मुंबई उपनगरातील रस्त्यांचे लवकरच काँक्रीटीकरण होणार : पालकमंत्री मंगलप्रभात लोढा
30-Jul-2023
Total Views |
मुंबई : मुंबई उपनगरातील रस्त्यांचे दोन वर्षांच्या आत काँक्रीटीकरण करणार असल्याची माहिती पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. तसेच, अंधेरी येथील गोखले पुलाच्या पहिल्या गर्डरसाठी साहित्य पुरविण्यात आले असून, पुलाचे बांधकाम गतीने पूर्ण करण्याचे आदेश लोढांनी यावेळी दिले. रस्त्यावरील खड्डे भरून नागरिकांना दर्जेदार रस्ते मिळावेत यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काँक्रीटीकरण करण्याच्या सूचना मंगलप्रभात लोढा यांनी दिल्या.
दरम्यान, यावर्षी महापालिकेने केलेल्या चोख व्यवस्थेमुळे सब-वेमध्ये पाणी भरण्याची समस्या कमी झाल्याबद्दल पालिकेचे आभार मानतानाच पश्चिम उपनगरांमध्ये पावसामुळे रस्त्यांवर तयार झालेले खड्डे भरण्यासाठी रॅपिड हार्डनिंग काँक्रिट, मास्टीक अस्फाल्ट तंत्रज्ञान वापरून सुरू असलेल्या कामांची पाहणी पालकमंत्री लोढा यांनी केली.
मुंबई उपनगर मधील के पश्चिम वॉर्ड, के पूर्व वॉर्ड व एल वॉर्ड येथील इर्ला मार्ग जंक्शन, व्ही. एम. मार्ग आणि एस. व्ही. मार्ग जंक्शन,सहार मार्ग जंक्शन, साकीनाका जंक्शन, कांजूरगाव इत्यादी ठिकाणी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी रस्त्यांची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. स्थानिक लोकप्रतिनिधी, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी.वेलारासु, उपायुक्त रस्ते संजय महाले, प्रमुख अभियंता (रस्ते) मनीषकुमार पटेल आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.