मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात महिला सुरक्षा रक्षक नेमणार : मंत्री शंभूराज देसाई

    26-Jul-2023
Total Views |
Maharashtra Cabinet Minister Shambhuraj Desai

मुंबई
: राज्यातील शासकीय मुलींच्या वसतिगृहात महिला सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यासंदर्भात लवकर निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले. तसेच, यासंदर्भात सोयीसुविधा पुरविण्यात येत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार यास जबाबदार असणाऱ्या गृहपालाच्या पदाचा कार्यभार काढण्यात आला असून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

राज्यातील मुलींच्या वसतिगृहाच्या इमारती आणि जागेसंदर्भात अनेक लोकप्रतिनिधींकडून तक्रारी प्राप्त झाल्या असून याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी समन्वय साधून मुलींच्या वसतिगृहाच्या सुरक्षा आणि सोयीसुविधासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगितले.
 
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात सोयी -सुविधा पुरविण्याबाबत विधानसभा सदस्य आकाश फुंडकर, बळवंत वानखडे, राम कदम, यशोमती ठाकूर, नितीन राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला होता.