‘विज्ञान भारती’ हे एक अखिल भारतीय संघटन एक स्वदेशी विज्ञान आंदोलन आहे. आपल्या देशातील प्राचीन ते अर्वाचीन विज्ञानाबद्दल जागृती निर्माण करून आपल्या देशाच्या उन्नतीसाठी वैज्ञानिकांना एकत्र आणून नवनवीन क्षेत्रात काम उभे करणे या उद्देशाने हे आंदोलन गेली ३१ वर्षे चालू आहे. विज्ञान भारतीच्या ‘विद्यार्थी विज्ञान मंथन’ या उपक्रमाचा या लेखात मागोवा घेण्यात आला आहे.
‘विज्ञान भारती’च्या अनेक उपक्रमांपैकी एक उपक्रम शालेय विद्यार्थ्यांसाठी आहे. ‘विद्यार्थी विज्ञान मंथन’ या नावाने हा उपक्रम गेली सात वर्षे चालू आहे. या उपक्रमात मागीलवर्षी देशभरातून एकूण अंदाजे १२ लाख विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातील महाराष्ट्राची संख्या १ लाख, ५ हजार, ७०० होती.महाराष्ट्रातून चार विद्यार्थी सर्वोच्च स्तरावर पोहोचले व त्यांचा सत्कार ‘एनसीसीएस’मध्ये डॉ. मोहन वाणी यांच्या हस्ते झाले. अनेक संस्था या उपक्रमात सक्रिय सहभागी होत आहेत, त्यातीलच एक म्हणजे ‘एनसीईआरटी’. दुसरी ‘एनसीएसएम’
‘विज्ञान भारती’, ‘एनसीएसएम’ आणि ‘एनसीईआरटी’ यांच्या संयुक्त विद्यमाने ’विद्यार्थी विज्ञान मंथन’ ही परीक्षा दरवर्षी इ. सहावी ते अकरावीमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा, निरीक्षण आणि तर्काच्या आधारावर विश्लेषणकरण्याची क्षमता वृद्धिंगत व्हावी. तसेच, आपल्या देशाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात असलेल्या भरीव योगदानाबद्दलची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी ही या परीक्षेची उद्दिष्टे आहेत.भारतीय वैज्ञानिकांच्या कार्याचा परिचय व्हावा आणि त्यापासून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने यावर्षी थोर भारतीय वैज्ञानिक, डॉ. बिरबल सहानी यांची जीवनगाथा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी असणार आहे. सर्व अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना परीक्षेच्या http://vvm.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाणार आहे. सहावी ते अकरावीमधील मराठी तसेच इंग्रजी माध्यमातील सर्व विद्यार्थी या परीक्षेसाठी नोंदणी करू शकतील. यावर्षी मुख्य परीक्षा दि. २९ ऑक्टोबर आणि दि. ३० ऑक्टोबर या दिवशी होणार आहे.
विद्यार्थ्यांनी आपल्या सोयीनुसार कोणत्याही एका दिवशी आपल्या घरून अथवा शाळेमधून मोबाईलद्वारे (अण्ड्रॉईड) परीक्षा द्यायची आहे. परीक्षेचा कालावधी हा दीड तास (९० मिनिटे) असणार आहे. सकाळी १० ते सायं. ६ वाजेपर्यंत मोबाईलवर परीक्षेच्या अॅपवर लॉगिन करून कोणत्याही वेळी दीड तासांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे. मुख्य परीक्षा विद्यार्थ्यांना देणे सोपे व्हावे म्हणून चाचणी परीक्षा (मॉकटेस्ट) दि. १ ऑक्टोबरपासून घेण्यात येणार आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी बरोबरच अन्य ११ भारतीय भाषांमध्ये परीक्षेचा अभ्यासक्रम उपलब्ध असून विद्यार्थ्यांना या भाषांपैकी कोणत्याही भाषेत परीक्षा देता येईल. मुख्य परीक्षेचे स्वरूप हे बहुपर्यायी प्रश्न (MCQ) असून यामध्ये १०० प्रश्न (१०० गुण) विचारले जातील. विभाग ‘अ’मध्ये भारताचे विज्ञानातील योगदान, बिरबल सहानी यांची जीवनगाथा यावर आधारित ४० प्रश्न विचारले जातील. विभाग ‘अ’हा ४० गुणांचा असून यासाठी वेळ ३० मिनिटे असणार आहे. विभाग ‘ब’मध्ये विद्यार्थ्यांच्या विज्ञान व गणित या शालेय अभ्यासक्रमातील विषयांवर आधारित ५० प्रश्न (५० गुण) आणि सामान्य तर्कशास्त्रावर आधारित दहा प्रश्न (दहा गुण) विचारण्यात येतील. विभाग ब हा एकूण ६० गुणांचा असून यासाठी वेळ ६० मिनिटे असणार आहे.
