नवी दिल्ली : अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासावर खलिस्तानी समर्थकांनी हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान २ जुलै रोजी वाणिज्य दूतावासाला आग लावण्यात आली होती. या घटनेत दूतावासाचे फारसे नुकसान झालेले नाही. अमेरिकेने याचा तीव्र निषेध केला आहे. यापूर्वी मार्चमध्येही सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासावर खलिस्तान समर्थकांनी हल्ला केला होता.
रविवार ,दि. २ जुलै रोजी दूतावासावर हल्ला करून आग लावण्यात आली. सॅन फ्रान्सिस्को अग्निशमन विभागाने तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले. या हल्ल्यात एकही कर्मचारी जखमी झाला नाही.अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी दि. ४ जुलै रोजी ट्विट करून या घटनेची माहिती दिली. “युनायटेड स्टेट्स सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासावर झालेल्या हल्ल्याचा आणि जाळपोळीच्या प्रयत्नाचा तीव्र निषेध करते. युनायटेड स्टेट्समधील मुत्सद्दी संस्था किंवा परदेशी मुत्सद्दींवर हिंसाचार किंवा हल्ला करणे हा गुन्हा आहे.", असे ट्विट त्यांनी केले होते.
एफबीआय (फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) या घटनेची चौकशी करत आहे. हल्लेखोरांनी याला कॅनडात मारला गेलेला दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येचा बदला असल्याचे म्हटले आहे. हा हल्ला अशावेळी समोर आला आहे जेव्हा शीख फॉर जस्टिस (SFJ) दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू याने ८ जुलै रोजी भारतीय दूतावासांना घेराव घालण्याची घोषणा केली आहे.
भारतीय दूतावासात जाळपोळ केल्याच्या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये बंद गेटच्या आत एका भागात अचानक आग लागते, जी काही वेळातच इतर भागात पसरते. त्याचे रेकॉर्डिंग खलिस्तान समर्थकांनीच केल्याचे मानले जात आहे. त्याने व्हिडिओच्या वर हॅशटॅग म्हणून #LongLiveKhalistan असे लिहिले आहे. नंतर, खलिस्तानींनी या घटनेची जबाबदारी स्वीकारली आणि कॅनडामध्ये जून २०२३ मध्ये मारला गेलेला दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येचा बदला असल्याचे म्हटले आहे.
अमृतपालच्या सुटकेसाठी सॅन फ्रान्सिस्कोमधील याच दूतावासाला पाच महिन्यांपूर्वी खलिस्तानवाद्यांनी लक्ष्य केले होते. त्यानंतर १९ मार्च रोजी दूतावासाबाहेर अनेक खलिस्तान समर्थक जमा झाले होते. दूतावासाची तोडफोड करण्यात आली होती. तसेच तिरंगा उतरवत खलिस्तानी ध्वज लावण्यात आला होता.
खरे तर हरदीप सिंह निज्जर यांच्या मृत्यूनंतर गुरपतवंत सिंह पन्नू भूमिगत चालले आहेत. भारतीय तपास यंत्रणा त्याचा शोध घेत आहेत. पन्नूने ३० जून रोजी जून रोजी अज्ञात ठिकाणाहून व्हिडिओ बनवून ८ जुलै रोजी भारतीय दूतावासांवर हल्ला करण्याची घोषणा केली. त्यांनी या कृत्याला 'किल इंडिया' असे नाव दिले. यादरम्यान त्यांनी २१-२१ खलिस्तान समर्थकांच्या गटाने दूतावासांवर हल्ला करण्याची घोषणा केली आहे.