महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहणार

देवेंद्र फडणवीसांनी दिला अफवांना पूर्णविराम

    24-Jul-2023
Total Views |
Devendra Fadnavis on Eknath Shinde
 
मुंबई : "आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा अशी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा असते आणि त्यात काही वावगे नाही. महायुतीतील सर्वात मोठ्या पक्षाचा नेता म्हणून मी अधिकृतपणे जाहीर करतो की राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच राहणार असून मुख्यमंत्री पदी इतर कुणाचीही निवड होणार नाही," या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जन्मदिनी आ. अमोल मिटकरी यांनी केलेले ट्विट, राजकीय नेत्यांकडून केले जाणारे दावे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेले विधान यामुळे राज्यात मुख्यमंत्री बदल होणार या चर्चांना पेव फुटले होते. या सर्व चर्चा आणि शक्यतांना देवेंद्र फडणवीस यांनी खोडून काढले असून मुख्यमंत्रीपदी शिंदे हेच कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सोमवारी फडणवीसांनी विधिमंडळात माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

...त्याला अजितदादांचीही सहमती
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "राज्यात मुख्यमंत्री बदल होणार नाही हे स्पष्ट आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील महायुतीत सहभागी होताना राज्यात मुख्यमंत्री बदल होणार नाही याबाबत स्पष्टपणे सांगण्यात आले होते आणि अजित पवारांनी देखील त्यावर सहमती दर्शवित आपली भूमिका जाहीरपणे मांडली होती.' असे फडणवीसांनी म्हटले आहे.

संभ्रम निर्माण करणे बंद करा - मिटकरींना सुनावले
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्विटमुळे मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांनी जोर धरला होता. त्यावर टिप्पणी करत फडणवीसांनी मिटकरींना खडे बोल सुनावले आहेत. "महायुतीच्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत स्पष्टता आहे. त्यामुळे महायुतीतील आमचे जे लोक मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा करून संभ्रम निर्माण करत आहेत त्यांनी संभ्रम निर्माण करणे बंद करावे. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार आहेत, त्यामुळे नेत्यांनी संभ्रम निर्माण करण्याचे काम बंद करावे." तसेच फडणवीसांनी यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही टीका केली असून चव्हाणांसारखी नेतेमंडळी राजकीय पतंगबाजी करत असतात, मात्र अशा पतंगबाजीने काहीही फरक पडत नाही, असे फडणवीसांनी म्हटले आहे.