भाट समाजाच्या कल्याणासाठी....

    04-Jul-2023   
Total Views |
Article On Akhil Maharashtra Bhat Samaj Presidnet Vinayak Suryavanshi

अखिल महाराष्ट्र भाट समाजाचे अध्यक्ष असलेले विनायक सूर्यवंशी. समाजामध्ये धर्मसंस्कृती तसेच संविधानात्मक हक्कांबाबत कार्य करणार्‍या विनायक सूर्यवंशी यांच्या जीवनाचा घेतलेला मागोवा...

ईश्वराची कृपा धन, ऐश्वर्य, संतती इत्यादी असण्यावर अवलंबून नसून, ती सद्विचाराच्या वर्तनावरच अवलंबून असते. ईश्वराच्या कृपेला तेच पुरुष पात्र होतात की, ज्यांना प्रारब्धाने भीक जरी लागली असली, तथापि असे सदाचरण कदापि विसरत नसतात.” राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे हे वचन. “राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची शिकवण कायमच मला मार्गदर्शन करते.” नागपूरमधील काटोल गावचे विनायक सूर्यवंशी सांगत होते. विक्रीकर निरीक्षक म्हणून निवृत्त झालेले विनायक हे राष्ट्र तुकडोजी महाराज भाट समाजाचे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत. तसेच ते अखिल महाराष्ट्र भाट समाजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. संत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेचा संदेश ते समाजात प्रस्थापित करत असतात. नागपूर आणि समस्त विदर्भातील भाट समाजाचे एकीकरण आणि त्यातून समाजाचा विकास, असे महत्त्वाचे कार्य ते करत आहेत.

 इतिहास काळात वंशावळी लिहिण्याचे पूर्वापार पारंपरिक काम करणार्‍या भाट समाजाचे आजचे वास्तव काय आहे? आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती काय? याचा ते सातत्याने अभ्यास करतात. समाजाने आरक्षणाचा आणि आपल्या योग्यतेचाही उपयोग केला पाहिजे, असे त्यांचे मत. समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा, त्यासोबतच समाजात शिक्षणाचा टक्का वाढवावा, यासाठी विनायक सहकार्‍यांच्या माध्यमातून सातत्याने जागृती करतात. समाजातील महिलांच्या आणि युवकांच्या कल्याणासाठी काय करता येईल, यासाठी ते नेहमीच कार्यमग्न असतात.

असेच एक कार्य. त्यांनी भाट समाजातील इच्छुकांसाठी वधूवर मेळाव्याचे आयोजन केले. समाजातील शिक्षणाचा टक्का वाढावा, यासाठी समाजसंघटनेच्या माध्यमातून काम केल्यानंतर समाजातील युवतींच्या शिक्षणाचे संख्याबळ वाढले. युवकही अतिउच्चशिक्षित झाले. पण, बहुप्रयासाने उच्चशिक्षण प्राप्त केलेल्या युवक-युवतींचा विवाहाचा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा, अनुरूप वर-वधू मिळणे थोडेसे कठीणच झाले. यातून मार्ग कसा काढायचा? तर विनायक यांनी समाजाला एकत्रित करून त्यातून भावी वधू-वरांची यादी मिळवून त्यांचे वर्गीकरण केले. एकाच छताखाली एकाच दिवशी वधूवर मेळावा आयोजित केला. त्यामुळे वधू-वर संशोधन करत चपला झिजवणार्‍या मातापित्यांचे काम आणि जबाबदार्‍या सुलभ झाल्या.

