इथे नोकरी सोडवून मिळेल!

    04-Jul-2023   
Total Views |
Article On Workaholic Culture In Japan

वयाच्या साधारण पंचवीशीनंतर आणि हल्ली तर त्यापूर्वीही ’नोकरी’ हा सामान्य मनुष्याच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक होऊन जातो. त्यात जर आपल्या शिक्षणाला, कौशल्याला अनुसरुन उत्तम पगाराची नोकरी असेल, तर विचारायलाच नको. अशी नोकरी शक्यतो कोणी नाकारत नाहीच. मात्र, केवळ अनुभवासाठी काही जण एक ते दोन वर्ष एखाद्या कंपनीत कशीबशी काढतात आणि त्यापेक्षा आणखी चांगली नोकरीची संधी कुठे मिळतेय का, याचा शोध घेण्यास सुरुवात करतात. जणू या एक-दोन वर्षांतच ते या नोकरीला कंटाळून जातात. हा प्रकार सर्रासपणे आपण आपल्या आजूबाजूला आणि इतकेच काय तर अगदी जगभरात पाहायला मिळतो. अर्थात, त्यामागे प्रत्येकाची कारणे ही नक्कीच भिन्न असू शकतात. मात्र, या जगरहाटीला जपान हा अपवाद! जपानमध्ये पाहिले, तर तिथे नोकरी सोडणे ही चक्क लाजिरवाणी गोष्ट असल्याचे मानले जाते आणि हे टाळण्यासाठी हल्ली इथला नोकरदार वर्ग खास एजंटची मदत घेऊ लागल्याचे समोर आले आहे.

कंपन्यांवरील व्यक्तिनिष्ठा आणि आजीवन रोजगारासाठी प्रसिद्ध मानल्या जाणार्‍या जपानमध्ये नोकरी सोडणार्‍यांना अनेकदा चुकीचे मानले जाते. एवढेच नाही तर त्यांच्या नोकरी सोडण्याच्या भूमिकेकडे ते करत असलेले लज्जास्पद कृत्य म्हणूनही पाहिले जाते. परंतु, अशा नोकरी सोडू इच्छिणार्‍यांना मदत करण्यासाठी सध्या डझनभर सेवा वर्षभरात पुढे आल्या आहेत. म्हणजे बघा, बहुतांश देशांत नोकरी लावून देणार्‍या संस्था कार्यरत असतात, पण जपानमध्ये चक्क नोकरी सोडण्यासाठी मार्गदर्शन उपलब्ध आहे. आहे की नाही कमाल? जपानची राजधानी टोकियोमधील ‘टीआरके’चे प्रमुख योशिहितो हसेगावा म्हणतात की, “गार्डियन सेवेने गेल्या वर्षभरात १३ हजार लोकांना कमीत कमी त्रासासह त्यांच्या नोकरीचा राजीनामा कसा द्यायचा, याबद्दल सल्ला दिला होता.” दुसर्‍या महायुद्धाच्या शेवटच्या दिवसात आत्मघातकी मोहिमेवर पाठवलेल्या वैमानिकांशी आपल्या क्लायंटची तुलना करत ते पुढे हेसुद्धा म्हणाले की, ’‘काहीजण असेही असतात, जे सहसा आपल्या नोकरीवर समाधानी नसतात, तरीही ते नोकरीला चिकटून राहतात.”

मुळात ‘गार्डियन’ ही २०२० मध्ये स्थापन झालेली एक ’ताईशोकू डाइको’ सेवा. म्हणजेच, ज्यांना नोकर्‍या सोडायच्या आहेत, त्या टाळण्यास ‘गार्डियन’ आजवर मदत करत आली आहे. ‘गार्डियन’च्या जवळपास निम्म्या ग्राहक या महिला आहेत. यातील काही लोक एक-दोन दिवस काम करतात आणि नंतर त्यांना लक्षात येते की, आपल्याला कमी पैशात जास्त काम करण्यास सांगितलं जातंय. या लोकांचा वयोगट पाहिला तर यात २० ते ३० वर्षांच्या युवा-युवतींचा समावेश आहे. हे लोक नवीन-नवीन नोकरी म्हणून उत्साहात काम करायला लागतात. मात्र, कालांतराने त्यांच्या लक्षात येते की, मिळणारा पगार किंवा कामाच्या वेळेबाबत पूर्वी दिलेली आश्वासने फसवी होती. मग याबाबत जपानी कायदा काय सांगतो? तर मुळात लोकांना त्यांच्या नोकर्‍या सोडण्याचा अधिकार आहेच. मात्र, ज्या व्यक्तीस काम शिकवले आणि त्यानेच नंतर नोकरी सोडल्यास निश्चितच त्याचा कंपनीवर परिणाम होऊन पुढे त्याचा त्रास होतो. आपल्या कार्यसंस्कृतीच्या आधारावर जपानने फिनिक्स पक्ष्याप्रामाणे राखेतून आकाशात भरारी घेतली असली तरी प्रत्यक्षात मात्र जपानी लोक इथल्या कार्यपद्धतीवर टीका करताना दिसतात.

जपानच्या सरकारने आपल्या ‘वर्क कल्चर’मध्ये बदल करण्याबाबत विचार करावा, असे जपानी जनमत. इतकेच नव्हे, तर अतिकामामुळे हृदयविकाराचा झटका येणे, पक्षाघात, मेंदूमध्ये रक्तस्राव किंवा कामाचा अतिताण सहन न झाल्यास आत्महत्य यांसारखे प्रकारही जपानमध्ये घडल्याच्या नोंदी आहेत. याच प्रकाराला इथे ‘कारोशी’ म्हणूनही ओळखले जाते. यामुळे जपानमधील कार्यपद्धतीच्या विरोधात गेली अनेक वर्षं आवाज उठवला जातोय. अतिकामामुळे येणारा ताणतणाव, त्यामुळे नंतर होणारे आजार यासाठीची भरपाई मागणार्‍यांची संख्यासुद्धा आता साधारण १०० ते ३०० च्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे एकंदरीत जपानमधील ‘वर्कहोलिक’ संस्कृती पाहता, नोकरी बदलणे हे नोकरदारांसमोर आव्हानच. त्यातच नोकरी सोडणे हे लाजिरवाणे म्हणून गणले जाते. त्यामुळे जपानी सरकार जनतेचा विचार करून योग्य ती पावलं नक्कीच उचलेल अशी आशा आहे; अन्यथा जपानमध्ये ‘कोरोशी’चे प्रमाण वाढत जाण्याची भीती अटळ आहे!

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक