शरियाच्या बळी...

    05-Jul-2023   
Total Views |
Sharia law Victims In Afganistan Taliban rule

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी सत्ता काबीज करताच अफगाणिस्तानचे बहुसंख्य मुसलमान अक्षरशः जीव मुठीत घेऊन देशाबाहेर पळण्याच्या तयारीत होते, हे जगाने पाहिले. ७२ टक्के लोक गरीब असलेल्या अफगाणिस्तानमध्ये जेव्हा तालिबानी राजवट आली, तेव्हा ९७ टक्के लोक दारिद्य्राच्या दरीत लोटले गेले, तर अशीही तालिबानी राजवट. कोळसा उगळावा तितका काळाच, या न्यायाने या तालिबान्यांच्या राजवटीत अफगाणिस्तानचे काय तीनतेरा वाजले याबद्दल जितके लिहावे तितके कमी. इतिहासात क्रूर अत्याचारी सत्ता सर्वकाळ चालत नसते. महिला- मुलींच्या आयुष्याला नरक बनवणार्‍या आणि त्यांचे मूलभूत मानवी हक्कही हिरावून घेणार्‍या तालिबानी राजवटीचे राज्य किती काळ चालेल? असे म्हणतात की, कुणाला इतकीही भीती दाखवू नये की, त्याची भीतीच संपेल. याचे पुरेपूर वास्तव तालिबानी राजवटीमध्ये दिसून येते.

तालिबानमध्ये अंतर्गत हिंसा थांबलेली नाही. दररोज कुठे ना कुठे आत्मघातकी हल्ला होत आहे. दररोज कुठे ना कुठे बॉम्बस्फोट होत आहेत. भरीस भर तालिबानी सत्तेच्या तिजोरीत पैशांचा वानवा. आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्रसंघाने इथे मदत करतानाही हात आखडता घेतला. देशातून अर्थार्जन होत नाही आणि बाहेरून काही मदत मिळत नाही, या कोंडीत अफगाणिस्तान सापडला आहे. इथे कुपोषणाचे प्रमाण वाढले आहे, इतकेच काय लोक भुकेने मरत आहेत. आपल्या लहान-लहान मुलांबाळांना विकत आहेत; पण या विरोधात लोकांनी एकत्र येऊ नये, यासाठी तालिबानी आपले कसे इस्लामी राज्य आहे आणि ते कसे इस्लामसाठीच योग्य आहे, हे भासवण्याचा खटाटोप तालिबानी करतात. हे का? तर यावर अभ्यासकांचे म्हणणे आहे की, अफगाणिस्तानच्या गरीब आणि मरणयातना भोगणार्‍या मुस्लीम जनतेला वाटते की, शरियानुसार चालणारे आणि इस्लामची हुकूमत मानणारी सत्ता आहे. त्यामुळे या सत्तेच्या अधीन राहणे, हे खर्‍या मुस्लिमाचे कर्तव्य. त्यामुळेच तालिबान ज्यावेळी ‘शरिया कायदा’ म्हणत काहीही नियम जाहीर करते, तेव्हा कुणीही याविरोधात एकजुटीने उभे राहत नाही.

सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, शरिया कायदा किंवा इस्लामनुसार जीवनशैली म्हणत तालिबानी महिलांसाठीच नियम बनवतात. नुकतीच ईद झाली. त्यावेळी अखुंदजादाने अरबी, दारी, इंग्रजी, पश्तो आणि उर्दू या भाषेत एक संदेश प्रसारित केला. त्यात तो म्हणाला की ”महिलांचे अधिकार आणि सुखमय जीवनासाठी आम्ही ठोस उपाय केले. इस्लामी शरिया अनुसार महिलांना सुखद आणि समृद्ध जीवन प्रदान करण्यासाठी आवश्यक पावलं उचलली आहेत.” त्यावेळी जगाला वाटले की, ईदसारख्या त्यांच्या सणाला त्याने महिलांच्या अधिकाराची घोषणा केली; म्हणजे नक्कीच महिलांवरचे कडक निर्बंध उठवले जातील. मात्र, ईद झाली आणि तालिबानी राजवटीने नवीन संदेश जाहीर केला. महिलांचे जीवन आणखीन चांगले व्हावे; म्हणून त्यांनी महिला ब्युटीपार्लर आणि सलूनवर बंदी आणली. या संबंधित काम करणार्‍यांनी एका महिन्याच्या आत आपले उद्योग-व्यवसाय बंद करावेत, असा तो संदेश नव्हे; तर फर्मान. अफगाणिस्तानमध्ये विधवा किंवा घटस्फोटित महिलांचे प्रमाणही जास्तच आहे. अशा महिलांचे घर महिलासांठी चालणार्‍या सौंदयप्रसाधन, सलून यांच्यावरच अवलंबून होते. मात्र, तालिबान्यांच्या या निर्णयाने या महिलांच्या चरितार्थाचे हे साधनही संपणार आहे.

पण, तालिबान्यांना त्याची पर्वा असण्याचे कारण नाही. मात्र, तालिबान्यांच्या या सत्तेने जगाचे डोळे उघडले आहेत. जगाचा अस्त जरी झाला, तरी अशाप्रकारचे शासन आपल्यावर नकोच असे संपूर्ण जगाचे म्हणणे आहे. (पाकिस्तानचा विषयच वेगळा) मात्र, हे सत्य त्या तालिबानच्या सर्वोच्च नेत्याला अखुंदजादाला कळले का? कारण, तालिबानी राजवटीबद्दल बोलताना मागे तालिबानी सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंदजादा म्हणाला होता की ”अफगाण जिहादच्या सफलतेचा अर्थ फक्त अफगाणसाठी गौरवशाली नाही, तर हे जगातल्या सगळ्या मुसलमानांसाठी गौरवशाली आहे. तालिबानी राज्य व्हावे, ही विश्वभराच्या मुस्लिमांची इच्छा होती. त्यामुळे केवळ अफगाणिस्तानमध्ये शरिया कायदा लागू करणे, हीच आमची जबाबदारी नाही; तर सगळ्या जगात शरिया कायदा लागू करण्याची जबाबदारी आमची आहे.” काय म्हणावे?

९५९४९६९६३८


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.