नवी दिल्ली : ज्ञानवापी संकुलाच्या पुरातत्व सर्वेक्षणाविषयी अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून निर्णय येण्याची अपेक्षा आहे. वाराणसीमधील ज्ञानवापी संकुलाच्या पुरातत्व सर्वेक्षणास आव्हान देणारी मुस्लिम पक्षाची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्विकारली आहे. त्यावर आता आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायालयात यापूर्वी हिंदू पक्षातर्फे दोन कॅव्हेटदेखील दाखल करण्यात आल्या आहेत.
त्याविषयी बोलताना हिंदू पक्षाचे वकील सुभाषनंदन चतुर्वेदी म्हणाले की, अलाहाबाद उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. सुनावणीनंतर न्यायालयाकडून आजच निर्णय येणे अपेक्षित आहे. कारण, सर्वोच्च न्यायालयाने सर्वेक्षणावर २६ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतच स्थगिती दिली आहे. त्यामुळे अलाहाबाद उच्च न्यायालयाने आजच निर्णय न दिल्यास एएसआयला ५ वाजेनंतर सर्वेक्षण पुन्हा सुरू करता येणार आहे.
वाराणसीमधील ज्ञानवापी संकुलाचे पुरातत्व सर्वेक्षण करण्याची हिंदू पक्षाची विनंती वाराणसी जिल्हा न्यायालयाने मान्य केली होती. त्यानुसार भारतीय पुरातत्व सर्वेक्षणास (एएसआय) अत्याधुनिक तंत्राचा वापर करून पुरातत्व सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यास मुस्लिम पक्षाने आक्षेप घेऊन सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने सर्वेक्षणास २६ जुलैपर्यंत स्थगिती देऊन मुस्लिमांना अलाहाबाद उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले होते.