एक दुष्टचक्र...

    07-Jul-2023   
Total Views |
At least 951 died trying to reach Spain by sea

स्पेनलगतच्या समुद्रात जानेवारी ते जून यादरम्यान किती लोक मृत्युमुखी पडले, याचा नुकताच एक अहवाल जाहीर झाला. त्यानुसार गेल्या सहा महिन्यांमध्ये स्पेनमध्ये जाता-जाता ९५१ लोक मृत्युमुखी पडले, त्यात ४९ बालकांचाही समावेश आहे. हे लोक समुद्रामार्गे बोटीने स्पेनमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत होते. मात्र, स्पेनमध्ये जाण्यापूर्वी वाटेतच त्यांचे जहाज समुद्रात बुडाले किंवा फुटले किंवा आणखी कोणत्यातरी कारणाने हे लोक मृत्युमुखी पडले. कॅनरी आईसलॅण्ड मार्ग, अलबोरन समुद्री मार्ग, अल्जेरीयन रूट, जिब्राल्टर मार्ग या चार मार्गांतून स्पेनमध्ये बेकायदेशीर घुसण्याचा प्रयत्न काही लोक सातत्याने करत असतात.

अर्थात, हे लोक बेकायदेशीररित्या आणि चोरून, लपून त्यांच्या देशातून पलायन करून स्पेनमध्येही अवैधरित्या घुसून पुढे इतर पश्चिमी राष्ट्रांमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. या प्रयत्नांमध्ये बर्‍याच वेळा अनेकांना यशही येते. मात्र, समुद्राचा अंदाज नसल्याने अनेकांचा मृत्यूही होतो.स्पेन प्रशासनाकडे नोंद आहे की, गेल्या सहा महिन्यांमध्ये १९ बोटी अशाप्रकारे समुद्राने स्वाहा केल्या, तर २८ घटना अशा घडल्या की, त्यामुळे लोकांना जलसमाधी मिळाली. तसेच, स्पेनचे म्हणणे आहे की, या काळात ९५१ लोक मृत्युमुखी पडले. १२ हजार, १९२ लोक स्पेनमध्ये अशाच अवैध मार्गाने दाखलही झाले.
 
स्पेनमध्ये अवैधमार्गे जाऊ पाहणारे हे सगळे लोक मुख्यतः आफ्रिका खंडातील देशाचे नागरिक आहेत. अल्जेरिया, कॅमरून, कॉमोरोस, काँगो, इथियोपिया, आयव्हरी कॉस्ट, गिनिया, माली, मोेरक्को, गांबिया, सेनेगल, सुदान, सीरिया आणि श्रीलंका या १४ देशांमधील काही नागरिक समुद्रामार्गे स्पेनमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. हे सगळे देश गरिबीच्या दरीत बुडालेले आणि मुस्लीम दहशतवाद्यांनी इथे सगळ्यांचे जगणे नरक केलेेे. यातील बहुतेक देशांमध्ये ‘शरिया कायदा’ लागू करण्याच्या नादात अतिरेक्यांनी देशातील जनजीवन विस्कळीत केले आहे. अन्न, मूलभूत सुविधा नाहीत आणि दहशतवाद्यांची क्रूरता सहन करायची. भ्रष्टाचार आणि राजकीय नेतृत्व कुचकामी. या सर्व कारणांनी उपरोक्त सांगितलेल्या देशांमध्ये जनतेला अक्षरशः मरणयातना सहन कराव्या लागतात. त्यामुळे या देशांतील नागरिक पलायन करतात; पण दुर्देवाने जगण्याच्या आशेने स्पेनकडे समुद्रीमार्गे पळून जाणार्‍या नागरिकांतील बहुतेकांना मृत्यूच मिळतो.

स्पेन आणि पुढे पाश्चिमात्य देशांमध्ये जाण्यासाठी लोक मृत्यूचेही आव्हान का स्वीकारत असतील? स्पेनमध्ये पोहोचल्यावर किनार्‍यावर तैनात असलेल्या स्पेनच्या तटरक्षकांना सापडलो, तर तुरूंगात जावे लागेल किंवा आणखीन काही त्रासाला सामोरे जावे लागेल, हे या लोकांना माहिती नसेल का? तर या लोकांना वाटते की, स्पेनमध्ये गेल्यावर सगळे चांगले होईल. पाश्चिमात्य देशात पैसा मिळेल, हवे तसे वागण्याचे स्वातंत्र्य मिळेल. आपण मुक्तपणे जगू, तर काही लोकांना वाटते की, पाश्चिमात्य देश विस्थापितांना आसरा देतात. पुरोगामी आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य जपणारे पाश्चिमात्य देश घुसखोरांचेही मानवी अधिकारही जपतील वगैरे...पण तो भूतकाळ होता.

फ्रान्स सध्या जळत आहे. मूळच्या स्वातंत्र्यवादी आणि उदारमतवादी फ्रान्सची ही परिस्थिती पाहून आता सगळे जग शरणार्थी म्हणून येणार्‍या घुसखोरांना आणि विस्थापितांना आसरा देण्यास तयार नाही. आजचे घुसखोर आसरा मिळताच देशातील मूळ नागरिकांनाच त्रास देतील, असे त्यांना वाटते. स्पेनमध्ये जाण्याआधीच मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या मृत्यूला जबाबदर कोण? त्यांच्या देशातून त्यांना स्पेनमध्ये जाण्यासाठी व्यवस्था करून देणारी यंत्रणा आहेच. या यंत्रणेवर कारवाई होणे आवश्यक आहे. तसेच, या नागरिकांचा मूळ देश त्यांना जगण्यासाठी लायक परिस्थिती उपलब्ध करून देऊ शकला नाही, हेसुद्धा सत्य आहेच. अभ्यासक म्हणतात की, ’हे सगळे नागरिक बहुतेक मुस्लीम धर्मीय देशातले असतात; पण शरण घेताना, घुसखोरी करताना ते मुस्लीम देश निवडत नाहीत?’ पुढे असेही दिसते की, हे लोक ज्या देशात विसावतात तिथे कालांतराने ‘शरिया’ आणि मुस्लीम ‘बद्ररहूड’साठी एकत्र येत हिंसात्मक मार्गही निवडतात. हे एक दुष्टचक्र आहे, नक्कीच!

९५९४९६९६३८
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.