लखनऊ : उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात मोहरमपूर्वी गोवंशाचे अवशेष सापडल्याने परिसरात तणावाचे वातावरण आहे. हे अवशेष गाईच्या वासराचे असल्याचे सांगितले जात आहे. मात्र हे अवशेष एका मंदिराजवळ सापडल्याने तणावाचे वातावरण परिसरात निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. संतप्त जमावाने घोषणाबाजी केली. दुसरीकडे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती आटोक्यात आणली आहे. लवकरच आरोपींला पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल , असे आश्वासन पोलीसांनी दिले आहे. ही घटना दि. २८ जुलै रोजी घडली.
हे प्रकरण सोनभद्र जिल्ह्यातील रॉबर्टसगंज पोलिस स्टेशनशी संबंधित आहे. येथील भाजी मंडईजवळ प्राचीन हनुमान मंदिर आहे. दि. २८ जुलै रोजी या मंदिराजवळ कत्तल केलेल्या गोवंशाचे अवशेष आढळून आले. काही वेळातच ही बातमी सर्वत्र पसरली आणि घटनास्थळी लोकांची गर्दी होऊ लागली. या प्रकरणाची माहिती मिळताच हिंदू संघटनेचे सदस्यही तेथे पोहोचले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली. अतिरिक्त पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला आणि त्यांनी लोकांना समजवण्याचा प्रयत्न सुरू केला.
सोनभद्रच्या अतिरिक्त एसपीच्या म्हणण्यानुसार, हनुमान मंदिरामागील रिकाम्या जागेत गुरांचे अवशेष सापडले होते, जे काढण्यात आले आहेत. अर्ज घेतल्यानंतर याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात येत आहे.असे कृत्य कोणी केले असेल, त्याच्यावर ठोस कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मोहरमपूर्वी वातावरण बिघडवण्याचा हा कट असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. जनतेला सर्व काही कळते आणि समजते असे पोलिसांचे म्हणणे असले तरी सध्या परिस्थिती सामान्य आहे.
सध्या मंदिराची स्वच्छता करण्यात आली आहे. पोलिसांच्या अनेक पथकांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. जवळपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.