नाशिकचा कर्मयोगी संन्यासी

    25-Jul-2023   
Total Views |
Article On Karmayogi Sannyasi Swami Srikanthananda

नाशिकमध्ये देव, धर्म, देश आणि समाजाच्या उन्नतीसाठी अखंड सेवा आणि जागृती करणारे स्वामी श्रीकंठानंद म्हणजेच कर्मयोगी नाशिकचा कर्मयोगी संन्यासी. त्यांच्या विचारकार्याचा थोडक्यात घेतलेला मागोवा...

स्वामी श्रीकंठानंद यांना नाशिकमध्ये ‘कर्मयोगी संन्यासी’ म्हणून ओळखले जाते. समाजाचा विस्तार आणि समाजाचा विकास व्हावा, देशाचे कल्याण व्हावे, यासाठीचे त्यांचे कार्य अभिमानास्पदच. त्यांनी ‘श्रीराम कृष्ण आरोग्य संस्थान’ स्थापन केले. या संस्थानाअंतर्गत अंजनेरी, त्र्यंबकेश्वर येथे ‘स्वामी विवेकानंद मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर’ तसेच त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या दोन ठिकाणी ‘विवेकानंद इन्स्टिट्यूट स्किल डेव्हलपमेंट सेंटर’ आणि तपोवन, नाशिक येथे स्वामी विवेकानंद बेघर निवास केंद्र आहे.

या तीन्ही समाजपयोगी उपक्रमांची स्थापना,संवर्धन आणि त्याद्वारे समाजाची अखंड सेवा करणारे स्वामी श्रीकंठानंद. ‘विवेकानंद इन्स्टिट्यूट स्किल डेव्हलेपमेंट सेंटर’च्या माध्यमातून आजपर्यंत सात हजार युवक प्रशिक्षित झाले आणि त्यांना स्वयंरोजगारही मिळाला. ‘विवेकानंद बेघर निवास केंद्र’मध्ये बेघर वृद्धांना आधार देण्याचे काम होत आहे. एकंदर ‘नाशिकसाठी सर्व काही, स्वत:साठी काहीच नाही’ असा संकल्प घेऊन स्वामी श्रीकंठानंदांचे कार्य सुरू आहे. ते संपर्कात येणार्‍या प्रत्येकाला सांगतात,“आपला धर्म आणि त्याद्वारे होणारी कृती ही व्यक्ती किंवा कुटुंबापुरती मर्यादित नसून व्यापक आहे, सर्वसमावेशक आहे.”

स्वामी श्रीकंठानंद यांचा दिनक्रम काय? तर पहाटे ४ वाजता उठणे, नित्यक्रम आटपून सकाळी ६ वाजता नाशिकच्या खेडोपाडी जाण्यासाठी निघणे, रात्री उशिरापर्यंत लोकांना भेटणे, त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांच्या समस्या समजून घेणे. या सगळ्या समस्या सोडविण्यासाठी स्वामी श्रीकंठानंद त्या व्यक्तींना वेदउपनिषदांच्या चौकटीत राहून मार्गदर्शन करतात. त्यांच्या समस्या सोडवतात. तसेच, लोकांच्या अज्ञानाचा किंवा गरिबीचा गैरफायदा घेत काही समाजविघातक शक्ती त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करतात. काही लोक स्वतःला देव घोषित करून भोळ्या समाजाचे शोषण करतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वामी श्रीकंठानंद नाशिकच्या खेडोपाडी जाऊन लोकांना भेटून सांगतात की, ”तुम्ही आपल्या मुळाकडे जा.

जो कोणी तुम्हाला तुमचे देव -धर्म सोडून दुसरे देव माना किंवा इतरांना पूजायला सांगेल त्याला हाकलून लावा. उद्या मी जरी तुम्हाला तुमचा देव-धर्म सोडायला सांगितले, तर मलासुद्धा हाकलून द्या.” अर्थात, समाजाचा त्यांच्याशी स्नेह असल्याने लोक त्यांचे ऐकतात. स्वामी ताणतणावनियंत्रण, आत्मविश्वास, यश, धर्म आणि समाज वगैरे विविध विषयांवर समाजजागृती करतातच. त्याशिवाय ‘जागृत नाशिक जागृत भारत’ हे अनोखे अभियान ते राबवतात. यामध्ये नागरिकांनी लोकशाहीमध्ये सजग राहून आपल्या अधिकारांचे पालन करावे यासाठीची ते जागृती करतात. तर असे धर्म, समाज आणि सर्वच आघाड्यांवर कार्य करणारे स्वामी श्रीकंठानंद.

