मुंबईत पावसाचा जोर पुन्हा वाढला; पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
26-Jul-2023
Total Views |
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून तुलसी तलावा पाठोपाठ भातसा तलाव देखील भरले आहे. तसेच तानसा ९४.२७ टक्के तर विहार ९६.७५ टक्के भरल्याने लवकरच मुंबईकरांच्या डोक्यवरील १० टक्के पाणीकपातीचे संकट निघून जाणार असल्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये एकूण ५५ टक्क्यांहुन अधिक पाणीसाठा आता असल्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, हवामान विभागाकडून राज्यातील विविध भागांत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यात विशेषतः पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश असून रत्नागिरी, रायगड , पालघर या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून मुंबई शहर व उपनगर, ठाणे या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे. दरम्यान, सकाळपासूनच मुंबई शहर, उपनगर भागांत पावसाची रिपरिप सुरु असून या भागातील धरणे ओव्हर फ्लो झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये सध्या ५८.९३ टक्के पाणीसाठा असून मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी चार धरणे भरली आहेत. संपूर्ण राज्यासह मुंबईत सध्या पावसाचा बराच जोर पाहण्यास मिळत असून प्रामुख्याने धरणक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील ४ धरणे आता भरून वाहून लागली आहेत.
राज्यात यंदाच्या मोसमात दमदार पाऊस झाला असून विविध भागांत मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. गेल्या आठवड्यात यवतमाळ जिल्ह्यास मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. दरम्यान, राज्य शासनाकडून राज्यातील पर्जन्य परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून हवामान खात्याकडून वेळोवेळी अलर्ट दिले जात आहे. दरम्यान, राज्यातील रत्नागिरी, रायगड या विभागांतील शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. तर काही जिल्ह्यांत अनिश्चित काळाकरिता शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.