पुणे : “प्रतिकार-प्रबोधन-आचरण आणि संशोधन ही धर्म रक्षणाची चतु:सूत्री आहे. धर्म जाणून घेत कालसुसंगतरीतीने लोकांसमोर मांडणे आवश्यक आहे. शाश्वत धर्माचे काल सुसंगत आचरण लोकांना सांगावे लागते आणि आचरणामधून ते शिकवावेदेखील लागते. कालौघात विस्मरणात गेलेले ज्ञान आणि धर्म पुन्हा संशोधित करून लोकांसमोर मांडावा लागतो. समाजात एकसूत्रता आणण्यासाठी समर्थ रामदासांनी कालानुरूप रचना केली. समाज जागृतीमधूनच विध्वंसकारी शक्तीला प्रतिकार सुरू झाला. प्रभू रामचंद्रानंतर समर्थांनी शिवाजी महाराजांचा समाजासमोर आदर्श ठेवला. छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वामुळे आक्रमकांची वावटळ ओसरण्यास सुरुवात झाली. आता भारतामध्ये इंटेलेक्चुअल क्षत्रियांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन रा. स्व. संघाचे संरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.”
श्री समर्थ वाग्देवता मंदिर, धुळे या संस्थेच्यावतीने श्री समर्थ रामदास स्वामी लिखित ‘वाल्मिकी रामायणा’च्या सात कांडांमधील आठ खंडांचे प्रकाशन डॉ. भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून फुलगाव येथील श्रृतिसागर आश्रमाचे स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे संघचालक नानासाहेब जाधव, सज्जनगड संस्थानचे बाळासाहेब स्वामी, संस्थेचे अध्यक्ष अनंत तथा रमण चितळे, संस्थेचे कार्याध्यक्ष देवेंद्र डोंगरे, विश्वस्त शरद कुबेर, सत्कार्योत्तेजकसभेचे विश्वास नकाणेकर, सचिव सतीश दीक्षित उपस्थित होते.
यावेळी डॉ. भागवत म्हणाले, “केवळ लढाई करून धर्म संरक्षण होणार नाही. प्रभू श्री रामचंद्रांच्या चरित्रामध्ये प्रतिकार, प्रबोधन, आचरण आणि संशोधन या चारही आयामांची प्रतिष्ठापना केल्याचे भारतात इंटेलेक्चुअल क्षत्रियांची आवश्यकता दिसते. काळाच्या कसोटीवर अनेक विभूती निर्माण झाल्या. त्यांनी धर्मग्लानी दूर केली. भारतावर झालेल्या परकीय आक्रमणांनी समाजजीवन व श्रद्धांचा उच्छेद झाला. श्रद्धा आणि धर्म विसरा नाहीतर मरा, अशी क्रूर आक्रमणे झालेला समाज आध्यात्मिक विस्मृतीत गेला. या काळात पराभूत मनोवृत्ती आणि विकृती जन्माला आल्या. समर्थ रामदास स्वामींनी भारत भ्रमण करीत हिंदू महासत्तांचे पतन का झाले याचादेखील अभ्यास केला. या नृशंस आक्रमणांमधून पुन्हा उभे राहण्याकरिता समर्थ रामदासांनी रामायणाचा आधार घेतला.
कलियुगामध्ये संघटना आवश्यक आहे. त्याकरिता नित्य संपर्क आवश्यक असतो. त्यामधून एक रचना निर्माण होते. व्यवस्था निर्माण होते. त्याचा उपयोग तथागत गौतम बुद्ध आणि शंकराचार्यांनी केला. धर्म नीट झाला, तर सर्व नीट होईल. धर्मासाठी झालेले बलिदान व्यर्थ जात नाही. सर्वस्व त्यातून प्रेरणा निर्माण होते. त्यामुळे कलियुगात संघशक्तीचे अर्थात संघटनेचे अनन्य महत्त्व असल्याचे ते म्हणाले.
स्वामी चिन्मानंद सरस्वती म्हणाले, “समर्थांनी लिहिलेला ‘वाल्मिकी रामायण’ हा ग्रंथ पुढील पिढीला मार्गदर्शक ठरेल. प्रभू रामचंद्र या एका शब्दामुळे हजारो लोकांच्या मनात चेतना, स्फुल्लिंग आणि उत्साह निर्माण होतो. राम हा भारतीय संस्कृतीसाठी प्रेरणादायी आहे. धर्मनिष्ठ लोक निर्माण होण्याची आवश्यकता आहे. भक्त-उपासक-संत निर्माण करणारा अवतार म्हणजे राम. राम हा धर्मावतार असून तोच संस्कृतीचा पाया आहे. धर्माचरणाचा आधार असल्याचे त्यांनी नमूद केले.”
आपण स्वतंत्र झालेलो असलोे तरी गुलामगिरीची मनोवृत्ती अद्याप गेलेली नाही. अनैतिकतेचे समर्थन करणार्या नवीन वावटळी हिंदू समाजावर येऊन धडकत आहेत. त्याला उत्तर देणारा आदर्श घडविणे काळाची गरज आहे. कालानुरूप संस्कारांची रचना करणे आवश्यक आहे. विदेशात मागील दोन हजार वर्षांमध्ये अनेक प्रयोग झाले आहेत. आता जग भारताकडे आशेने पाहत आहे. सर्व समस्यांवरचे उत्तर भारत देईल, अशी आशा आहे. भारताचा आध्यात्मिक पाया मजबूत असल्यामुळे जगासमोरची आव्हाने त्यावरील उपाय भारतातच मिळू शकतात, अशी जगाला आशा आहे. समस्यांची काल सुसंगत उत्तरे देण्याची भारताची तयारी आहे का, असा सवाल त्यांनी केला.