दरडप्रवण क्षेत्रात संरक्षक भिंत बांधणार : मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील
24-Jul-2023
Total Views |
मुंबई : राज्यात मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता राज्य सरकारकडून ठोस पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी याबाबतीत महत्त्वाचा निर्णय घेतला असून राज्यातील दरडप्रवण क्षेत्रात संरक्षक भिंत बांधणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. त्या अनुषंगाने मंत्रालयात मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्याची आढावा बैठकीत त्यांनी याबाबत निर्णय घेतला आहे.
ते पुढे म्हणाले, दरडप्रवण क्षेत्रात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत संरक्षक भिंत बांधण्याबाबतचे परिपूर्ण प्रस्ताव १० दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले असून मुंबई शहर, उपनगर व ठाणे जिल्ह्यातील खासगी जमिनीवर स्लम ॲक्टखाली घोषित केलेल्या झोपडपट्ट्या ज्यांना अन्य नागरी सुविधा देण्यात येतात, अशा ठिकाणीही दरड प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, या बैठकीला मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये, मुंबई शहरचे जिल्हा नियोजन अधिकारी जी.बी सुपेकर, ठाणे महानगरपालिकेचे प्रशांत रोडे, व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.