पडद्यामागची आई...

    29-Jul-2023
Total Views |
Article On Late Veteran Actress Sulochana Latkar

दि. ४ जून रोजी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर उर्फ सुलोचना दीदी यांचे वयाच्या ९४व्या वर्षी निधन झाले. रुपेरी पडद्यावर आई, वहिनी, पत्नी अशा विविधांगी भूमिका अगदी लीलया साकारलेल्या सुलोचना दीदी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही तितक्याच प्रेमळ; पण शिस्तप्रिय स्वभावाच्या होत्या. तेव्हा, पडद्यामागच्या आपल्या आईच्या भावस्पर्शी आठवणी, स्वभाववैशिष्ट्ये यांना सुलोचना दीदींच्या कन्या कांचन घाणेकर यांनी दिलेला हा उजाळा...

सुलोचनादीदी मोठ्या पडद्यावर जशा दिसायच्या, तशाच त्या वैयक्तिक जीवनातदेखील होत्या. अमोल पालेकरांसारख्या चिकित्सक नटाने एकदा म्हटले होते की, “चित्रपटात आणि प्रत्यक्ष जीवनात सारखी दिसणारी एकमेव अभिनेत्री म्हणजे सुलोचनादीदी. प्रेमळ, काळजी करणार्‍या, कोणतेही संकट आले, तरी त्या न डगमगता संकटाचा सामना करणार्‍या दीदी होत्या. पुरूष कसे ताकदीने कोणत्याही संकटाला भिडतात, तशा त्या निडरपणे संकटाला सामारे जायच्या. त्या फक्त एकाच गोष्टीमुळे हतबल व्हायच्या ती म्हणजे, त्यांच्यापेक्षा लहान वयाच्या कोणत्याही नातलगाचे किंवा कलाकाराचे आकस्मिक निधन झाले, तर मात्र त्या बेचैन आणि दुःखी व्हायच्या.” अभिनेते विनोद मेहरा जेव्हा सात-आठ वर्षांचे होते, तेव्हा ’बालयोगी’ म्हणून एक चित्रपट आला होता. त्यात सुलोचनादीदींनी त्यांच्या आईची भूमिका केली होती. विनोद मेहरांचे त्यानंतर अतिशय लहान वयात निधन झाले. त्यावेळी अगदी त्या स्तब्ध झाल्या होत्या. त्यानंतर संजीव कुमार गेले, तर त्यांच्याहून वयाने लहान असणार्‍या कलाकारांचे निधन झाले, तर त्यांच्या अंत्ययात्रेलादेखील जाणे; त्या टाळत. मला आठवतं, ज्यावेळी विनोद मेहरा यांचे निधन झाले आणि आम्ही दीदींसोबत त्यांच्या घरी गेलो होतो, त्यावेळी दीदींना बघून विनोद मेहरा यांच्या आईने ‘आपका लडका चला गया’ असे म्हणत हंबरडा फोडला होता. ज्यावेळी खरी आईचं असं म्हणते, त्यावरून सगळ्यांवर दीदी किती प्रेम करत होत्या, याची प्रचिती नक्कीच येते.

