पंतप्रधानांच्या दौर्यासाठी पुणे सज्ज; तगडा पोलीस बंदोबस्त
पुरस्कार, विकासप्रकल्प लोकार्पण, दगडूशेठ गणपती दर्शन असे कार्यक्रमाचे नियोजन
31-Jul-2023
Total Views |
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण देखील केले जाणार आहे. यासोबतच ते पुण्यामधील दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेणार आहेत. मोदी यांच्या स्वागतासाठी पुणे सज्ज झाले असून प्रशासनासह शहर भाजपाने जोरदार तयारी केली आहे. पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली असून पाच हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे.
मोदी यांच्या दौर्यासाठी पोलीस आणि प्रशासनाने शहरात रंगीत तालिम घेतली. पुरस्कार सोहळ्याला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी अतिमहत्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. तर, विकास प्रकल्पांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी दहा हजार नागरिक पोलीस परेड मैदानावर उपस्थित राहणार आहेत. हा सार्वजनिक कार्यक्रम असणार आहे.
पंतप्रधानांचा हा दौरा एक दिवसाचा असणार आहे. ते विमानाने लोहगाव येथील हवाई दलाच्या विमानतळावर दाखल होतील. तेथून ते हेलिकॉप्टरने शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर पोचतील. त्यानंतर, ते वाहनातून कार्यक्रमस्थळी पोचणार आहेत. पंतप्रधानांच्या दौर्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. एसपीजी, फोर्सवनसह राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. शहरात दोन दिवसांकरिता ड्रोनच्या वापरास बंदी घालण्यात आली आहे.