नवी दिल्ली : वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे (एएसआय) करण्यात येत असलेल्या ज्ञानवापी मशीद परिसराच्या वैज्ञानिक सर्वेक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी बुधवारपर्यंत यथास्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणा झाली. यावेळी सर्वेक्षणाला परवानगी देणारा आदेश शुक्रवारी दुपारी ४.३० वाजता मंजूर करण्यात आला. त्यामुळे मुस्लिम पक्षाला अलाहाबाद उच्च न्यायालयात जाण्यासाठी वेळ देण्यासाठी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाची २६ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यं अंमलबजावणी करू नये, असे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निबंधक (न्यायिक) यांना हे सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले की मुस्लिम पक्षांनी एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली की, हा मुद्दा रोस्टरसमोर ठेवला जाईल जेणेकरुन यथास्थितीचा आदेश संपण्यापूर्वी उच्च न्यायालयाकडून त्यावर सुनावणी करता येईल.
न्यायालयाने प्रारंभी २८ जुलै रोजी या प्रकरणाची सुनावणी करण्याचा प्रस्ताव दिला होता. तसेच एएसआयला सर्वेक्षणादरम्यान घाईगडबडीत काम करू नये असे निर्देश दिले होते. मात्र, मुस्लिम पक्षाचे वरिष्ठ वकील हुजेफा अहमदी यांनी एएसआयने मशिदीच्या पश्चिमेकडील भिंतीवर उत्खनन सुरू केल्याची माहिती न्यायालयाला दिल्यानंतर न्यायालयाने आजच या प्रकरणाची सुनावणी घेण्यात आली. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी भिंतींना तडे गेले नसून केवळ मोजमाप आणि फोटोग्राफी केली जात असल्याचा दावा केला. सर्वेक्षणादरम्यान संकुलात कोणतेही कोणतेही संरचनात्मक बदल केले जाणार नाहीत, यातीही हमी त्यांनी दिली.