मुंबई : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावावर दरड कोसळली आहे. त्यात २२ जणांचा मृत्यु झाला. तर १०३ लोकांना वाचवण्यात पथकाला यश आलं आहे. अजून १०० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ईर्शाळगड दुर्घटनेत विस्थापित झालेल्या नागरिकांचे राज्य शासनाकडून पुनर्वसन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली होती. यानंतर आता उद्धव ठाकरे हे इर्शाळवाडीत दाखल झाले आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत अनिल परब, अंबादास दानवे देखील आहेत.
यावेळी ठाकरेंनी ग्रामस्थांशी संवाद साधला. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. ते म्हणाले, "दरवेळी अशा दुर्घटना घडत असतात. आपण फक्त धावतो. मी यात राजकारण करत नाही. पण राजकारण्यासाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे. आजही अनेक वस्त्या आहेत. त्या डोंगर उतरावर किंवा डोंगराच्या खाली आहेत. तिथे कधीही दरडी कोसळू शकतात. पण म्हणून जबाबदारी टाळू शकत नाही. हा अनुभव येण्याआधी पुनर्वसन झालं असतं तर चांगलं झालं असतं. केवळ घर देणं म्हणजे पुनर्वसन होणं नाही. त्यांना नोकरी कशी मिळेल, रोजगार कसा मिळेल हे पाहा. कंटनेरमध्ये जास्तीत जास्त दिवस राहणार नाही याची काळजी घ्या. यात मी राजकारण आणत नाही. दु:ख मोठं आहे. सावरावं लागेलच. आम्ही तुमच्यासोबत राहू. नीट काळजी घ्या." असं उद्धव ठाकरे म्हणाले.
स्थानिकांना तुमच्या जेवणा खाण्याची सोय झाली आहे का? राहण्याची व्यवस्था आहे का? प्यायला पाणी मिळते का? आपल्या नातेवाईकांचे मृतदेह कसे सापडले? घटना कशी घडली? कमावती मुलं कशी गेली? अशी विचारणा त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना केली. पुढे ते म्हणाले, "मागे मी इथे आलो होतो. तेव्हा वीज नव्हती. वीज देण्याचा प्रयत्न केला होता. महाराष्ट्रात अनेक वस्त्या आहेत. दुर्घटना कधीही होऊ शकतात. तुम्ही एकत्र संवाद ठेवा. तुमची टीम तयार करा. तुम्ही धक्क्यातून सावरल्यावर काय करायचं ते सांगा. कुटुंब म्हणून मी सोबत आहे. हात जोडून विनंती करतो. जागा निवडताना धोका होणार नाही अशीच जागा सांगा. बऱ्याच वस्त्या आहेत त्यांचं पुनर्वसन करायचं आहे. टप्प्याटप्प्याने करू. तुमचंही कसं पुनर्वसन करायचं हे आपण ठरवू. तुमचा परत जीव जाता कामा नये. मी सरकारशी बोलणार आहे. सरकार येत असतं आणि जात असतं. पण आपण सर्वांचं पुनर्वसन करू. कुणावरही परत ही वेळ येऊ देता कामा नये." असंही त्यांनी सांगितलं.