लखनऊ : उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये एका हिंदू तरुणाचे सक्तिने खतना केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.विशाल असे पीडित तरुणाचे नाव असून तो मूळचा बुलंदशहरचा आहे. तक्रारीत विशालने सांगितले की, त्यांचे एका मुस्लिम तरुणीवर प्रेम होते. दरम्यान पीडित तरुणाचा प्रेयसीच्या कुटुंबीयांनी खतना केल्याचा आरोप केला आहे. तसेच नोएडा पोलीसांनी या प्रकरणाची दखल घेतली नाही , असे ही पीडित विशालने सांगितले. दरम्यान त्यांच्या प्रेयसीने दि. २५ जुलै रोजी बुलंदशहर जिल्ह्यात तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पीडित तरुणाचे नाव विशाल आहे. तो मुळात बुलंदशहर जिल्ह्यातील गुलावठी पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी आहे. विशाल नोएडाच्या फेज २ पोलीस स्टेशन परिसरात एका कंपनीत काम करायचा. येथेच त्याची ओळख त्याच्यासोबत काम करणाऱ्या मुस्लिम तरुणीशी झाली. दोघांमध्ये बोलणे सुरू झाले आणि काही वेळातच त्याचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मुलीच्या कुटुंबीयांनी या नात्यावर नाराजी व्यक्त केली.
मात्र, मुलीने कुटुंबीयांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. दरम्यान, मुलीलाही तिच्या घरच्यांनी बेदम मारहाण केली. माध्यमांशी बोलताना विशालने सांगितले की, २१ जुलै रोजी मुलीच्या नातेवाईकांनी त्याला त्यांच्या घरी बोलावले. यादरम्यान विशालला काहीतरी खायला दिले, त्यामुळे तो बेशुद्ध झाला. त्यानंतर प्रेयसीच्या म्हणण्यानुसार तिच्या प्रियकराला बेशुद्ध अवस्थेत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथेच पीडित तरुणाचा खतना करण्यात आला. ही बाब पीडितेला शुद्धीवर आल्यानंतर समजली. शुद्धीवर आल्यानंतर विशालवर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात आला. विशालला मुस्लिम तरुणीच्या कुटुंबातील एका सदस्याने २ दिवस बंदी करून ठेवले होते.
विशालच्या प्रेयसीच्या म्हणण्यानुसार, ती या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी नोएडाच्या फेज-२ पोलिस स्टेशनमध्ये गेली, परंतु तिथे तिच्या तक्रारीची कोणीही दखल घेतली नाही. दरम्यान एसएसपी श्लोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण नोएडा जिल्ह्याशी संबंधित आहे. त्यांनी सांगितले की, डीएसपी सिकंदराबाद यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या तरी मुलीने तिचा प्रियकर विशालसोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे.