गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाशी लढण्यासाठी भारतातील पहिली बहुउपयोगी मानवी (ह्यूमन) ‘पॅपिलोमाव्हायरस’ लस पुण्याच्या ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ने विकसित आणि उत्पादित केली आहे. ही लस खासगी बाजारात उपलब्ध झाली असून, वर्षअखेरीस ती सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात उपलब्ध करुन देण्याची सरकारची योजना आहे. त्यानिमित्ताने...
गेल्या काही वर्षांमध्ये जगभरात महिलांमध्ये आढळणार्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. शहरांपेक्षा ग्रामीण भागातील महिला आणि मुलींमध्ये प्रामुख्याने या आजाराचे अधिक निदान झाले आहे. भारतातही गर्भाशयाच्या मुखाच्या नवीन कर्करोगाच्या रुग्णांची एक ते सव्वा लाख इतकी भर वर्षाला पडताना दिसते. त्यात पूर्वीच्या कर्करोगग्रस्तांची संख्या समाविष्ट केल्यास, देशात या रोगाच्या रुग्णांची संख्या किती मोठ्या प्रमाणात वाढत आहे, याचा अंदाज यावा.
गर्भाशय मुखाच्या कर्करोगासह मुखाचा, घशाचा, स्त्रियांमध्ये स्तन आणि योनीमार्ग, पुुरुषांमधील शिश्न, प्रोस्टेटग्रंथी हे आणि इतर प्रकाराच्या कर्करोगांशी लढण्यासाठी मानवी (ह्यूमन) ’पॅपिलोमाव्हायरस’ लस विकसित करण्यात आली आहे. गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाशी लढण्यासाठी भारतातील पहिली बहुउपयोगी मानवी (ह्यूमन) ’पॅपिलोमाव्हायरस’ लस पुण्याच्या ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ने विकसित आणि उत्पादित केली. ही लस खासगी बाजारात उपलब्ध असून, वर्षअखेरीस ती सार्वजनिक आरोग्य क्षेत्रासाठी उपलब्ध करण्याची सरकारची योजना आहे. या लसीची मागणी टिकवून ठेवण्यासाठी ‘सीरम’कडून दोन ते तीन दशलक्ष डोस उत्पादित केले जात आहे. ‘दोन डोस मिळून एक कुपी’ याप्रमाणे एका डोसची किंमत सध्या दोन हजार रुपये इतकी निर्धारित करण्यात आली आहे.
गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी रुग्ण महिलेच्या गर्भाशयाची ‘पॅप स्मिअर’ किंवा ’पॅप टेस्ट’द्वारे चाचणी केली जाते. ही चाचणी झाल्यानंतर कर्करोगाचे निदान झाले आणि हा आजार पहिल्याच टप्प्यात असल्यास, शस्त्रक्रिया करून रुग्ण बरा होऊ शकतो. मात्र, या आजाराचे निदान सर्वसाधारपणे पहिल्या टप्प्यात होत नाही आणि ते तिसर्या किंवा चौथ्या टप्प्यात गेल्यावर, जर कर्करोगाचे निदान झाले तर, अशा रुग्णांना ‘किमोथेरपी’ अथवा ‘रेडिएशेन थेरपी’ने उपचार दिले जातात.
जागतिक स्तरावर गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या एकूण २७ टक्के प्रकरणे ही एकट्या भारतातील असून, हे प्रमाण जगातील महिला लोकसंख्येच्या १६-१७ टक्के इतके आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा महिलांमधील दुसर्या क्रमांकाचा सर्वात सामान्य कर्करोग असून, त्यावर लस देऊन मात करणे हाच पर्याय. ‘राजीव गांधी कॅन्सर इन्स्टिट्यूट’ युनिट हेड आणि कन्सल्टंट, गायनॅकोलॉजिक-ऑन्कॉलॉजीस्ट डॉ. सारिका गुप्ता या विषयी बोलताना सांगतात की, ”भारतात या रोगाची दरवर्षी १.२३ लाख नवीन प्रकरणे आणि सुमारे ७७ हजार मृत्यूची नोंद होते.”
लसीच्या अभ्यासासाठी मुख्य संशोधक म्हणून काम पाहणार्या डॉ. स्मिता जोशी याबद्दल सांगतात की, ”गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरुद्धचा लढण्यासाठी किशोरवयीन मुलींचे लसीकरण करणे आणि प्रौढ महिलांच्या गर्भाशयाच्या मुखाची कर्करोगासाठी नियमितपणे तपासणी करणे, हे दोनच पर्याय प्रभावी ठरतात. कर्करोगामुळे दर आठ मिनिटांनी एका महिलेचा मृत्यू होतो. त्यामुळे ३० ते ६० या वयोगटातील सर्व महिलांनी जरी त्यांना कोणतीही लक्षणे नसली, तरीही चाचणीद्वारे या रोगासंबंधीची तपासणी करणे आवश्यक आहे. भारतात कुठल्याही प्रकारच्या कर्करोगाच्या उपचारासाठी पाश्चात्त्य देशांच्या तुलनेत कमी खर्च येत असला, तरी येथील लोकांचे जीवनमान, क्रयशक्ती आणि अल्प उत्पन्नाचे स्रोत लक्षात घेता, या रोगावर लाखो रुपयांचे उपचार हे अनेकांना आजही परवडत नाहीत. त्यामुळे राज्य तसेच केंद्र सरकारचेही कर्करोग निदान, उपचार रुग्णालय तसेच मुंबईस्थित ’टाटा कॅन्सर’ रुग्णालयासारख्या अनेक सेवाभावी संस्था अत्यंत चांगल्या आणि किफायतशीर वैद्यकीय सेवा रुग्णांना देत आहेत.
नाशिकस्थित ‘एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर’चे संचालक तथा प्रसिद्ध कर्करोग उपचारतज्ज्ञ डॉ. राज नगरकर सांगतात की, ”भारत कर्करोगावरील लसीमध्ये वापरल्या जाणार्या ‘ओरीजन्स मॉलिक्यूल्स’वर संशोधन करण्याइतका आज तरी सक्षम नाही. त्यामुळे कर्करोगांच्या लसीमध्ये वापरले जाणारे ’ओरिजनल मॉलिक्यूल्स’ तसेच इतर काही गोष्टींसाठी भारताला परदेशातील संशोधन, कच्च्या मालाचा पुरवठा यावर अवलंबून राहावे लागते. तरीही आपण कर्करोगाशी लढण्यासाठी विकसित केलेली ही लस दर्जेदार आहे.” गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची कारणमीमांसा करताना डॉ. नगरकर सांगतात की, ”मुलींचा लहान वयात विवाह होणे, शारीरिक स्वच्छेतेचा अभाव, अधिक बाळंंतपणे, मासिक ऋतुचक्र दिवसात पुरेशी स्वच्छता न ठेवणे आणि अनेकांशी असुरक्षित शारीरिक संबंध ठेवणे, यामुळेही हा कर्करोग होतो. दरम्यान, शहरांपेक्षा ग्रामीण भागात या रोगाने ग्रस्त महिलांचे प्रमाण अधिक आहे,” असेही ते नमूद करतात.
काही वर्षांपूर्वी कर्करोग म्हणजे मृत्यू आणि त्यासाठीचे उपचार घेणे हे केवळ श्रीमंतांच्या आवाक्यात आहे, असे मानले जायचे. पूर्वी कर्करोगाच्या उपचारांसाठी विदेशी औषधी, लस यावर अवलंबित्व होते. मात्र, आज भारतात कर्करोगाच्या लसींसह निदान आणि परवडणार्या दरात उपचार उपलब्ध आहेत. ’सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ने तयार केलेल्या लसीसह भारताने तयार केलेल्या दोन आंतरराष्ट्रीय लसींमध्ये ‘गार्डीसिअल क्वाड्रिव्हॅलेंट’ लस तर ’गॅक्लक्सो फार्मा’द्वारे विकली जाणारी ‘बायव्हॅलेंट’ लस यांचा समावेशआहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये आरोग्य सुविधा, नवीन लसींची निर्मिती यावर प्रचंड भर देण्यात आला. ‘कोविड’ महामारीच्या अत्यंत प्रतिकूल काळातही भारताने कोरोना प्रतिबंधक लसींसह इतर विविध लसींचे संशोधन आणि उत्पादनांचा आलेखही उंचावत ठेवला. आगामी काही वर्षांत भारत जगाला सर्वाधिक औषधी, संशोधित लस पुरवठादार देश ठरेल, यात कदापि शंका नाही. त्यामुळे आयुर्वेद काळात पाच हजार वर्षांपूर्वी आरोग्य आणि उपचारांच्या बाबतीत सक्षम असणारा हिंदुस्थान, आज वैद्यक संशोधनातही ’विश्वगुरू’ होण्याकडे आगेकूच करत आहे.
निल कुलकर्णी
९३२५१२०२८४