विनायक यांनी या वधू-वर मेळाव्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यातूनच मग समाजाचे एकत्रिकरण होत गेले. याचदरम्यान विनायक यांनी समाजाला जोडून ठेवण्यासाठी आणखी एक उपक्रम राबवला. तो म्हणजे समाजातील सज्जन शक्तींशी संपर्क करून या ‘आहे रे’ गटातील लोकांना ‘नाही रे’ गटासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. भाट समाज मुळातच धर्मनीती आणि माणुसकीच्या संवेदनशीलतेला मानणारा असल्याने समाजातील सज्जनशक्तीनेही या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. कोरोना काळातही विनायक यांनी गोरगरिबांना अन्नधान्य आणि इतर गरजेच्या वस्तू वितरित केल्या. या सगळ्याचे श्रेय विनायक भाट समाजाला आणि संत तुकडोजी महाराजांच्या विचारप्रेरणेला देतात.

विनायक यांच्या जीवनाचा मागोवा घेऊया. भाट समाजाचे गजानन आणि कमलादेवी सूर्यवंशी कुटुंब हे मूळचे काटोल नागपूरचे. गजानन हे धान्य आणि कापूसवर व्यवसायामध्ये मध्यस्थीचा व्यवसाय करायचे. सूर्यवंशी कुटुंबाला आठ अपत्ये. त्यापैकी एक विनायक. विनायक यांचे लहाणपण चारचौघांसाखेच होते. फरक फक्त इतकाच होता की, गजानन हे अत्यंत शिस्तप्रिय आणि कडक स्वभावाचे होते. नियमाविरोधात किंवा ठरल्यापेक्षा काही वेगळे घडले, तर त्यांना जराही खपत नसे. विनायक यांनी खूप शिकावे, अशी त्यांची इच्छा. मात्र, विनायक जुनी अकरावी अनुत्तीर्ण झाले. त्यावेळी गजानन विनायक यांना म्हणाले की, ”तू अभ्यास केला नाहीस नापास झालास. ज्यांना शिक्षणाची संधी मिळत नाही. स्वतः कष्ट करून पोट भरावे लागते, ते कसे जगतात, हे तुला कळायलाच हवे. तू तरी घर सोडून निघून जा, नाहीतर मीच निघून जाईन.” गजानन यांचा कडक स्वभाव आणि त्यानुसार असलेल्या वर्तणुकीपुढे काही बोलणे शक्यच नव्हते.

त्यामुळे विनायक यांनी घर सोडले आणि ते नागपूरला मावशीकडे राहू लागले. अर्थातच, घर सोडल्यावर विनायक कुठे जातात, यावर गजानन यांचे लक्ष होतेच. विनायक नागपूरला चश्म्याच्या दुकानात काम करू लागले. १९७०चे दशक होते ते. त्यांना २० रु. पगार होता. काम करता करता विनायक यांनी शिक्षण सुरू केले. महाविद्यालयात जाऊ लागले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांना विक्रीकर खात्यामध्ये लिपिकाची नोकरी लागली. १९७६ साल असावे ते. तोपर्यंत गजाननही थकले होते. आता कुटुंबाची जबाबदारी विनायक यांनी घेतली. या काळात त्यांना जाणवले की, इतर समाजामध्ये एकी आहे. त्यामुळे समाजात कुणी गरजू असेल, तर समाजातील मान्यवर मिळून त्याला मदत करतात.

पण, आपला समाज जन्म, विवाह आणि मृत्यू तसेच सणवाारीच एकत्र येतात. इतर वेळी संघटनात्मक एकता नाही. समाज संघटित व्हायला हवा. यातूनच मग त्यांनी विदर्भातील भाट समाजाच्या एकत्रिकरणासाठी प्रयत्न सुरू केले. त्या बिजाचा आज वटवृक्ष झाला आहे. विनायक म्हणतात की, ”समाजाच्या कल्याणात्मक यशासाठी मी शेवटच्या क्षणापर्यंत काम करणार.” भाट समाजासाठी सदैव कार्यमग्न राहण्याचा वसा घेतलेल्या विनायक सूर्यवंशी यांच्या कार्याला समाजाची साथ आहे. त्यामुळे ते त्यांचे समाजहित ध्येय नक्कीच पूर्ण करतील.

९५९४९६९६३८

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.