स्वातंत्र्यसेनानी महाबळ गुरुजी

    25-Jul-2023
Total Views |
Article On Swatantrya Senani Mahabal Guruji

कृष्णाजी बळवंत महाबळ. १९०९ साली २२ किलोमीटर अंतर रात्रीतून पायी कापले. रस्ते नव्हतेच, त्यातून जो रस्ता पार करायचा त्या भागात देवळाली, इंग्रजांची छावणी. भगूरला सावरकर वाडा गाठायचा. हे सगळे का? तर सावरकरवाड्यात असलेली स्वातंत्र्यलढ्यासंदर्भातली सगळी कागदपत्रं नष्ट करण्यासाठी! काम फत्ते झाले की, रात्रीच्या अंधारात परतायचं, कुणाच्याच काय तर अगदी स्वतःच्या नजरेलाही न पडता. काय त्यांचे आत्मबळ, त्यांच्यालेखी देशापुढे इतर कुठल्याच गोष्टीला महत्त्व नव्हते. आज स्वातंत्र्यसेनानी महाबळ यांच्या जीवनचरित्राचा घेतलेला मागोवा...

श्री. कृष्णाजी बळवंत महाबळ यांचा जन्म दि. १५ ऑगस्ट, १८८५ साली बडोदा येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पण तिथलेच. पुढे ते नाशिकला आले. सशस्त्र क्रांतीसाठी शरीर नुसतेच निकोप नव्हे, तर सशक्त हवे आणि त्यासाठी व्यायामाला पर्याय नाही हे त्यांचे गुरू व्यायामभीष्माचार्य प्रो. माणिकराव यांच्याकडून त्यांना बाळकडूच दिले. दि. १ मार्च, १९१७ साली नाशिक येथे गोदाकाठवर यशवंत महाराज पटांगणावर ’यशवंत व्यायामशाळा’ स्थापन करण्यात आली. ’राष्ट्रास रक्षिण्याला व्यायाम मंत्र घ्यावा’ हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे आणि हे महाबळ गुरूजी शब्दशः आयुष्यभर जगले. संस्थेच्या सदस्यांनी एकत्रितपणे काम करणे, प्रत्येक देशकार्यात मदत करणे हे सगळं केलंच पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे.

१९०९ साल नाशिकच्या इतिहासात सुवर्णक्षरात कोरले गेले आहे. नाशिकला जॅक्सन वधाचा कट रचला गेला. बालगंधर्वांच्या ’शारदा’ नाटकाची प्रत्येकालाच उत्सुकता होती. तशीच ती महाबळ गुरूजींनाही होतीच की, त्यावेळी ते नगरपालिका शाळा क्र. दोनमध्ये शिक्षक म्हणून काम करत होते. त्या शाळेचे मुख्याधापक होते काळे मास्तर. विजयानंद थेटरच्या मागच्या भिंतीला एक मोठे भगदाड पडले होते, जे कधीतरी एका नाटक कंपनीवाल्याने कपडा लावून बंद केले होते, कालांतराने तेही फाटले, आता त्याकडे कोणाचे लक्ष नव्हते विशेष. गुरूजी काम करायचे ती शाळा विजयानंद थेटरच्या मागे, या भगदाडातून नाटक व्यवस्थित पाहता यायचं.

गुरूजींनी काळे मास्तरांची परवानगी घेतली आणि त्यांच्याबरोबर इतरही तीन-चार मंडळी होती. नाटकाचा प्रयोग सुरू झाला. थोड्या वेळाने जॅक्सन आल्याची वर्दी आली आणि पाठोपाठ ठाण-ठाण असे आवाज आले आणि नाटक बंद पडले. काय झाले म्हणून गुरूजी आणि इतर मंडळी थेटरच्या जवळ आलीत, तर एक स्त्री पात्र करणारा कलाकार तेवढ्यात बाहेर आला आणि म्हणाला, ’इकडे कुठे निघलात? परत फिरा, क्लेकटरचा खून झाला आहे, मागे फिरा’. गुरूजी ताबडतोब तिथून बाहेर पडले. चौकात त्यांना काळे मास्तर आणि अण्णा कर्वे भेटले, गुरूजींनी विचारले, ’जे ऐकले ते खरे आहे का? कर्वे सहज म्हणाले, ‘कानावर आलं म्हणून’. बघा स्वतः त्या कटात पूर्णपणे सामील असूनही, आपली शपथ तंतोतंत पाळली.

भाऊराव कर्वे आणि बाळ सावरकर यांच्या सांगण्यावरून गुरूजींनी काही आक्षेपार्ह कागदपत्रांची विल्हेवाट रात्रीतून लावली. बस एवढाच काय तो गुरूजींचा या कटाशी संबंध. तरीपण तेही या प्रकरणात गोवले गेले. पुढे शाळेतून कोण कोण नाटक पाहायला हजर होते त्यात गुरूजी, काळे मास्तर या सगळ्यांची नावे समोर आली. इंग्रजांना चौकशीच्या नावाखाली क्रांतिकारकांना आणि स्वातंत्र्य क्रांतीला दडपण्याचे कारण मिळाले. गुरूजींना सरकारवाडा ठाण्यावर बोलविण्यात आले. चौकशीच्या नावाखाली शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागले, पण त्यांच्या तोंडून एकही अक्षर इंग्रज वदवून घेऊ शकले नाही. त्यांची जबानी घेण्यात आली. पण त्यांना, जे प्रश्न विचारलेच नाहीत, जी उत्तरे त्यांनी दिलीच नाहीत, असं सगळं त्या जबानीत लिहिले होते.

गुरूजींनी त्यावर स्वाक्षरी करायला ठामपणे नकार दिला. त्यात योग्य ते बदल झाल्यावरच त्यांनी त्यावर स्वाक्षरी केली. तेव्हा तरी ते या प्रकरणातून बाहेर आले, पण अजूनही त्याचे परिणाम येणे बाकी होते. पुराव्या अभावी गुरूजींना नक्कीच सोडले गेले, पण शिक्षा तर व्हायलाच हवी ना, त्यामुळे त्यांना नौकरीवरून बडतर्फ करण्यात आले. त्यांच्या बरोबर काळे मास्तर, देशपांडे असे एकूण सहा शिक्षक कमी करण्यात आले. त्याहीपुढे जाऊन त्यांना कधीही सरकारी नोकरीत कुठेही काम मिळणार नाही याची तजवीजसुद्धा इंग्रजांनी केली. असे कितीतरी परिवार दोन वेळच्या जेवणाची भ्रांत घेऊन कठीण काळ भोगत होती. पण त्यांच्यापैकी एकानेही आपली शपथ मोडली नाही, की इंग्रजांना फितुरही झाला नाही. ते उपाशी राहिले, कधीही इंग्रजी सत्तेपुढे झुकले नाहीत.

स्वाभिमानाने पण पूर्ण पणाने हे स्वातंत्र्य समर चालू ठेवले, अगदी भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आपले संस्कार, देशप्रेम, कुटुंबवत्सल स्वभावामुळे ते कायम सगळ्यांच्या संपर्कात राहिले. आपल्या झालेल्या मानसिक त्रासाला कधीही समाजापुढे येऊ दिले नाही. त्यातून मार्गक्रमण करून आपले देशकार्य सतत चालूच ठेवले. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांनी हा सगळा इतिहास शब्दबद्ध करून ठेवला. त्यामुळे आजच्या पिढीला घडलेला इतिहास आज शब्दातून अनुभवता येतो आहे, असे हे मार्गदर्शक स्वातंत्र्य सेनानी दि. २२ नोव्हेंबर, १९६९ साली अनंतात विलीन झाले.

सोनाली तेलंग
९८८११३२३९३