मालवणी गाण्याचो शिमगो घालणारो 'प्रणय'

    26-Jul-2023   
Total Views |
Article On Artist Pranay Darekar

‘वस्त्रहरण’ या गाजलेल्या नाटकात वादक म्हणून काम केलेल्या आणि आपली मालवणी गाणी जगभर पोहोचविण्याचा प्रयत्न करणार्‍या अवलिया प्रणय दरेकर यांच्या वादन कलेचा प्रवास..

एकदा मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांनी आपल्या ‘वस्त्रहरण’ या गाजलेल्या नाटकात पर्यायी वादक म्हणून अवघ्या १३ -१४ वर्षांच्या प्रणय दरेकर यांना विचारणा केली. पण, त्यावेळी प्रणय यांनी शाळेच्या व्यस्त वेळेमुळे बाबूजी म्हणजेच मच्छिंद्र कांबळींना नकार कळवला. पण, काही वर्षांनी पुन्हा प्रणय यांना बाबूजींनी नाटकात वादक म्हणून काम करशील का? अशी विचारणा केली. मात्र, त्यावेळी प्रणय यांनी नकार दिला नाही, तर बालवयातील एक अट बाबूजींपुढे ठेवली. प्रणय म्हणाले की, “बाबूजी, मला ही तुमच्या नाटकात वादन करायचे आहे, पण माझ्या शाळेचं काय करू?“ त्यावेळी बाबूजी प्रणय यांच्यासोबत शाळेत गेले आणि त्यांनी शिक्षकांना विनंती करून नाटकाच्या दिवसापुरती शाळेला दांडी मारण्याची सवलत प्रणय यांना मिळवून दिली. अर्थात, शिक्षकही तयार झाले. कारण, प्रणय यांच्या वादनाच्या आवडीविषयी त्यांना कल्पना होतीच. त्यामुळेच त्या लहानवयातच बाबूजींच्या नाटकात काम करण्याची संधी प्रणय यांना मिळाली.

मुळात प्रणय तुकाराम दरेकर, हे मूळचे पोलादपूरचे. मात्र, त्यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांची आई ‘एम्ब्रोईडरी’चा छोटासा व्यवसाय करायची, तर वडील ‘नेल्को’ कंपनीत कामाला होते. प्रणय यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंगुभाई दत्ताणी विद्यालय, बोरिवली येथे झाले. त्यानंतर प्रणय यांनी चेतना महाविद्यालयातून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेतले. मुळात प्रणय यांच्या कुटुंबात कोणीही वादक किंवा गायक नाही. पण, प्रणय गायन आणि वादन दोन्ही करत असल्याने मला देवाने दिलेली ती देणगी आहे, असं आवर्जून सांगतात.

प्रणय यांच्या लहानपणी एकदा स्नेहसंमेलनाच्या दिवसांमध्ये शाळेतील शिक्षिकांनी वर्गात जाऊन विचारणा केली की, कोणाला वाद्य वाजवण्याची, गायनाची इच्छा आहे का? त्यावेळी दरेकर यांनी वादनाची इच्छा व्यक्त केली आणि तिथेच प्रणय यांना स्वतःमधला वादक गवसला. त्यानंतर शाळेतून ’मुंबई आम्हाला घडवायची?’ या विषयावरील पथनाट्य स्पर्धेत वादक म्हणून काम करण्याची संधी प्रणय यांना मिळाली. त्यावेळी आपल्या शाळेचे प्रतिनिधित्व करत प्रणय यांनी शाळेला परितोषिक ही मिळवून दिले. मग पुढे संतोष पवार लिखित, दिग्दर्शित ‘यदा कदाचित’ नाटकातून वादक म्हणून प्रणय यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवलं. त्यावेळी ते इयत्ता सहावीत शिकत होते.

