मणिपूर...गेल्या काही दिवसांपासून भारतीय राजकारणाच्या, समाजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले राज्य. मैतैयी विरुद्ध कुकी संघर्ष उफाळून आल्यानंतर जाळपोळ, अत्याचारांची मालिका न थांबल्याने मणिपूर हिंसाराचाराच्या आगीत पेटत राहिले. त्यातच नग्न महिलांची धिंड काढल्याचा अत्यंत लाजीरवाणा प्रकार समोर आल्याने पेटत्या मणिपूरमधील दाहकता अधिकच भडकली. विरोधक आणि भारतद्वेष्ट्या शत्रूंनीही यात उडी घेऊन आपले अजेंडे पद्धतशीरपणे पेरले. या सर्व बातम्या, प्रचार-अपप्रचाराच्या धामधुमीत मणिपूरचे सौंदर्य, तेथील जनजातींचे आदरातिथ्य, समृद्ध संस्कृती या गोष्टी कुठे तरी मागे पडल्या. तेव्हा, प्रत्यक्ष मणिपूरमध्ये वास्तव्य करुन तेथील जनजातींना, त्यांच्या प्रथा-परंपरांना अगदी जवळून अनुभवलेल्या सुहास पाठक यांनी मणिपूरमधील वनवासी कल्याण आश्रमाचे कार्य आणि एकूणच त्यांचा अनुभव या लेखात शब्दबद्ध केला आहे.
ईशान्य भारतातील आठही राज्य जंगल, नदी, उत्तुंग पर्वतांनी व्याप्त आणि नैसर्गिक दृष्टीने संपन्न असे क्षेत्र. आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालय, मिझोराम, नागालॅण्ड, सिक्कीम, मणिपूर हे सर्व जनजाती, वनवासीबहुल क्षेत्र आहेत. या राज्यात प्रत्येक जनजातीची आपली भाषा, उत्सव, पोषाख, गीत, नृत्य, परंपरा, पूजा पद्धतीही तितक्याच भिन्न आहेत. सांस्कृतिक परंपरा जपणारे, नादब्रह्माचा साक्षात्कार करणारे संगीत, नृत्यकला, खेळात पुढे असणारे विविध बोलीभाषा बोलणारे विविध रंगांच्या फुलांनी एखादी बाग जशी आपण बघतो, तसे विविधतेने नटलेले हे प्रदेश आहेत. या विविधतेला विदेशी मिशनर्यांनी विभेद करून जनजाती समुदायाला सांगितले की, ’तुम्ही भारतीयांपेक्षा वेगळे आहात. तुम्ही मंगोलियन आहात. तुमचे रूप, खानपान, वेशभूषा वेगळी आहे. बाकी भारतीय आर्य आहेत.’ अशा प्रकारे भोळ्या, अशिक्षित जनजाती बंधूंना त्यांनी कपटाने भ्रमीत करून प्रलोभन, धाक दाखवून, सर्व प्रकारचे शोषण करून सेवेच्या माध्यमातून धर्मांतर केले. धर्मांतरण हे विदेशी पैसा, साधनसामग्री, मानव संसाधन, राजकीय सत्तेद्वारा बिनबोभाटपणे या प्रदेशात चालत आले. धर्मांतरणामुळे या क्षेत्रात दहशतवाद, फुटीरतावादाची बीजे रोवली गेली.
भगवान बिरसा मुंडा देखील म्हणाले होते की, “टोपी-टोपी एक आहे. इ़ंग्रज सरकार व ख्रिश्चन मिशनरी हे एकच आहेत. चर्च ही चौथी सेना होती.” स्वामी विवेकानंद म्हणाले होते की, “एक माणूस धर्मांतरित होणे, म्हणजे एक शत्रू निर्माण होणे.” हे ईशान्य भारताच्या बाबतीत अक्षरशः सत्यात उतरले. धर्मांतरित व्यक्तीला आपला देश, आपला समाज, आपले कुटुंब, आपली संस्कृती, आपले रितीरिवाज, पूजा पद्धती हे सर्व परके वाटू लागते. प्रथम मोठ्या प्रमाणात धर्मांतरण करणे व त्या समुदायाला देशाविरोधात भडकवणे, ही विदेशी नीती आहे. अशा परिस्थितीत वनवासी कल्याण आश्रमाचे आव्हानात्मक कार्य गेले ४३ वर्षं अविरतपणे सुरु आहे. कार्यकर्त्यांनी विविध जनजातीच्या वर वर दिसणार्या विविधतेत अंतरंगातील सांस्कृतिक एकता या विषयांचे अध्ययन केले, ते दृढ करण्यासाठी विविध कार्यक्रम-उपक्रमही राबविले. भूमी आपली माता आहे, ही धारणा संपूर्ण भारतवर्षात आहे. जनजाती बंधूंमध्ये याची अनुभूती अधिक प्रकर्षाने पाहायला मिळते. त्यांच्यासोबत कार्य करताना अशा अनेक समान गोष्टी बघायला मिळाल्या आणि त्याआधारे आपण नक्कीच म्हणू शकतो की, वनवासी बंधू आपलाच आहे.’तू मैं एक रक्त.’
पाच प्रमुख माध्यमातून वनवासी कल्याण आश्रमाचे कार्य देशभरात चालू आहे. ते प्रमुख पाच आयाम म्हणजे- १)जागरण, २)सेवा ३) हित रक्षा ४) सर्वांगीण विकास ५) संघटन. एक उदाहरण आपण पाहूया. दि. २ एप्रिल २००२ रोजी विविध जनजाती संघटनांच्या प्रमुखांना एकत्रित करून जनजाती धर्म, संस्कृती सुरक्षा मंचाचे गठन केले. त्याअंतर्गत सेमिनार आयोजित केले गेले. ’जागता पूर्वांचल’, ’ऑपरेशन नॉर्थ ईस्ट,’ असे जनजाती प्रमुखांचे भ्रमण कार्यक्रम संपन्न झाले.
दि. २४ ते २८ डिसेंबर २००६ रोजी गुवाहाटीला पाच हचार जनजाती युवकांचे संमेलन संपन्न झाले. त्यात विराट शोभायात्रा व मातृहस्ते भोजन असे सामाजिक समरसतेचे अभूतपूर्व कार्यक्रम संपन्न झाले. दि. २५ डिसेंबरला निघालेल्या शोभायात्रेत घोषणा होत्या की, ’देश की रक्षा कौन करेंगे हम करेगें, हम करेंगे‘, ‘धर्मांतरण बंद करो बंद करो,’ असे देश व धर्माप्रती कटिबद्ध असलेल्या घोषणा दिल्या गेल्या.
आता सध्या चर्चेत असलेल्या ईशान्य भारतातील मणिपूरविषयी थोडक्यात माहिती करुन घेऊया.
अष्टकन्यांपैकी एक सुंदर प्रदेश म्हणजे मणिपूर. ‘आझाद हिंद सेना’ नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी प्रथम तिरंगा ध्वज फडकवणारे मोयरांग गाव, तरंगती घरं असणारा लोकताक तलाव, समतल व पर्वतीय क्षेत्रात विभागलेले देखणे चैतन्य महाप्रभू यांचा प्रभाव असलेले मणिपूर हे जरूर बघावे असे राज्य. आज गेले तीन महिने ईशान्य भारतातील हेच मणिपूर राज्य प्रत्येक दिवशी वर्तमानपत्र, दूरदर्शनवर गाजते आहे. युरोप खंडामध्ये भारतविरोधी शक्ती कार्यरत आहेत आणि त्यांनीही याबाबत अप्रचाराचे रान पेटवले आहे. म्हणूनच आज मणिपूरविषयी सांगावे, असे वाटले.
माझा मणिपूर प्रवेश
१९८९ साली अखिल भारतीय संघटनमंत्री भास्कररावजींनी मणिपूरला जाण्याविषयी चर्चा केली. मी १९८५ साली भिलाई येथील अखिल भारतीय महिला संमेलनात मणिपूरची रणरागिणी राणी गाईदिन्ल्यु माँ यांना भेटलो होतो. त्यांनी व त्यांचा भाऊ हैपोव जादोनांगयांचा पराक्रमही ऐकला होता. ’देश, देव अन् धर्मासाठी प्राण वेचलं आई’, ‘शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’ हे गीत ते दोघे जगले होते. त्यामुळे मला तेव्हापासून मणिपूरला जायची इच्छा होती. पण, मी आता एकटा नव्हतो. माझे लग्न सोलापूर निवासी अंजली रंगनाथ सारोळकर हिच्याशी १९८८ झाले. लग्न होण्यापूर्वी आम्ही भेटलो. तेव्हा मी बोललो होतो की, संघटन सांगेल, त्याठिकाणी मी जाणार. मान्य असेल, तर पुढे पाऊल टाकू. अंजलीने नाशिकला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ कार्य केले होते. तिला सांगितले, तीही तयार झाली. आमची कन्या प्रचिती १९८९ साली अवघी सहा महिन्यांची होती. मणिपूरमध्ये प्रचंड थंडी. हवामान वेगळे, खानपान वेगळे, भाषा वेगळी, भौगोलिक परिस्थिती तर त्याहूनही वेगळी. पण, आम्ही मनाची सर्व तयारी करून १९८९ नोव्हेंबरला मणिपूरसाठी प्रस्थान केले.
मणिपूरचा संक्षिप्त इतिहास
मणिपूरच्या राजवंशाचा लिखित इतिहास राजा पाखंगबापासून सुरू होतो. १८१९ ते १८२५ बर्मी लोकांनी या प्रदेशावर शासन केले. दि. २४ एप्रिल १८९१ खोंगजाम युद्धानंतर मणिपूर ब्रिटिशांच्या स्वाधीन झाला.१९४७ साली जेव्हा ब्रिटिश देश सोडून गेले, तेव्हा राजा बोधचंद्र मणिपूर राज्य सांभाळत होते. दि. २१ सप्टेंबर १९४९ रोजी भारतामध्ये विलिन केल्यानंतर दि. १५ ऑक्टोबर १९४६ला भारतात विलीन झाले.
मणिपूरच्या पूर्वेला म्यानमार, उत्तरेला नागालॅण्ड, पश्चिमेला आसाम आणि दक्षिणेला मिझोराम हे राज्य. मणिपूरचे क्षेत्रफळ २२ हजार, ३२७ वर्ग किमी. भौगोलिक रुपाने मणिपूरचे दोन भाग. एक पर्वतीय व दुसरे समतल क्षेत्र. इंफाळ ही मणिपूरची राजधानी असून २०११च्या आकडेवारीनुसार तेथील लोकसंख्या २८ लाख ५५ हजार ७९४ इतकी होती. मणिपूर हे राज्य प्राकृतिक सौंदर्याने भरपूर समृद्ध असून सांस्कृतिकदृष्ट्या पठारी व डोंगराळ भागांमध्ये राहणारे जनजाती बंधूंचे नृत्य, पारंपरिक गीत, पूजा पद्धती, सांस्कृतिक परंपरा खूपच श्रेष्ठ आहेत. ’अतिथी देवो भव’ ही परंपरा पहाडी प्रदेशात राहाणारे आमचे नागा व कुकी बंधूंच्या जनजीवनात पाहावयास मिळते.
मी एका उंच पहाडी गावात ‘मरिंग’ जनजातीच्या मुलाबरोबर मणी नावाच्या उंच पहाडावर वसलेल्या गावात गेलो होतो. ज्या व्यक्तीला भेटायला गेलो, तो घरात नव्हता. शेजारी घरात एक शबरी सारखी दिसणारी वृद्ध माता होती. तिला विचारल्यावर तिने सांगितले की, बाहेर गेले आहेत उद्या येतील. त्यांनी आम्हाला घरात गरम पाणी दिले. जंगलातील केळंसुद्धा प्रेमाने खायला दिलं. त्यांना आमची, आम्हाला त्यांची भाषादेखील येत नव्हती, फक्त हृदयाची भाषा जाणत होतो. आमच्या भास्करराव कळंबींनी मला मणिपूरमध्ये जायला सांगितले. तेव्हा मी विचारले की, मला तेथील सरकारने अधिकृत केलेल्या २७ नागा जनजाती आहेत. सर्वांची भाषा वेगळी, तर काम कसे करणार? पण, तेव्हा स्व. भास्कररावजी मला म्हणाले की, “सुहास, हृदयाची भाषा महत्त्वाची आहे.” ती समजताच त्याचा अनुभव आला.
मणिपूरला वनवासी कल्याण आश्रमाचे कार्य १९८० मध्ये सुरू झाले. थोबाल जिल्ह्यात काकचिंग या गावी नागा जनजाती मुलांसाठी वसतिगृह आहे. इंफाळ जिल्ह्यात इंफाळला नागा जनजातीचे मुलींसाठी कन्या वसतिगृह आहे. बालसंस्कार केंद्र, खेलकूद, स्वास्थ्य असे विविध प्रकारे कार्य चालू आहे. आजच्या या गंभीर परिस्थितीतही आश्रमाचा तिथे संपर्क चालू आहे. काकचिंग आश्रमात आज १०५ लोक आश्रयाला आहेत. वर्तमान सरकार अनेक विकासकार्य करून ईशान्य भारतात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. काही देशविरोधी शक्ती चांगल्या कामांना विरोध करण्यासाठी तिथे जनजातींमधील झगडे कसे वाढतील, यासाठी प्रयत्नशील दिसतात.
मणिपूरमधील सद्यस्थितीत अतिशय बीभत्स स्वरुपातील गोष्टी समोर येत आहेत. मातृशक्तीला मारपीट करून स्वार्थासाठी तिचा उपयोग करून आपल्यासमोर दाखवले जाते. आपली अनेक कृत्य लपविण्यासाठी भारतीय सुरक्षा दलाला समोर केले जाते व देशविरोधी कृत्यांना खतपाणी घातले जाते. पण, खरं तर अनेक कठोर निर्णय घेऊन देशाला हानिकारक अशा गोष्टींचा नायनाट करण्याचे कार्य तेथे होत आहे. आपल्या शरीरातील एका भागाला जरी जखम झाली, तरी संपूर्ण शरीर त्या वेदना सहन करते व त्यावर उपाय करते. तसेच सरकार, विविध सामाजिक संघटना, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया, लेखक, विचारवंत, धार्मिक संघटनांचे प्रमुख, कलावंत, खेळाडू या संदर्भातील सकारात्मक प्रतिक्रिया देऊन परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहेत.‘वसुधैव कुटुम्बकम्’ ही आपली भावना आहे. संपूर्ण विश्वात मातृशक्ती ही अशीच श्रेष्ठ आहे. तिला जागृत केल्यानंतर ती रणरागिणी होते, हे ध्यात ठेवायला हवे.
मी नोव्हेंबर १९८९ला मणिपूरमध्ये प्रवेश केला व दि. १७ फेब्रुवारी १९९३ला कार्यक्षेत्र बदल झाल्याने तिथून प्रस्थान केले. गुवाहाटीत रेल्वेमध्ये बसल्यावर दुःखद बातमी कळली. दि. २६ जानेवारी १९१५ला मणिपूरमध्ये जन्म झालेल्या राणी गाईदिन्ल्यु माँ यांचे दि. १७ फेब्रुवारी १९९३ला वयाच्या ७८व्या वर्षी निधन झाले. देश, देव अन् धर्मासाठी प्राण वेचलेल्या राणी गाईदिन्ल्यु माँ यांचे देहावसान झाले. राणी गाईदिन्ल्यु माँ मणिपूर में तुम्हे फिरसे प्रकट होना होगा!