दीदींचे आवडीचे छंद

चित्रपट, नाटक पाहण्याची त्यांना भयंकर हौस. ६०-७०च्या दशकात ज्यावेळी त्या अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होत्या, त्यावेळी एक शिफ्ट आठ तासांची असायची. अशा त्या दिवसाला तीन शिफ्ट करायच्या. आम्हाला झोपेतून जेव्हा जाग यायची, ७ वाजता तेव्हा दीदी शुटिंगला जायच्या आणि ज्यावेळी त्या परतायच्या रात्री त्यावेळी आम्ही झोपलेलो असायचो. पण, चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान कोणत्याही कलाकाराची अचानक तब्येत खराब झाली किंवा अन्य कारणांमुळे जर का चित्रीकरण थांबले, तर लगेचच स्टुडिओमधूनच जिथे चित्रपटाचा शो लागला असेल, त्या चित्रपटगृहाच्या मालकाला फोन करून तिकिटे बूक करून ठेवायच्या. आम्ही किंग जॉर्ज शाळेत शिकायला होतो. आम्हा भावंडांना त्या गाडीने घ्यायला यायच्या. गमतीचा भाग म्हणजे, आम्ही शाळेचे कपडे गाडीतच बदलायचो आणि चित्रपट पाहायला जायचो. शुक्रवारी चित्रपटगृहात जो पहिला चित्रपट लागेल तो पाहायचाच, असा अट्टहास दीदींचा होता. याव्यतिरिक्त त्यांना विविध प्रकारचे पदार्थ खायचीदेखील खूप आवडत होती. शाकाहारी असो किंवा मासांहारी, कोणत्याही जेवणाला त्यांच्या तोंडी ‘नाही’ हा शब्द नव्हता. पिठलं, भाकरी, पुरणपोळी, मोदक हे पदार्थ त्यांच्या अधिक आवडीचे. अनेकदा काय व्हायचं की, कुणी ना कुणी त्यांना घरी जेवायला बोलवायचं. त्यावेळी लोकं विचारायचे की, तुम्हाला जेवणात काय आवडतं दीदी? तर त्यांना एकच उत्तर द्यायच्या की, “मला पिठल्यापासून ते पुरणपोळीपर्यंत जेवणाचे सर्व पदार्थ आवडतात. तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही करा.” इतकंच नाही तर त्यांना विणकामाची प्रचंड आवड होती. त्या लोकर दिल्लीहून मागवायच्या आणि लोकर विणून नातलग आणि सहकलाकारांना भेट द्यायच्या.

लहानपणापासूनच आम्ही एकत्र कुटुंबात वाढलो. दीदींवर कुणी सगळ्यांचा भार टाकला नव्हता. पण, त्यांना सगळ्यांची काळजी घ्यायला खूप आवडायची. आमचं १६ माणसांचं कुटुंब होतं. माझ्या दोन मामांची आठ आणि मी अशा नऊ मुलांचा त्यांनी सांभाळ केला. दीदींनी कोल्हापूर ते पुणे आणि पुणे ते मुंबई असा प्रवास सगळ्या कुटुंबाला घेऊन केला. कोल्हापूरपासून ३० मैलांवर खडकलाक म्हणून गाव आहे. ते सुलोचना दीदींचं मूळ गाव. त्यानंतर त्या कोल्हापुरात भालजी पेंढारकर यांच्या ’जयप्रभा’ स्टुडिओत नोकरी करण्यासाठी आल्या. त्यावेळी तिथे ३५०-४०० लोकं कामाला होती. तिथे दीदी ‘एक्स्ट्रा’ म्हणजे आताच्या काळातील ‘ज्युनिअर आर्टिस्ट’ म्हणून कामाला होत्या. १९४३ साली ३० रुपये महिना पगारात त्या ’जयप्रभा’ स्टुडिओत नोकरी करत होत्या. तिथे १९४३-४८ या काळात त्या साहाय्यक अभिनेत्री, प्रमुख अभिनेत्री, मुख्य नायिका असा त्यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास घडला. भालजी पेंढारकर प्रामुख्याने ऐतिहासिक चित्रपट करत. त्यावेळी प्रत्येक कलाकाराला प्रशिक्षण देण्याचे काम पेंढारकर करत असत. म्हणजे घोडेस्वारी शिकवणे, तलवारबाजी, लाठी-काठी अशा सर्व प्रशिक्षणातून तिथे कलाकार घडत होते. इतकचं नाही, तर स्त्रियांनी नऊवारी नेसून हे सर्व प्रशिक्षण घ्यावे, असा पेंढारकरांचा अट्टहास असायचा.

रंगू ते सुलोचना...

