होमियोपॅथिक केस टेकिंगमध्ये रुग्णाचे स्वत:चे गुणधर्म, तसेच आजाराचे गुणधर्म असे दोन्हीही तपासले जातात. कारण, माणसांचे स्वत:चे गुण हे रुग्णाच्या वैयक्तिकीकरणाकरिता महत्त्वपूर्ण असतात. उदाहरणार्थ, तापाच्या दोन रुग्णांमध्ये तापाची लक्षणे सारखीच दिसत असली तरी रुग्णाची स्वत:ची लक्षणे भिन्न असू शकतात. जसे पहिल्या रुग्णाला तापात थंडी वाजते, तर दुसर्याला गरम होते. पहिल्याला तापात भरपूर तहान लागते, तर दुसर्याला पाणी पिण्याचीही इच्छा होत नाही. तसेच, एखादा रुग्ण तापात खूप अस्वस्थ असतो, तर दुसरा निपचित पडून राहातो इत्यादी.
ही सर्व लक्षणे त्या माणसाची आजारातील लक्षणे असतात व त्यामुळेच फार महत्त्वाची असतात. कारण, होमियोपॅथीमध्ये आपण नुसत्या आजाराला नाही, तर आजारी माणसाला उपचार करत असतो, ही सर्व लक्षणे ही त्या आजारी माणसाच्या चैतन्यशक्तीची असतात. आजारपणाच्या स्थितीला माणूस ज्याप्रकारे अंगीकरतो, त्याचप्रमाणे त्याची चैतन्यशक्ती शरीरावर लक्षणे व चिन्हे दर्शवत असते म्हणूनच आपण म्हणतो की, होमियोपॅथी नुसत्या आजाराला उपचार करत नाही, तर आजारी माणसाचा उपचार करते.
Homoeopathy treats the man in disease & not the disease in man. ऊर्जा नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जाते. पाणीसुद्धा नेहमी उंच भागाकडून सखल भागाकडे वाहते. तसेच माणसाचा आजार व त्यामुळे त्याच्या शरीरातील चैतन्यशक्ती जी एक ऊर्जा आहे, तिच्यामध्ये होणारे बदल हे नेहमी केंद्राकडून परीघाकडे जाणारे असतात (From centre to periphery) या केंद्रामध्ये तयार होणारी जी स्थिती असते, तीच आजाराचे मुख्य कारण असते. म्हणजेच काय तर आजार हा काही नुसत्या अवयवांचा नसतो, तर तो संपूर्ण चैतन्यशक्तीमध्ये झालेला बिघाड असतो, त्याची सर्वसाधारण अवस्था व स्थिती कशी आहे, यावर आजाराची लक्षणे ठरतात. अवयवांवर दिसणारी आजाराची लक्षणे ही या मुख्य बिघाडामुळे दिसणारी लक्षणे असतात. माणसाची जी आजारी स्थिती(altered state of disposition) जो माणूस आजारपणात कसा वागतो, बोलतो त्याला काय आवडते व काय आवडत नाही, तो काय सहन करू शकतो व काय नाही, यावर अवलंबून असते. ही स्थितीच औषधाने बदलायची असते. अवयवातील बदल त्यामुळे आपोआप बदलतात.
The whole concept of disease is thus changes being something local to being something general. तसेच नुसत्या आजाराच्या नावामागे न जाता वैयक्तिकीकरणाने आजाराचा अभ्यास करणे, हा आजाराचा ‘कॉन्सेप्ट’ आहे. याप्रमाणे होमियोपॅथीत आजाराला उपचार केले जातात. म्हणूनच आजाराला एकच औषध देण्यापेक्षा आजारी माणसाचा अभ्यास करून जेव्हा त्याला व त्याच्या प्रकृतीला उत्तमप्रकारे लागू पडेल, असे औषध जेव्हा शोधले जाते, तेव्हाच ते चैतन्यशक्तीमधील कमकुवतपणा काढून टाकते व आजाराचे मूळ नष्ट होते. (क्रमशः)
डॉ. मंदार पाटकर
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)
९८६९०६२२७६