इर्शाळवाडी दुर्घटनेमुळे कसाऱ्यातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण
महसूल विभागाकडून सतर्क राहण्याचा सल्ला
23-Jul-2023
Total Views |
शहापूर : इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर अति पर्जन्यवृष्टीचा धाक, मनात असलेली धाकधूक आणि रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने उडालेली झोप अशा कारणांनी सध्या सर्वत्र टेकड्यांवर वसलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात शहापूर तालुक्यातील कसारा गावाच्या रहिवाशांनादेखील या भीतीने ग्रासले आहे. शुक्रवारी सकाळी देऊळवाडी विभागातील रहिवासी रामचंद्र गुंडू भगत यांच्या घरावर भलामोठा दगड आल्याची घटना घडली. दगड इतक्या वेगाने आला की, थेट घराची भिंत तोडून घरात शिरला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संकट आजही घोंघावत आहे.
कसारा बुद्रुक गावात अतिवृष्टीमुळे टेकड्यांवर भूस्खलन होण्याची दाट शक्यता असल्याने त्या ठिकाणच्या कुटुंबांना इतरत्र हलाण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत. तत्पूर्वी, अर्थात जून अखेरीस ग्रामपंचायतीकडून चारशेहून अधिक दिला आहे. लोकांना सुरक्षेच्या दृष्टीने नोटिसा देण्यात आल्या. तर वनविभागाने शुक्रवारपासून तीनशेहून अधिक काढलेल्या नोटीस वाटपाला सुरुवात केली आहे. कसारा गावातील टेकड्यांवर राहणाऱ्या वस्त्यांत माती, दगडांचा मलबा हळूहळू खचत चालला आहे. तहसीलदार कोमल ठाकूर यांच्या सूचनेनुसार, महसूल विभाग कसारा मंडळ अधिकारी प्रतिभा चव्हाण, तलाठी बुधाजी हिंदोळे यांनी प्रत्येक धोकादायक वस्तीत पोहोचून टेकडीवर वसलेल्या कुटुंबांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला.
कसारा गावातील पश्चिमेकडील डोंगराळ भागात तीन वर्षांपासून अतिवृष्टीमुळे अनेक घरांचे नुकसान मात्र, ठोस उपाय होत झाल्याने ग्रामस्थांवर दरड कोसळण्याचे सावट कायम आहे. यामागे नैसर्गिक तितकाच मानवनिर्मित हस्तक्षेपाचा आणि कारणांचा मोठा वाटा असल्याने दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. इथल्या टेकडींवर दाटीवाटीने वसलेल्या वस्त्यांना अतिवृष्टीतून कोसळणाऱ्या दगड माती मलब्याची भीती आहे. पावसाळ्याच्या तोंडावर दरवर्षी या टेकड्यांवरील कुटुंबांना स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात येतात. मात्र त्यावरठोस उपाय योजना नसल्याने ग्रामस्थांना आहे त्याच ठिकाणी दरडींच्या सावटाखाली राहावे लागते. टेकडींवर वसलेल्या घरांमुळे पावसाळ्यात कोसळणाऱ्या दरडींमुळे कसारा गावची वाटचाल माळीण, तर नुकत्याच घडलेल्या इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पुनरावृत्ती भिती निर्माण झाली आहे.
कसारा गावात टेकडीवर वसलेल्या घरांचे जोते आणि भिंती खचल्याने बरीचशी घरे धोकादायक स्थितीत आहेत. अशा लोकांनी पावसाळ्याच्या दिवसांत सतर्कता म्हणून स्थलांतरित होणे अपेक्षित आहे. दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.