सुलोचनादीदींचं खरं नाव हे रंगू होतं. पण, दीदींचे गुरू भालजी पेंढारकर यांनी ते बदलून सुलोचना असे ठेवले. दीदींच्या डोळ्यांवरून भालजी पेंढारकरांनी त्यांचे नाव सुलोचना ठेवले आणि मुळात त्यांना सुलोचना हे नावच फार आवडत होते. पूर्वी मुकपटाच्या अभिनेत्री रुबी यांचेही नाव त्यांनी सुलोचना असे ठेवले होते. इतकंच नाही, तर भालजींनी स्वतःच्या मुलीचे नाव पण सुलोचना ठेवले होते. सुलोचना दीदींनी हिंदी क्षेत्रातही अभिनेत्री म्हणून नावलौकिक मिळवला. परंतु, त्यांचे मराठीवर विशेष प्रेम होते. बर्‍याचदा हिंदीत कामं कमी झाली की, कलाकार मराठी चित्रपटसृष्टीकडे वळायचे. मुंबई, हैदराबाद आण मद्रास या तीन ठिकाणी दीदी हिंदी चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी जात असत. आणि इतका प्रवास त्यांना एकावेळेस जमत नव्हता. म्हणून महिन्याचे सुरुवातीचे तीन आठवडे हिंदी चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी आणि शेवटचा आठवडा मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी राखून ठेवलेला असायचा.

दीदींच्या रागाचा पारा चढलाच...

माझ्या अगदी लहानपणी माझे वडील गेल्यामुळे माझ्यासाठी आई आणि वडील दोन्ही दीदीच होत्या. खरं तर आम्ही सगळी भावंडं त्यांना खूप घाबरायचो. आम्ही दीदींच्या आईसोबत जास्त काळ घालवायचो. पण, ज्यावेळी आजीचं निधन झालं, त्यानंतर आम्ही भावंडं दीदींशी बोलायला लागलो. आदरयुक्त भीती होती अर्थात! मी त्यांना ‘आत्ती’ म्हणायचे.आणि एक महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी त्या चिडायच्या किंवा रागवायच्या त्यावेळी त्या गप्प व्हायच्या. ज्या दिवशी त्या गप्प बसल्या असतील, त्यादिवशी आम्ही समजून जायचो की, त्यांचं काहीतरी बिनसलं आहे. यावरून एक किस्सा मला आठवतो. तो असा, माझे वडील वारल्यानंतर १९५६ साली कोल्हापुराहून मुंबईत आले. आणि कोल्हापुरातून आल्यामुळे माझी भाषा कोल्हापुरी होती. त्यामुळे शाळेत मी बोलायला लागले की, सगळे माझी खिल्ली उडवायचे आणि त्यात सुलोचना दीदींची मुलगी म्हणून मला बघायला अनेक जणं यायची. त्यामुळे मी बोलले की, मला हसायचे सगळे. मग मला शाळेतही जावसं वाटायचं नाही आणि मला कोल्हापूरला निघून जावं असं वाटायचं आणि हळूहळू मी शाळा चुकवायला लागले.

पण, दीदी स्टुडिओमधून घरी फोन करून विचाराच्या की, मी शाळेत गेले आहे की नाही. एकेदिवशी त्यांच्या रागाचा कडेलोट झाला आणि अक्षरशः त्या चित्रीकरण थांबवून मेकअपमध्येच घरी आल्या आणि मला खोलीत नेऊन त्यांनी डोक्यापासून पायापर्यंत फोडून काढलं आणि माझ्याकडून वचन घेतलं की, तू रोज शाळेत जाशील आणि मी ते वचन दिलं आणि थेट ’एमए’पर्यंतचं शिक्षण करूनच मी थांबले! दीदी प्राथमिकपर्यंतच शिकल्या होत्या. त्यांना स्वतःला जरी शिक्षणाची आवड नसली, तरीही त्यांना शिक्षणाचे महत्त्व माहीत होते. त्यामुळे माझ्यासह इतर भावंडांनी ‘ग्रॅज्युएट’ झालंच पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. माझी मुलगी तिसरीला असतानाच त्यांनी मला सांगितलं होतं की, तिला कॉम्प्युटर क्लासला घाल. कॉम्प्युटर म्हणजे काय, हे काहीही माहीत नसताना केवळ आताच्या काळाजी ती गरज आहे. याची जाणीव त्यांना असल्यामुळे त्यांनी मला तिला त्याचे क्लास लावायला सांगितले होते.

दीदींची शिस्त...