जर विभाग ‘अ’मध्ये विद्यार्थ्यास २० गुण किंवा अधिक गुण मिळाले तरच विभाग ‘ब’चे मूल्यांकन करण्यात येईल. राज्यातील सर्वाधिक गुण मिळविलेले प्रत्येक इयत्तेतील २० विद्यार्थी हे राज्यस्तरीय शिबिरासाठी (State Level Camp) पात्र ठरतील. तसेच राज्यस्तरीय शिबिरामध्ये सर्वाधिक गुण मिळविलेले प्रत्येक इयत्तेतील दोन विद्यार्थी हे राष्ट्रीय शिबिरासाठी (National Camp) पात्र ठरतील. राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन हे दि. २६ नोव्हेंबर, ३, १०, १७ डिसेंबर या दिवसांपैकी कोणत्याही एक किंवा दोन दिवशी तर राष्ट्रीय शिबिराचे आयोजन हे दि. १८ आणि १९ मे, २०२४ या दिवशी करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय शिबीर आणि राष्ट्रीय शिबीर हे प्रयोग क्रिया, निरीक्षण आणि विश्लेषण क्षमता, परिस्थितीजन्य समस्येचे निराकरण करण्याची क्षमता, सर्जनशीलता, नेतृत्वगुण इ. घटकांवर आधारित असेल. या शिबिरांची विस्तृत माहिती मुख्य परीक्षेनंतर देण्यात येईल.
या वर्षीच्या परीक्षेची ठळक वैशिष्ट्ये
१ सृजन प्रशिक्षण कार्यक्रम : या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय आणि क्षेत्रीय पातळीवरील विजेत्या विद्यार्थ्यांना आपल्या देशातील नामवंत संशोधन संस्थांमध्ये (ISRO, DRDO, CSIR, BARC इ .) स्वतः भेट देऊन प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी साधारण एक ते तीन आठवडे असा असणार आहे.
१ भास्कर शिष्यवृत्ती : ‘भास्कर शिष्यवृत्ती योजना’ राष्ट्रीय विजेत्यांसाठी आहे. एक वर्षासाठी रु. दोन हजार प्रति महिना असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे. सृजन प्रशिक्षणानंतर राष्ट्रीय विजेत्यांना एखादा प्रकल्प नेमून देण्यात येईल आणि त्या प्रकल्पाचे विषय तज्ज्ञांकडून मूल्यांकन केले जाईल. या मूल्यांकनानंतर विजेत्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल.
१ रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्र : राष्ट्रीय, क्षेत्रीय व राज्य स्तरावरील विजेत्या विद्यार्थ्यांसाठी रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहेत.
सध्या परीक्षेसाठी नोंदणी चालू आहे. नोंदणीची प्रक्रिया (Registration) अत्यंत सोपी असून विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरच वैयक्तिकरित्या नोंदणी (Individual Registration) अथवा शाळेच्या माध्यमातून नोंदणी (Through School Registration) करता येईल. नोंदणीसाठी नाममात्र शुल्क रु. २००/- आहे. नोंदणीचा अंतिम दि. १५ सप्टेंबर आहे. नोंदणीसाठी व अधिक महितीसाठी http://vvm.org.in या संकेतस्थळास भेट द्यावी, ही विनंती.
डॉ. माधव राजवाडे