१८५७चे स्वातंत्र्यसमर ब्रिटिश साम्राज्य उलथून टाकण्यात यशस्वी झाले नाही; पण त्याने ब्रिटिशांच्या छातीत धडकी भरली, हे मात्र नक्की. सरकारच्या विरोधात क्रांतिकार्य करणार्या देशभक्तांना तुरुंगात ठेवताना भारताच्या मुख्य भूमीपासून दूर नेऊन ठेवले पाहिजे, असे सरकारने ठरवले आणि त्यासाठी अंदमान बेटांची निवड केली. ही बेटे भारताच्या पूर्व किनार्यापासून सुमारे १ हजार, २०० किमी दूर आहेत. चहुबाजूंनी असलेला समुद्र, जवळ-जवळ वर्षभर पडणारा पाऊस, त्यामुळे असलेले रोगट हवामान, प्रचंड मोठे आणि घनदाट जंगल, तेथे असलेले त्रासदायक कीटक अशा सगळ्या कारणांनी ही बेटे तुरुंग म्हणून आदर्श होती.
१८५७ नंतर सरकारने तेथे अनेक राजकैदी पाठवले. पुढे १८९६ मध्ये इंग्रजांनी तेथे मोठ्या तुरुंगाच्या बांधकामाला सुरूवात केली. दहा वर्षांनी हे काम पूर्ण झाले. प्रत्येकी तीन मजल्यांच्या सात इमारती आणि एकूण सुमारे ७०० कोठड्या अशी या तुरूंगाची रचना होती. एका कोठडीत फक्त एक कैदी ठेवण्यात येत असे. कोठडीला इंग्रजी ‘सेल‘ असा शब्द असल्याने या तुरुंगाचे नाव ‘सेल्युलर जेल‘ असे ठेवण्यात आले. तुरुंग जरी १८९६ मध्ये बांधून पूर्ण झाला असला, तरी त्याआधीच इंग्रजांनी अंदमानमध्ये राजकैदी पाठवण्यास सुरूवात केली होती. १९३६ मध्ये कैद्यांची शेवटची तुकडी तेथे धाडण्यात आली होती. म्हणजे, १८५७ ते १९३६ या प्रदीर्घ काळात काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आलेले अनेक कैदी इंग्रजांचा छळ सोसत होते. या सगळ्या देशभक्तांची नावेसुद्धा बराच काळ माहीत नव्हती.
१९९०च्या सुमारास ‘सावरकर राष्ट्रीय स्मारक‘ ( मुंबई) आणि ‘टिळक स्मारक ट्रस्ट‘ (पुणे) या संस्थांनी ही माहिती संकलित करण्याचे काम हाती घेतले. डॉ. वा. द. दिवेकर यांनी यासाठी खूप परिश्रम घेतले. भारतातील आणि लंडनमधील पोलिसांची दफ्तरे धुंडाळली. भारतभर प्रवास करून हयात क्रांतिकारकांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या. विशेष म्हणजे, या दोन संस्थांनी या क्रांतिकारकांची एक परिषद दि. २६ आणि २७ फेब्रुवारी १९९१ या दोन दिवशी स्मारकात आयोजित केली. अनेक देशभक्त अगदी अनपेक्षितपणे आणि दीर्घ कालावधीनंतर एकमेकांना भेटले. जुन्या (कटू!) आठवणी निघाल्या. यानिमित्ताने ‘सावरकर स्मारक‘ आणि ‘टिळक स्मारक ट्रस्ट‘ या संस्थांनी एक पुस्तिका प्रसिद्ध केली होती. त्या पुस्तिकेत आपल्याला अनेक अज्ञात क्रांतिवीरांची माहिती मिळते.
१८५७च्या स्वातंत्र्यसमरामध्ये भाग घेतल्याबद्दल ६०० क्रांतिवीरांना इंग्रजांनी अंदमानात धाडले होते. त्यांची नावे दिवेकर यांच्यामुळे पहिल्यांदाच उजेडात आली. या देशभक्त क्रांतिवीरांमध्ये उत्तर प्रदेशच्या भदोई संस्थानचे मुसाई सिंग होते. तब्बल ५० वर्षे काळे पाणी भोगल्यावर १९०७ मध्ये त्यांची तेथून सुटका झाली. कोलकातामध्ये अनेक क्रांतिकारक सक्रिय होते. पोलीस त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. डिसेंबर १९२९ मध्ये त्यांनी अनेक घरांवर धाडी टाकल्या. स्फोटके जप्त केली आणि २७ क्रांतिकारकांवर खटला भरला. निरंजन सेनगुप्ता, सतीशचंद्र पक्राशी, मुकुल रंजन सेनगुप्ता, निशिकांत रॉयचौधरी आणि सुधांशू दासगुप्ता यांची रवानगी अंदमानमध्ये करण्यात आली.
आता बांगलादेशमध्ये असलेल्या चितगाव येथे इंग्रजांचे शस्त्रागार होते. त्यावर क्रांतिवीरांचे लक्ष गेले नसते, तरच नवल. मास्तर दा सूर्यसेन यांच्या नेतृत्वाखाली काही वीरांनी त्याच्यावर १९३० मध्ये छापा टाकला. पोलिसांशी फार मोठी चकमक उडाली. १९३३ साली खटला उभा राहिला. सूर्यसेन आणि तारकेश्वर दस्तीदार यांना फाशी झाली आणि १२ क्रांतिकारकांना काळे पाणी. यांमध्ये गणेश घोष, हरिपाद भट्टाचार्य, फकीरचंद सेनगुप्ता, हिमांगशू भौमिक, कालिकिंकर डे, लालमोहन सेन, फणींद्रनाथ नंदी, रणधीर दासगुप्ता, सहायराम दास, सुबोधकुमार चौधरी, सुबोध रॉय, सुधीररंजन चौधरी, कालिपाद चक्रवर्ती आणि सुखेंदू दस्तगीर यांचा समावेश होता.
बंगालमधील मैमनसिंग येथे गांजा आणि दारू गुदामासमोर दि. १८ मे १९३० रोजी लोकांनी निदर्शने केली. पण, पोलिसांनी ती उधळून लावण्याचा प्रयत्न केला. क्रांतिकारकांनी त्या गोदामावर सशस्त्र हल्ला चढवला. अनेकांची धरपकड झाली. त्या खटल्याचा निकाल १९३२ मध्ये लागला आणि पुढील क्रांतिवीरांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली - सुधींद्र कुमार रॉय, बिधूभूषण सेन, नागेंद्र देव आणि प्रबोधकुमार रॉय. लक्ष्मीकांत शुक्ला नावाच्या देशभक्ताने दि. ८ ऑगस्ट १९३० या दिवशी झाशीचे कमिशनर असलेले स्मिथ यांच्या वधाचा प्रयत्न केला. त्याची झडती घेण्यात आली तेव्हा त्याच्या जवळ एक पिस्तुल आणि बॉम्ब सापडला. शुक्ला हे चंद्रशेखर आझाद यांचे जवळचे सहकारी होते. शुक्ला यांना सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावून १९३३ मध्ये अंदमानला धाडण्यात आले.
इंग्रज सरकारच्या छातीत धडकी भरवणार्या अशा अनेक घटना देशभर घडत होत्या. निधड्या छातीचे अनेक तरुण त्यासाठी आपल्या आयुष्यावर निखारे ठेवत होते. अशा आणखी काही कहाण्या पाहूया पुढच्या लेखात. (संदर्भ : लेखात उल्लेख केलेली पुस्तिका)