समाजमाध्यमातून आक्षेपार्ह लिखाण करणार्यांवर कडक कारवाई करणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
24-Jul-2023
Total Views | 52
मुंबई : समाजमाध्यमातून महामानवांबाबत आक्षेपार्ह लिखाण करून समाजात तेढ निर्माण करणार्या समाजकंटकांवर कडक कारवाई होण्यासाठी राज्य शासन लवकरच उच्चस्तरीय समिती नेमणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविरोधात आक्षेपार्ह लिखाण करणार्या ’इंडिक टेल्स’ व ’हिंदू पोस्ट’ ही संकेतस्थळे तत्काळ बंद करून संकेतस्थळ चालविणार्या व लिखाण प्रसारित करणार्यांवर गुन्हा दाखल करण्याबाबत विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कायद्यात असलेली जास्तीत जास्त शिक्षा आरोपीला होईल, अशी तरतूद करणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.
महिनाभरात येणार त्र्यंबकेश्वर प्रकरणाचा अहवाल - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
त्र्यंबकेश्वर येथील संदल मिरवणुकीच्यावेळी काही युवकांनी शिव मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावरून मोठ्या प्रमाणात धार्मिक तेढ निर्माण होऊन दोन समाजात वाद निर्माण झाला होता. यासंदर्भात सभागृहात उपस्थित प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत गठीत केलेल्या समितीचा अहवाल एका महिन्याच्या आत दिला जाईल, असे आश्वासन दिले आहे. विधिमंडळात सोमवारी त्र्यंबकेश्वर प्रकरणाबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नावर फडणवीसांनी उत्तर दिले.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “कुठल्याही श्रद्धा व परंपरा पाळण्यास शासनाचा विरोध नाही. परंतु, परंपरेच्या नावावर खोडसाळपणा होत असेल; तसेच दोन्ही बाजूच्या भावना दुखावल्या जात असतील, तर ते सहन केले जाणार नाही. तसेच, अशा पद्धतीने मंदिरात प्रवेश करणे ही परंपरा आहे की, नाही हा वादाचा भाग आहे. या प्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याबाबत ‘एसआयटी’सुद्धा नेमण्यात आली असून, त्यांचा अहवाल एक महिन्यात सादर केला जाईल,” असे फडणवीसांनी सभागृहात म्हटले आहे.