किडलेली माणसे

    25-Jul-2023
Total Views | 73
Misbehaveur Molestation Cases In The World

विनयभंग, बलात्कार, अत्याचार आणि छेडछाड आदी प्रकार देशात तसेच परदेशातही कमी अधिक प्रमाणात घडत असतात. अलीकडच्या काळात त्याचा अतिरेक होत असून नराधम प्रवृत्तीची किडलेली माणसे केवळ अत्याचार करूनच थांबत नाही, तर पीडितांचा कायमस्वरुपी छळ कसा करता येईल, त्यांना नेहमीच दबावात ठेवण्यासाठी ‘ब्लॅकमेल’ करण्याचेही प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यातून अनेक भागांत उद्रेकही होत असतात. आखाती देशांत अशा गुन्ह्यांसाठी थेट फाशीची शिक्षा आहे, तर लोकशाहीच्या गोंडस नावाखाली कारभार करणार्‍या देशात न्यायालयीन प्रक्रियेत नराधमाला दिलासाच मिळत असतो. असाहाय्यतेचा फायदा घेत महिला आणि मुलींवर अत्याचार करण्यात येतात. त्याचा व्हिडिओ किंवा फोटो काढून ‘ब्लॅकमेल’ही करण्याची धमकी दिली जाते. अनेकदा या घटना घडूनही त्यावर व्यक्त होणार्‍या महिला मुलींचे प्रमाण फारच कमी असते. लज्जा, भीती, कायदेशीर पळवाटा, कोण काय म्हणेल आदी कारणांमुळे अत्याचार होऊनही त्याबाबत उघडपणे बोलण्यास सहजासहजी कुणीही तयार होत नाही. झालचं तर त्यास नंतरच्या काळात अनेक संकटांचा सामनाच करावा लागतो. या सर्व प्रकारांमध्ये ज्या नराधमांकडून या घटना होत असतात किंवा जे यासाठी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष जबाबदार असतात, त्यांना हे कृत्य करताना आपली आई आणि बहीण यांची आठवण होत नसावी काय? झाली असेल तरी त्यांच्यातील राक्षसी प्रवृत्ती आणि किडलेली मानसिकता यामुळे ते अत्याचार करतच राहतात. हे सर्व प्रकार गंभीर असून, त्यावर कायद्यापेक्षाही समुपदेशनाची फार मोठी गरज आहे. दिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरणी तब्ब्ल सात वर्षांनंतर दोषींना शिक्षा ठोठावण्यात आली. त्यानंतरही देशात अनेक लहान-मोठ्या अन्याय, अत्याचाराच्या घटना घडतच आहेत. श्रद्धा वालकरचे प्रकरण अद्याप न्यायालयात अडकले आहे. या प्रकरणी कुणावरही अन्याय न होता, दोषींना शिक्षा करण्याबरोबरच अशा प्रवृत्तींना कायमचे वचक बसेल, अशाप्रकारची शिक्षा होणे काळाची गरज आहे, अन्यथा किडलेल्या प्रवृत्तींचे नराधम मोकाटपणे संचार करताच राहतील.

श्रद्धा आंधळीच!

कोणतेही काम न करता, गडगंज संपत्ती प्राप्त व्हावी, अशाप्रकारची स्वप्नरंजन करणारी मंडळी आणि या मंडळींच्या मनसुब्यांना खतपाणी घालणारे हल्लीच्या ‘स्मार्ट’ विज्ञान युगातही जागोजागी आढळून येतात. त्यातूनच गुप्त धनासाठी नरबळी देण्याचा प्रकार तसेच अघोरी कृत्य करून मानवतेलाही लाजवेल, अशा घटना आजही अनेक ठिकाणी घडत आहेत. दोनच दिवसांपूर्वी मालेगावात गुप्तधनासाठी नरबळीची घटना घडली. मुसळधार पावसाचा कहर आणि इर्शाळवाडीतील दुर्घटना यामुळे माध्यमांमध्ये यावर गंभीरपणे चर्चा झालीच नाही. मात्र, या युगातही गुप्तधनाचा शोध घेणारे अंधश्रद्धाळू आणि त्यासाठी नरबळी देणारे नराधम यांचे कृत्य गंभीर आहे. याच आठवड्यात नालासोपारा येथे एक विवाहिता अशाच एका बाबाच्या आमिषाला बळी पडली. त्यात तिचे हजारो रुपये आणि अब्रूही गेली. दरम्यानच्या काळात त्या बाबाने तेथून पोबारा केला. एकाच आठवड्यातील या दोन घटनांमुळे मन विषण्ण झाले नाही, तर नवलच. भोंदूबाबांच्या आहारी जाण्याचे प्रकार आपल्याकडे नवीन नाहीत. या बाबांच्या जाहिराती लोकलपासून सर्वत्र झळकत असतात. या बाबांच्या मुसक्या आवळण्यासाठी कायदाही आहे. परंतु, तक्रारदार पुढे येत नाहीत, तसेच बाबांवर श्रद्धा करणार्‍यांची संख्या फार मोठी असल्याने त्यांचे फावत असते. काही वर्षांपूर्वी पनवेलच्या एका फार्महाऊसवर पैशांचा पाऊस पाडण्यासाठी गेलेल्या चौघांचाच बळी गेला. पैशांसाठी, गुप्त धनासाठी आणि आपल्या जोडीदाराला वश करण्यासाठी श्रद्धाळू वाटेल ते करतात. त्यात त्यांचा पैसा जातोच वेळप्रसंगी जीवही जात असतो, तर ज्या महिला अशा भोंदूबाबांच्या आहारी जातात, त्यांची अब्रू जातेच. मात्र, अशा महिलाही लाजेखातर किंवा लोकांना माहीत झाल्यावर समाजात राहणे मुश्किल होईल, या कारणास्तव शांतच राहणे पसंत करतात. त्यामुळे या भोंदू बाबांचा व्यवसाय श्रद्धाळूंच्या आंधळ्या प्रेमापोटी सुरूच आहे. यावर कायद्यापेक्षाही समुपदेशन गरजेचे आहे. मात्र, ते स्वीकारण्याची या श्रद्धाळूंच्या मनाची तयारी हवी, अन्यथा युग बदलत जाईल. हल्ली आपण स्मार्ट युगातून ‘एआय’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात प्रवेश करताना हे श्रद्धाळू ‘एआय’लाही देवत्व बहाल करतील!

मदन बडगुजर

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121