नवी दिल्ली : यंदाच्या पावसामुळे अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला आणि विध्वंस झाला. यातच हिमाचल प्रदेशात आलेल्या पुरामुळे आतापर्यत १८७ जणांना जीव गमवावा लागला आहे.त्याचवेळी तेलंगणामध्ये एका आठवड्यात १८ लोकांचा मृत्यू झाला. तसेच सुमारे १२ हजार लोकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले. तसेच जम्मू काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्यातील एका गावात दि. २९ जुलै रोजी ढगफुटी झाली. अचानक आलेल्या पुरामुळे बरेच नुकसान झाले आहे.
दरम्यान, जिल्हा अधिकाऱ्यांनी रस्ते खुले होईपर्यंत लोकांना भूस्खलनाच्या प्रवण भागात न जाण्याचा सल्ला दिला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जीर्णोद्धाराचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच रस्ते खुले होण्याची शक्यता आहे. दि. २८ जुलै रोजी रात्री कुल्लू जिल्ह्यातील अनी भागातील जबनच्या वरच्या भागात ढग फुटले होते, त्यामुळे देवरी खाडमध्ये पूर आला होता. अचानक आलेल्या पुरामुळे फळबागांचे नुकसान झाले आणि अनेक ठिकाणी अन्नी-बरसा रस्ता वाहतुकीस अडथळा ठरला.
पाण्याचा विसर्ग वाढल्याने कोटू नाल्यातही पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, काही घरांचे व गोठ्यांचे नुकसान झाले होते, मात्र पाणी ओसरल्यानंतर आता परिस्थिती सामान्य झाली आहे. कुल्लूचे उपायुक्त आशुतोष गर्ग यांनी सांगितले की, कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. उल्लेखनीय म्हणजे, २४ जूनपासून पावसाळा सुरू झाल्यापासून हिमाचल प्रदेशात पावसामुळे झालेल्या घटना आणि रस्ते अपघातात १८७ जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार ३४ लोक बेपत्ता आहेत.