कालांतराने व्यावसायिक नाटकातून आपल्या वादनकलेने रसिकांचे मन मंत्रमुग्ध करणारे प्रणय हे ’टिकल ते पॉलिटिकल’ या रिआलिटी शोमध्ये वादक म्हणून काम करू लागले. त्यादरम्यान प्रणय यांच्या वडिलांची ‘नेल्को’ कंपनीतील नोकरी ही सुटली. मग घरची जबाबदारी आईच्या खांद्यावर आली. त्यावेळी आपल्या आईला होणार्‍या त्रासाची आणि कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव प्रणय यांना झाली. म्हणूनच प्रणय यांनी पदवीचं शिक्षण न घेण्याचा आणि पुढे वादन कलेतचं अनुभवातून अनौपचारिक शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.मुळात जगायला आणि पोट भरायला शिकवतं तेच खरं शिक्षण , हे प्रणय यांच्याबाबतीत खरं ठरलं.

मग प्रणय यांना वादक म्हणून व्यावसायिक रंगभूमीवर ‘पांडगो इलो रे बा इलो’, ’यदा कदाचित’, ‘यदा कदाचित रिटर्न्स’, ‘नाय नो नेव्हर’, ’लगे रहो राजाभाई’, ’वन्स मोअर तात्या’, ’पैचान कौन’, ’येतोय तो खातोय’, ’तुम्हीच माझे बाजीराव’, ‘आयला मज्जा आहे’, ’आम्ही पाचपुते’, अशा अनेक नाटकांत काम करण्याची संधी मिळाली. यामधील ’यदा कदाचित रिटर्न्स’ या नाटकाला एका वर्तमानपत्राचे सर्वोत्कृष्ट संगीतासाठी नामांकन प्रणय यांना मिळाले. तसेच, ‘वन्स मोअर तात्या’ नाटकासाठी सर्वोत्कृष्ट संगीतासाठी प्रणय यांना ‘संस्कृती कलादर्पण’द्वारे परितोषिक मिळाले आहे. पण, नाटकासोबत प्रणय हे काही सामाजिक संस्थांना आर्थिक मदतही करत असतात.

मध्यंतरी ‘लॉकडाऊन’च्या काळात प्रणय यांनी पहिल्यांदा एक अभिनव प्रयोग ऑनलाईन विश्वात केला. तो म्हणजे गाजलेल्या हिंदी गाण्यांना मालवणी तडका देऊन विरंगुळा म्हणून व्हिडिओ बनवायला सुरूवात केली. पण, अल्पावधीतच त्यांच्या गाण्याला परदेशातून लोकांची पसंती मिळू लागली. मग ’शिमगो गाण्याचो नी धयकालो मालवणचो’ अशा नावाचा एक फेसबुक ग्रुप प्रणय यांनी सुरू केला. त्या ग्रुपच्या माध्यामातून ९९ मालवणी गाणी प्रणय यांनी प्रसिद्ध केली आहेत आणि शंभरावे गाणे लवकरच प्रसिद्ध होणार आहे.

मुळात मच्छिंद्र कांबळी यांच्या ‘वस्त्रहरण’ नाटकामुळे प्रणय यांची नाळ मालवणी भाषेशी जोडली गेली. त्यामुळेच मालवणी नसताना, ही प्रणय यांनी मालवणी भाषेवर जीवापाड प्रेम केले. त्यामुळे हीच मालवणी गाणी सातासमुद्रापार पोहोचवण्यासाठी भविष्यात प्रणय यांना आपल्या मालवणी गाण्यांचा व्यावसायिक रंगभूमीवर आगळावेगळा प्रयोग करायचा आहे. त्यासाठी त्यांना दै. ’मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!

सुप्रिम मस्कर
 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सुप्रिम मस्कर

इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण पुर्ण केले आहे. सध्या साठ्ये महाविद्यालयात 'एमएसीजे'च्या प्रथम वर्षात शिकत आहेत. मुंबई विद्यापीठातून 'लोककला' या विषयात पदविका पूर्ण केली आहे. वक्तृत्व स्पर्धा, अभिनय स्पर्धांमध्ये अनेक परितोषिके प्राप्त.