मणिपूर हिंसाचारात परकीय शक्तीचा हात नाकारता येणार नाही : माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे
29-Jul-2023
Total Views |
नवी दिल्ली : ईशान्य भारतातील बंडखोरांना चीनद्वारे मदत दिली जाते. त्यामुळे मणिपूर हिंसाचारामध्येही परकीय शक्तींचा हात असण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे मत देशाचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी व्यक्त केले आहे.
दिल्लीस्थित इंडिया इंटरनॅशनल सेंटरतर्फे आयोजित नॅशनल सिक्युरिटी परस्पेक्टिव्ह या कार्यक्रमास माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी संबोधित केले. यावेळी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या संघर्षाविषयी ते म्हणाले, सीमावर्ती भागांमध्ये अस्थिरतेमुळे साहजिकच राष्ट्रीय सुरक्षेवर परिणाम होत असतो. प्रामुख्याने देशातील अनेक बंडखोर संघटनांना चीनतर्फे भारतात अस्थिरता निर्माण करण्यासाठी मदत केली जाते, हे सिद्ध झाले आहे. चीन अशा संघटनांना दीर्घकाळपासून मदत करत असून ती अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे मणिपूरमध्ये सुरू असलेल्या संघर्षामध्येही परकीय शक्तीचा हात असल्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे माजी लष्करप्रमुख म्हणाले.
भारतास कोणतीही अतिरिक्त प्रादेशिक महत्त्वाकांक्षा नसल्याचे जनरल नरवणे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. प्रत्येकाने आपली भूमिका बजावली पाहिजे. राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ बाह्य सुरक्षेपेक्षा अधिक आहे, तिचे अनेक आयाम आहेत. राष्ट्रीय सुरक्षेबरोबरच देशाची अन्न, ऊर्जा आणि आरोग्य सुरक्षा देखील महत्त्वाची आहे. देशाची लोकसंख्या निरोगी नसेल, तर सशस्त्र दलांसाठी मनुष्यबळ कुठून येणार हा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला अधिक व्यापक संदर्भात पाहणे आणि समजून घेणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.
अंदाज बांधण्याची गरज नाही
जे जबाबदार पदांवर बसलेले आहेत आणि ज्यांच्याकडे आवश्यक कारवाई करण्याची जबाबदारी आहे, ते त्यांचे काम अधिक चांगल्या पद्धतीने करत आहेत; यात कोणतीही शंका नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी कोणत्याही प्रकारचा अंदाज व्यक्त करणे टाळायला हवे, असे प्रतिपादन माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी मणिपूरच्या संदर्भात केले आहे.