मुंबई : ह्यूमन राइट एक्टिविस्ट 'जसवंत सिंग खालरा' यांच्या जीवनावर आधारित बायोपिक पंजाब ९५ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अनेक अप्रतिम चित्रपट दिल्यानंतर, रॉनी स्क्रूवाला यांच्या 'पंजाब ९५' या चित्रपटाचा टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (TIFF) मध्ये भव्य प्रीमियर होणार आहे.
‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’, ‘सोनचिडीया’, ‘द स्काय इज पिंक’, ‘रश्मी रॉकेट’ सारख्या राष्ट्रीय हिताच्या सत्य कथा पडद्यावर आणल्यानंतर, RSVP मुव्हीज ‘पंजाब ९५’ या चित्रपटाद्वारे अजून एक वास्तविक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. रॉनी स्क्रूवाला, अभिषेक चौबे आणि हनी त्रेहान हे तिघे मिळून मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंग खालरा यांच्यावरील चरित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्रेहान यांनी केले असून यात अभिनेता-गायक दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
कोण होते जयवंत सिंग खालरा?
जसवंत सिंग खालरा हे पंजाबच्या एका बँकेचे डायरेक्टर होते. पंजाबवर जेव्हा आतंकवादाचं सावट होतं त्या कालावधीत पोलिसांकडून केल्या गेलेल्या हजारो अनोळखी मृतदेहांचे अपहरण, निर्मूलन आणि अंत्यसंस्काराचे पुरावे जसवंत यांच्या हाती लागले होते. जसवंतसिंग खालरा यांच्या चौकशीमुळे या गोष्टीचा जगभरातून निषेध होऊ लागला. सीबीआयने त्यांच्या निष्कर्षात नमूद केले की की पंजाब पोलिसांनी एकट्या तरनतारण जिल्ह्यात २०९७ लोकांवर बेकायदेशीररित्या अंत्यसंस्कार केले. ६ सप्टेंबर १९९५ रोजी जसवंत सिंग अचानक गायब झाले, त्यांच्या कुटुंबीयांनी याची रीतसर पोलिसांत तक्रार केली होती. पंजाबच्या ६ पोलिस अधिकाऱ्यांना नंतर जसवंत सिंग खालरा यांचं अपहरण आणि खून केल्याच्या आरोपाखाली अटकही करण्यात आली होती.