राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणात कंपनीचे कामकाज आणि कर्मचार्यांचे काम यासंदर्भात कार्यसंस्कृतीवर विशेष भर देण्यात आला. कंपनीला उत्तमच नव्हे, तर सर्वोत्तम बनविण्यात कंपनीस्तरावर व कंपनीअंतर्गत काम करण्याची पद्धती म्हणजेच कार्यसंस्कृती. हा एक मुख्य परिणामकारक पैलू असतो, हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहेच. त्याविषयी सविस्तर...
गेली ३० वर्षे भारतातील विविध क्षेत्रांतील कंपन्यांचा सर्वांगीण अभ्यास करून, विविध व्यवस्थापन निकषांवर आधारित मूल्यांकन करून उल्लेखनीय कामगिरी करणार्या कंपन्यांची निवड करण्यात येते. यामुळे निवड झालेल्या कंपन्यांना पाठबळ, तर त्यानुसार प्रयत्न करू इच्छिणार्या कंपन्यांना प्रोत्साहन मिळते. याचे विविध प्रकारे फायदे कंपनीपासून कर्मचार्यांपर्यंत सार्यांनाच होत असल्याने ’सर्वोत्तम कंपन्या-२०२३’ सर्वेक्षण व त्याच्याशी निगडित एकूणच प्रक्रिया या सार्यांचा कानोसा घेणे म्हणूनच महत्त्वाचे ठरते.
यासाठी सुरुवातीलाच नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणात कंपनीचे कामकाज आणि कर्मचार्यांचे काम या संदर्भात कार्यसंस्कृतीवर विशेष भर देण्यात आला. कंपनीला उत्तमच नव्हे, तर सर्वोत्तम बनविण्यात कंपनीस्तरावर व कंपनीअंतर्गत काम करण्याची पद्धती म्हणजेच कार्यसंस्कृती. हा एक मुख्य परिणामकारक पैलू असतो, हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहेच. यावेळी सर्वोत्तम कंपनी सर्वेक्षणातून स्पष्ट झालेली बाब म्हणजे, सर्वेक्षणात सहभागी झालेल्या सर्वाधिक म्हणजे ८६ टक्के कर्मचार्यांनी त्यांना त्यांच्या कंपनी आणि कार्यसंस्कृतीचा सार्थ अभिमान वाटतो, असे सांगितले व हीच बाब या सर्वेक्षणाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरावी.
कार्यक्षम व सर्वोत्तम कंपन्या यादरम्यान मूलभूत व मोठा फरक सांगायचा म्हणजे, सर्वोत्तम कंपन्यांमध्ये व्यवसायवाढ व आर्थिक फायद्यांच्या तोडीला उत्पादन- सेवेचा दर्जा व कर्मचार्यांचे पगारमान-योगदान इत्यादींचा आवर्जून व आदरपूर्वक विचार केला जातो. याचा परिणाम असा विचार-आचार करणार्या कंपन्यांमधील कर्मचारी केवळ कार्यक्रमच नव्हे, तर कार्यप्रवण असल्याचे प्रामुख्याने दिसून येते.यालाच जर व्यावसायिक संदर्भात सर्व-व्यापक व्यवस्थापन नेतृत्वाची साथ मिळाली, तर उत्तम कर्मचार्यांमधून सर्वोत्तम कंपनी घडणे, कसे सहज शक्य होते, ते पुढील मुद्द्यांवरून स्पष्ट होते.
- व्यवस्थापनासह व्यवस्थापकांनी आपल्या सहकारी-कर्मचार्यांना अधिकाधिक प्रेरित-प्रोत्साहित करतानाच त्यांना गरजेनुरूप व वेळेत मार्गदर्शन करायला हवे.
- व्यवसायच नव्हे, तर कार्य आणि कार्यक्षमतेच्या काळात कल्पक व नावीन्यपूर्ण कार्यपद्धतीला पर्याय नाही. व्यवस्थापकांनी या व्यावहारिकदृष्ट्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा स्वतः अवलंब करावा.
-
सक्षम-कार्यक्षम सहकारी हे सक्षम व्यवस्थापक आणि व्यवस्थापनाला उत्तम पर्याय ठरतो, याचा अवलंब अवश्य करावा.
-
कर्मचार्यांपैकी जी मंडळी सहकार्य आणि सकारात्मकतेसह कार्य करतात, त्यांना प्रोत्साहन द्या. यातून इतरांनासुद्धा प्रोत्साहन मिळते, हे लक्षात ठेवा.
