले.