पुन्हा एकदा प्रिया-उमेश गाजवणार रंगभूमी!

    28-Jul-2023
Total Views |
Actor Umesh Kamat And Priya Bapat

मुंबई
: मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक जोड्यांपैकी सगळ्यांची आवडती जोडी म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत. ‘नवा गडी नवं राज्य’ या नाटकानंतर ही जोडी पुन्हा रंगमंचावर कधी येणार, याची प्रेक्षक वाट पाहात होते. आता ती प्रतीक्षा संपली असून, प्रिया आणि उमेशचं ‘जर तरची गोष्ट’ हे नवं नाटक लवकरच रंगभूमीवर येणार आहे.

उमेश आणि प्रिया या दोन्ही कलाकारांनी आपल्या दर्जेदार अभिनयातून प्रेक्षकांची दाद आणि अपार यश मिळवले. प्रिया तर हिंदी मनोरंजनसृष्टीतही मराठी चित्रपटसृष्टीचे प्रतिनिधित्व उत्तमरित्या करताना दिसते. हिंदीत आपली ओळख निर्माण करत असतानाच प्रियाने नाटकाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रातही प्रवेश केला, तर उमेशही विविध माध्यमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. नाटकाच्या माध्यमातून प्रिया आणि उमेशची हिट जोडी ‘जर तरची गोष्ट’ या नाटकातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रिया बापट सादर करत असलेल्या, ‘सोनल प्रॉडक्शन’निर्मित या नाटकाचे नाव ‘जर तरची गोष्ट’ असे आहे. या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर, रणजित पाटील यांनी केले असून, इरावती कर्णिक यांनी लेखन केले आहे, तर नंदू कदम ‘जर तर ची गोष्ट’चे निर्माते आहेत. या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत, आशुतोष गोखले आणि पल्लवी अजय प्रमुख भूमिकेत दिसतील.