-
व्यवस्थापक म्हणजे व्यवस्थापन व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचे व परिणामकारक पद. वरिष्ठ वा व्यवस्थापक म्हणून आपण कुणाला आणि कसे सहकार्य केले, याचा पडताळा घ्या व या प्रक्रियेला अधिक चालना द्या.
-
आपल्या सहकारी चमूला सांभाळून ठेवा. वारंवार सहकारी बदलत गेल्यास वा सोडून गेल्यास त्याचा कामकाज, कार्यक्षमता व कार्यसंस्कृतीवर विपरित परिणाम होऊ शकतो.
- सहकार्यांना त्यांच्या गरजांनुरूप मार्गदर्शन करा. त्याचे बहुविध फायदे सर्वांनाच होतात. यामध्ये कामाशी संबंधित माहिती आणि अनुभवाचे आदान-प्रदान केल्यास प्रत्यक्ष कामाच्या संदर्भात ते उपयुक्त ठरते.
१. हिस्टन ः सर्वोत्तम कंपन्यांमध्ये पहिले स्थान मिळविलेल्या ‘हिस्टन’ या हॉटेल-आदरातिथ्य क्षेत्रातील कंपनीने मुख्य भर दिला, तो लवचिक काम व कामकाजावर. या नव्या उपक्रमामुळे कंपनीचे काम व कर्मचार्यांची निकड-सोय या उभयतांचा मेळ घालण्यात आला. याशिवाय व्यावसायिक प्राधान्यक्रम लक्षात घेऊन कर्मचार्यांना इतर ठिकाणच्या हिस्टन हॉटेलमध्ये काम करण्यास प्रोत्साहन दिल्यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम झाला, हे विशेष.
२. सिस्को ः ‘सिस्को’ ही आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी इंटरनेट कंपनी. कंपनीने जागतिक स्तरावर व्यवसायात पहिला क्रमांक प्राप्त करण्यासाठी कर्मचार्यांच्या नावीन्यपूर्ण काम करण्याला प्राधान्य दिले. यासाठी व्यावसायिक संदर्भात नव प्रकल्प केंद्रांची स्थापना केली. याच्याच जोडीला कर्मचार्यांच्या प्रशिक्षण-विकासास दिलेली चालना कर्मचार्यांना भावली व व्यावसायिकदृष्ट्या सर्वांनाच लाभदायी ठरली आहे.
३. आरईए इंडिया ः ही कंपनी ई-कॉमर्स व्यवसायातील असून, या कंपनीचा भर प्रथमपासूनच ‘कर्मचारी प्रथम’ या संकल्पनेवर राहिला आहे. याशिवाय कंपनीने मूल्याधारित व्यवसाय-व्यवहारावर भर दिला. त्यानुसार कंपनीमध्ये व्यवस्थापकांचा व्यवहार व कर्मचार्यांचे आचरण असल्याने व त्यातूनच कर्मचार्यांची जाणीव कंपनी ठेवीत असल्याची भावना प्रभारी ठरली.
४. सेम्सफोर्स ः माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात प्रामुख्याने काम करणारी ही कंपनी व्यवसाय विकासाच्यादृष्टीने ग्राहक संबंध क्षेत्रात काम करते. विविध प्रकारच्या व विविध आकाराच्या कंपन्यांना सहकार्य देणार्या या कंपनीचा मुख्य भर हा त्यांच्या कर्मचार्यांच्या अचूक कार्यक्षमतेवर अर्थातच आहे. यासाठी कंपनी व्यवस्थापन मुख्यतः कंपनीअंतर्गत नेतृत्व विकास, कर्मचार्यांचा करिअर विकास, लवचिक कार्यपद्धती, कर्मचारी प्रशिक्षण इत्यादींवर विशेष भर देते.
५. सिंचोर्नी इंटरनॅशनल सर्व्हिसेस प्रा. लि. ः ही कंपनी वित्तीय क्षेत्रात काम करते. अमेरिकेत मुख्यालय असणार्या या कंपनीने सुमारे चार हजारांवर कर्मचार्यांमधील प्रत्येकासाठी विकासपर उपक्रमाला प्राधान्य दिले आहे. याच्याच जोडीला व्यावसायिक स्पर्धेवर मात करण्यासाठी कर्मचार्यांच्या नावीन्यपूर्ण व कल्पक कार्यपद्धतीला आवर्जून प्रोत्साहन दिले जाते.