संन्यासी असल्यामुळे त्यांचे मूळ कुळ हे धर्म आणि समाजच. पण, तरीही लौकिकअर्थी ते मूळचे नागपूरचे. त्यांचे वडील कामानिमित्त वर्धा येथे आले. इथेच १८ वर्षे स्वामी श्रीकंठानंद राहिले.

भुके को खिलावे खिर
नंगे पहेनावे चिर
इतना बाटे सत्य कबिर
पौर्णिमेच्या दिवशी त्यांची माता त्यांच्यासमवेत कबीराची पूजा करे. कबीराचे दोहे म्हणे. मातेसमवेत बसलेल्या त्या बालकाला म्हणजे सध्याचे स्वामी श्रीकंठानंद यांना भुकेल्यांना अन्न आणि गरजू गरीब जे अंग झाकण्यापुरताही वस्त्र घेऊ शकत नाही, त्यांना कपडे द्यायचे, असे सांगणारे वचन अतिशय चिंतन करायला लावे. लहानपणापासूनच त्यांना देव, देश, धर्मासाठी जीवन व्यतीत करण्याची तीव्र इच्छा होती. नव्हे, स्वामी विवेकानंद, स्वामी रामतीर्थ परमहंस आणि अनेक महापुरूषांची जीवनगाथा अभ्यासून त्यांना प्रश्न पडे की, आपल्या जीवनाचे लक्ष्य काय? त्यातूनच ते रामकृष्ण मठाशी जोडले गेले. पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी संन्यस्त आयुष्याची दीक्षा घ्यायचे ठरवले. घरातल्यांना त्यांचा हा निर्णय मान्य नव्हताच. मात्र, त्यांचा निर्णय ठरलेला होता. त्यानुसार ते नागपूरच्या रामकृष्ण मठात राहू लागले. आपले आयुष्य विशेष कार्यासाठी आहे, ही अंत:प्रेरणा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.

त्यातून पुढे ‘नर्मदा परिक्रमा’ तिथून हरिद्वार, ऋषिकेश केदारनाथ असे भ्रमण त्यांनी केले. तिथून ते बेल्लूर येथील रामकृष्ण मठात गेले. पुढे ‘रामकृष्ण मिशन’च्या माध्यमातून म्हैसूर येथे ‘बी.एड’ केले आणि झारखंड येथे सुदूर परिसरातील शाळेत त्यांनी शिक्षणसेवाकार्य सुरू केले. काही वर्षांनंतर त्यांचे स्नेही स्वामी विश्वरूपानंद यांना भेटण्यासाठी ते त्र्यंबकेश्वर येथे आले आणि त्यांना जाणवले की, आता सगळे आयुष्य पुर्णत्वाने देव-देश-धर्म आणि समाजाला समर्पित करण्याची वेळ आली आहे. त्यातूनच नाशिकच्या ग्रामीण भागात त्यांनी सेवाकार्य सुरू केले. नि:स्वार्थी सेवाभावाने आणि केवळ मानवतेच्या जाणिवेने केलेल्या निर्भिड कार्यामुळे सज्जनशक्तीने त्यांच्यासोबत जोडली गेली. ‘एकला चलो रे’ म्हणता म्हणता समाज त्यांच्या सत्कार्याशी जोडला गेला. नाशिक ग्रामीणमध्ये गरजूंना जीवनोपयोगी वस्तूंचे वितरण करण्यापासून तर आरोग्य सुविधा देण्यापासून ते युवकांना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यापासून ते समाजाची, देशाची सेवा करतात. त्यांच्या प्रत्येक प्रवचनामध्ये समारोप ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘हर हर महादेव’नेच होतो, तर असे स्वामी श्रीकंठानंद खरेच नाशिकचे कर्मयोगी संन्याशीच!

९५९४९६९६३८


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.