असंगाशी संग....

    03-Jul-2023   
Total Views |
Opposition Party Stand And Chandrayaan 2 Mission

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या निमंत्रणावरुन तत्काळ होकार देत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल पाटण्यात हजर झाले. तिथे जाऊन एक आहोत, असा नारा देत केजरीवाल यांनी दिला. त्यानंतर काँग्रेसने केंद्राच्या अध्यादेशाविरोधात समर्थन द्यावे म्हणून केजरीवालांनी मागणीही केली. पण, काँग्रेसने त्याला भीकही घातली नाही. त्यानंतरही पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून काँग्रेस नकोे, असे सांगत विरोधकांच्या ‘महागठबंधन’ला एकप्रकारे ब्लॅकमेल करायचा प्रयत्नही करुन झाला. पण, उपयोग शून्य. म्हणूनच आता काँग्रेसला ‘आप’ने छत्तीसगढमध्ये घेरले आहे. नुकतेच केजरीवाल छत्तीसगढच्या दौर्‍यावर होते. यावेळी त्यांनी भव्य रॅली केली. त्यात त्यांनी छत्तीसगढमध्ये कोळसा आणि लोहखनिज मोठ्या प्रमाणावर असून, कमी आहे ती फक्त प्रामाणिक आणि इमानदार नेत्यांची असे म्हटले. छत्तीसगढ हे देशात भ्रष्टाचारासाठी ओळखले जाते, असा टोलाही केजरीवाल यांनी लगावला. त्यामुळे मागील आठवड्यातच पाटण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परास्त करण्यासाठी केजरीवाल चक्क काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले खरे. त्यानंतर आता छत्तीसगढमध्ये त्याच काँग्रेसला भ्रष्टाचारी म्हणून मोकळे झाले. त्यामुळे खरे केजरीवाल कोणते म्हणायचे, असा प्रश्न पडतो. जर काँग्रेस भ्रष्टाचारी आहेत, लालू यादवही चारा घोटाळ्यात तुरूंगवारी करून आले आहे, मग अशांचा संग केजरीवाल का पत्करत आहे, याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे. फुकट वाटण्याच्या आणि सरकारी तिजोरी रिकामी करून केंद्र सरकारकडे भीक मागण्याच्या सवयीने केजरीवालांनी दिल्लीनंतर पंजाबमध्ये सत्ता स्थापन केली. तसे पाहिले तर उत्तर प्रदेश, गोवा, गुजरात अशा अनेक राज्यांमध्ये त्यांची डाळ शिजली नाही. त्यामुळे त्यांनी आता पुढचे लक्ष्य काँग्रेस सत्तेत असलेल्या छत्तीसगढवर केंद्रित केले आहे. तिथेही त्यांनी फुकट वाटण्याच्या घोषणांची बरसात केली. परंतु, काँग्रेसला भ्रष्टाचारी म्हणताना त्यांच्यासोबत बैठकांना का हजेरी लावली, याचे उत्तर दिले नाही. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी पुढे सामाजिक कार्यकर्ते आणि त्यानंतरचे आता सत्तेसाठी केजरीवाल पक्के राजकारणी झालेच हेही तितकेच खरे.
 
‘चंद्रयान-३’ फत्ते होणारच!

अगदी थोडक्यात अपयशी ठरलेली ‘चंद्रयान-२’ मोहीम देश कधीही विसरू शकत नाही. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण भविष्यात नक्की यशस्वी होऊ, असा विश्वास देत तत्कालीन ‘इस्रो’ प्रमुखांना आधार दिला होता. परंतु, पंतप्रधान मोदींच्या या कृतीवरही विरोधकांनी तोंडसुख घेतले होते. पंतप्रधान मोदींच्या विश्वास आणि प्रोत्साहनामुळे आता पुन्हा एकदा नव्या जोमाने दि. १३ जुलै रोजी दुपारी २.३० वाजता भारताची ‘चंद्रयान-३’ मोहीम सुरू होत असून, यावेळी ती नक्की यशस्वी होणार आहे. कारण, त्यासाठी तितकीच मजबूत तयारी आणि खबरदारी घेण्यात आली आहे. ‘चंद्रयान-३’ पूर्णतः तयार असून यानाला घेऊन जाणारे रॉकेटही सज्ज आहे. श्रीहरिकोटा येथील ‘सतिश धवन सेंटर’ येथून ‘चंद्रयान-३’ उड्डाण भरेल. यावेळी भारत नक्कीच ‘चंद्रयान’ चंद्रावर उतरवण्यात यशस्वी होईल, कारण मागील चुकांपासून धडा घेत यावेळी जोरदार तयारी केली गेली आहे. ‘चंद्रयान-३’ला ‘चंद्रयान-२’च्या तुलनेत सुधारित आणि अद्ययावत बनवण्यात आले आहे. ‘चंद्रयान-३’ फक्त चंद्रावर उतरणार नाही, तर चालेलसुद्धा. ‘चंद्रयान’ मोहीम यशस्वी झाली, तर भारत अशी कामगिरी करणारा अमेरिका, रशिया आणि चीननंतर जगातील चौथा देश ठरणार आहे. चार वर्षांपूर्वी ’चंद्रयान-२’ चंद्रापासून अवघ्या दोन किमी अंतरावर नष्ट झाले होते; पण यावेळी असा प्रकार होण्याची शक्यता नाही. ‘चंद्रयान-३’च्या हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि सेंसरमध्ये अनेक सुधारणा केल्या असून, ‘प्रोपल्शन मॉड्युल’चा लॅण्ड बेस मजबूत करण्यात आला आहे. ‘चंद्रयान-३’ मध्ये जास्त उर्जेसाठी मोठमोठे सौर पॅनल लावण्यात आले असून, लॅण्डिंगच्या वेळी गती नियंत्रित करण्यासाठी लेझर डॉपलर वेलोसीमीटर उपकरण लावण्यात आले आहे. अल्गोरिदमदेखील बदलण्यात आले आहे. म्हणजेच ’चंद्रयान-२’पेक्षा ‘चंद्रयान-३’ अधिक अद्ययावत आहे. चंद्रावर खनिजसाठा मोठ्या प्रमाणावर असल्याने चीनने जानेवारी २०२० मध्ये ‘चंद्रयान’ मोहीम यशस्वी केली. अमेरिकाही २०२५पर्यंत चंद्रावर माणूस पाठवण्याच्या प्रयत्नात आहे. रेअर अर्थ मेटल हे खनिज चंद्रावर अधिक असून, ऊर्जानिर्मितीसाठी उपयोगात येणार्‍या सुपरकंडक्टर निर्मितीसाठी त्याचा वापर होतो. त्यामुळे चंद्रावर पोहोचण्यासाठी प्रत्येक देश प्रयत्न करतो आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.