६. आय फायनान्स प्रा. लिमिटेड ः वित्तीय सेवेसह विमा क्षेत्रात काम करणारी ही कंपनी तशी नवीन आहे. सूक्ष्म व लघुउद्योगांना वित्तीय साहाय्य करणार्या या कंपनीने अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ’शिका आणि कमवा‘ या अभिनव योजनेअंतर्गत सामील केले. याशिवाय लघु व कुटिरोद्योगांमध्ये महिला फार मोठ्या संख्येत असल्याने या महिलांना व्यवसायासाठी प्रवृत्त करण्यासाठी महिला कर्मचारी अधिकार्यांचा मोठ्या प्रमाणावर केलेला उपयोग कंपनी व महिला कर्मचारी या उभयतांसाठी लाभदायी ठरला आहे.
६ डीएचएल एक्सप्रेस इंडिया प्रा. लिमिटेड ः जागतिक स्तरावरील वाढत्या व्यवसायासाठी ‘डीएचएल’ने मोठ्या संख्येतील आपल्या कर्मचार्यांना आंतरराष्ट्रीय कार्य-सरावाचे प्रशिक्षण दिले आहे. यासाठी कंपनीने पूर्णकालीन प्रशिक्षण संस्था काढली व त्याचा योग्य तो उपयोग कर्मचार्यांनी करून घेतला. वाढत्या व्यवसायापोटी मोठ्या संख्येत कर्मचार्यांना बढतीच्या संधी उपलब्ध झाल्या. कंपनीने दिलेली कर्मचारी प्रोत्साहन योजना उपयुक्त ठरली.
८. अॅटलासियन इंडिया ः कंपनीचा मुख्य व्यवसाय हा नव्या व स्टार्टअप कंपन्यांना संगणकीय सेवा पुरविण्याचा आहे. बदलत्या स्थितीनुरूप कंपनीने कर्मचार्यांना घरातून व कार्यालयातून काम करण्याचा संमिश्र पर्याय, बाहेरगावाहून काम करणे, कामाचे लवचिक तास व त्याच्याच जोडीला विदेशी तज्ज्ञांसोबत काम करण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या व त्याचे अपेक्षित परिणाम दिसू लागले.
९. आयएसएस फॅसिलिटी सर्व्हिसेस इंडिया प्रा. लि. ः विविध व्यवसायोपयोगी सेवा देणार्या या कंपनीमध्ये कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विशेष प्रयत्न केले जातात. यामध्ये कर्मचारी वा त्यांच्या कुटुंबातील कुणाला दीर्घकालीन आजारावरील उपचार वा विशेष प्रसंगी कर्मचार्यांवर अवलंबून असणार्यांचे पुनर्वसन याचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. याशिवाय कर्मचार्यांमधूनच नावीन्यपूर्ण कार्यकाल पद्धतीचा यशस्वीपणे अवलंब व्हावा, यासाठी चॅम्पियनशिप योजना यशस्वीपणे राबविली जात आहे,
१०. एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स ः व्यवसायवाढीला मुख्याधारित ग्राहक सेवेची जोड देण्यावर कंपनीचा भर आहे. यासाठी कंपनीने सर्वोच्च स्तरावर मुख्य व्यवसायमूल्य अधिकार्याची नेमणूक केली आहे. कंपनीच्या प्रशिक्षण पद्धतीत मूल्य शिक्षणाचा आवर्जून अंतर्भाव करण्यात आला आहे. याचा पाठपुरावा विविध स्तरावर व मासिक स्वरूपात करण्यात येतो, हे विशेष.
थोडक्यात म्हणजे यावर्षीच्या सर्वोत्तम कंपनी सर्वेक्षणात कंपन्यांचे मूल्यांकन करताना व्यवसायवाढ आर्थिक फायदेशीरतेला ग्राहकाभिमुख व कर्मचारीप्रवण मुद्द्यांची जोड देण्यात आली आहे. त्याशिवाय कंपनीस्तरावर आंतरराष्ट्रीय व्यवसाय-व्यवहारात कर्मचार्यांचा विशेष सहभाग व व्यवसायाला मूल्याधारित व्यवहारांची जोड, या बाबी यावेळीच्या सर्वेक्षणाचे विशेष वैशिष्ट्य ठरल्या आहेत.
-दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर-व्यवस्थापन
सल्लागार आहेत.)