सुलोचना दीदींचा एक नियम होता की, घरात ‘गॉसिप’ करायची नाही. चित्रपटात काम करणार्‍या लोकांबद्दल काहीही बोलणे किंवा त्यांची टिंगल करायची नाही, अशी तंबीच त्यांनी आम्हाला दिली होती. कधीतरी चुकून आम्ही बोललो की, ‘काय काम केलं आहे, या नटाने किंवा नटीने,’ तर त्यावर त्या आम्हाला म्हणायच्या की, ‘मेकअप करा आणि पाच मिनिटं कॅमेर्‍यासमोर उभे राहा, त्यावेळी अभिनय काय असतो; हे कळेल.’ दीदी तशा फार शिस्तीच्या होत्या. त्यांचं एक स्वभाव वैशिष्ट्य होतं, ते म्हणजे कोणतीही गोष्ट स्वतःच्या कानाने ऐकल्याशिवाय किंवा पाहिल्याशिवाय त्यावर काहीही बोलायचे नाही किंवा कोणत्याही बाबीचा एकतर्फी विचार करायचा नाही आणि हेच गुण माझ्यात तंतोतंत उतरले आहे. दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे, माणसं जोडून ठेवण्याचं कसब दीदींमध्ये होतं. त्या कायम म्हणायच्या की, ‘माझ्याकडे पैसे किती आहेत, मला माहीत नाही. पण, मी रात्री-अपरात्री फोन जरी केला, तरी १०० माणसं माझ्यासोबत उभी राहतील.’

पैशांपेक्षा जास्त माणसं कमावली!

‘गोदावरी’ पुरस्कार दीदींना मिळाला होता. त्यावेळी ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनी दीदींची मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्यांनी प्रश्न विचारला की, “दीदी, तुमचा लोकसंग्रह इतका प्रचंड आहे. त्याचं कारण काय?” त्यावर त्या म्हणाल्या की, “प्रत्येक ठिकाणी पैसा उपयोगाला येत नाही. माणसचं धावून येतात आणि केवळ समोरच्यांनीच आपल्याला न देता, मी पण त्याची परतफेड करते.” भालजी पेंढारकरांनी त्यांना एक शिकवण दिली होती की, तुमच्याकडे दहा रुपये असतील, तर आठ रुपये स्वतःसाठी ठेवा. पण, दोन रुपये तरी समाजासाठी खर्च करा. कारण, आपण त्यांचं काहीतरी देणं लागतो आणि ही शिकवण दीदींनी कायम पाळली. दीदींनी अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. पण, ‘वहिनीच्या बांगड्या’ या चित्रपटातील त्यांची भूमिका मात्र प्रेक्षकांच्या सदैव स्मरणात राहिली. त्यामुळे आम्ही कोणत्याही समारंभाला गेलो, तरी दीदींची ओळख करून देताना ‘वहिनी’ अशीच करून देत असत. त्यामुळे दीदींनी हा एक जरी चित्रपट केला असता, तरीही प्रेक्षकांनी त्यांच्यावर आजन्म भरभरून प्रेम केलं असतं. आभाळाएवढ्या दिग्गज कलाकारांच्या आजूबाजूला फिरकायची संधी आम्हाला सुलोचनादीदींकडून मिळाली, हे आमचं भाग्यच!

महाराष्ट्र शासनाचा चित्रपट महोत्सव १९६१ साली सुरू झाला होता. त्याच पहिल्या वर्षी ‘प्रपंच’ चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पहिला पुरस्कार दीदींना मिळाला होता आणि त्यानंतर पुढे पुरस्कारांची रांगच लागली. दीदींना घरात त्यांचे फोटो लावलेले आवडायचे नाहीत. दीदींची नाळ त्यांच्या गावाशी जोडलेली होतीच. दरवर्षी त्या गावी जायच्या. पण, मामा वारल्यानंतर दीदींचं जाणं गावाकडे कमी झालं आणि त्यांना गावी आणि कोल्हापुरात त्यांच्या वयाची, ओळखीची माणसं नसल्यामुळे करमायचं नाही. त्यामुळे त्या मुंबईतच शेवटपर्यंत रमल्या. त्यांच्या स्मृती आमच्या मनात कायम राहतील...

कांचन घाणेकर
(शब्दांकन : रसिका शिंदे-पॉल)