डोंबिवली(जान्हवी मोर्ये) : रेल्वे स्थानक, बस स्थानक असो किंवा बाजारपेठ अशा सर्वच ठिकाणी स्वच्छ, स्वतंत्र अशी महिला शौचालये नसल्याने महिलांची नेहमीच कुंचबणा होत असते. बहुतांश वेळा अनेक ठिकाणी शौचालये ही नाहीत अशी परिस्थिती दिसून येते. या परिस्थितीत कल्याण डोंबिवली महापालिकेने शहरात सात ई -शौचालय उभारले आहेत. हे ई शौचालय गेल्या अनेक वर्षापासून वापराविना धूळ खात पडून आहेत. ही ई शौचालय मोफत तत्वावर चालविणा:या संस्थांच्या महापालिका शोधत आहे. पण अशा संस्था मिळत नसल्याने ई शौचालय धूळ खात पडून आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत सात ठिकाणी ई शौचालय आहे. त्यामध्ये कल्याणमध्ये मुरबाड रोड, संतोषी माता रोड, लोकग्राम कल्याण या तीन ठिकाणी तर डोंबिवलीतील दीनदयाल रोड, स्टेशन परिसर, नांदिवली रोड अशा चार ठिकाणी आहेत. ही ई शौचालय उभारून कोणत्यातरी स्वयंसेवी संस्थांनी चालवावी अशीच संकल्पना असल्याचे महापालिका अधिका:यांचे म्हणणे आहे. संस्था महापालिकेकडे त्याबद्दल्यात मोबदला मागत आहे. मात्र महापालिकेला ती स्वयंसेवी संस्थांना मोफत तत्वावर दयायची आहे. सक्षम नारी सेवाभावी संस्था यांनी दहा महिन्यापूर्वी ई शौचालय धूळ खात पडून असल्याची बाब प्रकाशात आणली होती. ही ई शौचालय चालविण्यास सक्षम नारी सेवाभावी संस्थेने तयारी देखील दर्शविली होती. त्यासाठी महापालिकेकडे त्यांनी लेखी मागणी केली होती. ई शौचालयाच्या माध्यमातून सक्षम नारी संघटनेला महिलांना रोजगार पुरविणे हे उद्दिष्ट आहे. त्यामुळे मोबादल्यासह ई शौचालय चालविण्यास सक्षम नारी संघटनेने तयारी दर्शविली होती. त्यासाठी एक शौचालय चालवण्यास प्रत्येकी वीस हजार रू. खर्च येईल. व वीस हजार रू. खर्च कसा होणार आहे त्यांची सविस्तर मांडणी करून ही त्यांनी सविस्तर मांडणी पत्रात दिली होती.
ई शौचालय साफ करण्यासाठी आणि खर्च सांभाळणारी व्यक्ती सफाई कामगार -१५ हजार पगार, लाईट बिल २.५० हजार, झाडू, फडका, वायपर, फिनेल- २.५० हजार, शौचालय साफ करण्यासाठी केमीकल - ३५०० हजार, मासिक खर्च २३,५०० रू. आहे. पण ई शौचालय पडीक अवस्थेत आहेत ती पूर्ववत चालविण्यात याव्यात. त्यामुळे बचतगटाला रोजगार उपलब्ध होईल. व महिलांची गैरसोय होणार नाही असे पत्र संघटनेच्या अध्यक्षा, संस्थापिका स्वाती मोहिते यांनी महापालिकेला दिले होते. संघटनेने सात ही ई शौचालय चालवू अशी तयारी दर्शवली होती.
स्वाती मोहिते यांनी सांगितले, महिलांना बाहेर फिरताना शौचालये शोधावी लागतात. आणि या परिस्थितीत ई शौचालय पडून आहेत. बाजारपेठातच नव्हे तर हायवे च्या ठिकाणी देखील ई शौचालय असली पाहिजे. त्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे. त्यामुळे एमएमआरडीए च्या माध्यमातून ई शौचालय मोठय़ा प्रमाणात उभारण्यात येणार आहे. पण कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत सात ई शौचालये आहेत. पण ती अत्यंत अस्वच्छ स्थितीत आहेत. सक्षम नारी संघटनेला महापालिका हे ई शौचालय देण्यास तयारी दर्शविली होती. मात्र आता महापालिकेकडून निविदा काढण्यात येणार आहे. त्यानंतरच ती शौचालय संस्थेला चालविण्यास दिली जाणार आहे. त्यामुळे महापालिकेने एक प्रकारे आमच्या संघटनेची फसवणूक केली आहे असा आरोप त्यांनी केला आहे. आमच्या संघटनेकडून प्लॉस्टिक बंदी विषयी नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते. पण संघटनेकडून मोफत ई शौचालय कशी चालविली जाणार असा सवाल ही त्यांनी केला.
चौकट- डोंबिवली पश्चिमेत भाजपच्या माजी नगरसेविका मनिषा धात्रक व माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांनी महिलांची होणारी गैरसोय विचारात घेऊन केवळ महिलांसाठी ई शौचालय उभारली आहेत. त्यांच्या प्रभागात त्यांनी तीन शौचालय उभारली आहेत. त्यापैकी कल्याण पादचारी पूलानजीक असलेले शौचालय हे विविध सोयी सुविधांनी युक्त असे आहे. त्यामध्ये महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीनची सुविधा देण्यात आली आहे. नवजात शिशूंना स्तनपान करण्यासाठी जागा आहे. चेजिंग रूम आहे. ही शौचालय मनिषा धात्रक आणि शैलेश धात्रक स्वखर्चातून चालवित आहेत. त्यामुळे महिलांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पण शहरात इतर ठिकाणी असलेली शौचालये ही सुस्थितीत आणून महिलांना वापरण्यायोग्य करावीत अशी मागणी महिला वर्गाकडून केली जात आहे.
कार्यकारी अभियंता घनश्याम नवागुंळ यांनी सांगितले, ई शौचालयाबाबत निविदा मागविण्यात येणार आहे. त्याला अजून सात आठ दिवस लागतील. महिला बचत गटांकडून ही प्रस्ताव मागविण्यात येणार आहे. आयुक्तांनी कल्याण आणि डोंबिवली येथील ई शौचालय वेगवेगळ्या संस्थेला चालविण्यास देण्यात यावे असे सांगितले आहे. शिवाय प्रस्ताव काढल्यामुळे एका विशिष्ट संस्थेला काम दिले असा आरोप देखील होणार नाही असे आयुक्ताचे म्हणणे असल्याचे सांगितले.