मुंबई : आयुष्यात हव्या असलेल्या गोष्टींचा समतोल साधत मध्यममार्गाचा मागोवा घेणारा ‘मीडियम स्पाइसी’ हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. आता प्रेक्षकांना घरबसल्या या चित्रपटाचा मनमुराद आनंद घेता येणार आहे. अॅमेझॉन प्राइम या ओटीटी वाहिनीवर चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सई ताम्हणकर, ललित प्रभाकर आणि पर्ण पेठे यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट नात्यांची गुंतागुंत आणि त्यांचं तरल चित्रण दाखवणारा होता.
‘मीडियम स्पाइसी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक मोहित टाकळकर यांनी एक अनोख्या विषयावरील चित्रपट आपल्यासमोर सादर केला होता. या चित्रपटाला अनेक पुरस्कार सोहळ्यात नामांकनेही मिळाली होती. फिल्मफेअर अॅवॉर्ड, बॉलीवूड फेस्टिवल नॉर्वे, रिव्हर टू रिव्हर फिल्म फेस्टिव्हलमध्ये क्लोजिंग फिल्म, स्टुटगार्ट फिल्म फेस्टिव्हल, साऊथ एशियन फिल्म फेस्टिवल, ढाका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अशा अनेक नामांकित पुरस्कार सोहळ्यात व फिल्म फेस्टिवल्समध्ये ‘मीडियम स्पाइसी’ला मानाचे स्थान मिळाले.