मुंबई : राज्यातील अंगणवाडी सेविकांना लवकरच अद्यावत आणि नवे मोबाईल फोन मिळतील , अशी ग्वाही महिला विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दि. २९ जुलै रोजी दिली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोबाईल उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात उच्च न्यायालयांना दिलेल्या निर्देशांवर कार्यवाही सुरू आहे. लवकरच कर्मचाऱ्यांना मोबाईल फोन दिले जातील, अशी माहिती आदिती तटकरे यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली. याबाबत सतेज पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे या मुद्द्यावर सरकारचे लक्ष वेधले. राज्यात एक लाखापेक्षा अधिक अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत. राज्य शासनाकडून अंगणवाडी सेविकांना ऑनलाईन कामासाठी देण्यात आलेले मोबाईल फोन सदोष व कालबाह्य झाले आहेत. याबाबत मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार चार महिन्यात नवीन मोबाईल देण्याबाबत सरकारने कोणती कार्यवाही केली असा सवाल आमदार पाटील यांनी केला. मात्र आता आदिती तटकरेंनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल मिळणार आहे.