मुख्यमंत्र्यांनी स्वीकारले इर्शाळवाडीतील अनाथांचे पालकत्व

शिक्षण अन पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली

    22-Jul-2023
Total Views |
Maharashtra CM Eknath shinde Guardianship of orphans

मुंबई
: इर्शाळवाडी दुर्घटनेत बचावलेल्या अनाथ मुलांचे पालकत्व स्वीकारण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वतीने करण्यात आली आहे. इर्शाळवाडीतील ग्रामस्थांवर कोसळलेल्या या संकटामुळे गावातील असंख्य कुटुंब उध्वस्त झाली असून अनेकांचा आधार यामुळे हिरावून गेला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॅा.नीलम गोऱ्हे यांनी शनिवारी पीडितांची भेट घेत शासन आपल्या पाठीशी उभा असल्याची हमी दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी अनाथ मुलांचे पालकत्व स्वीकारल्याची माहिती दिली.

विधान परिषद उपसभापती डॅा.नीलम गोऱ्हे यांनी दि. २२ जुलै रोजी नढळ येथे दुर्घटनेतील पीडितांच्या तात्पुरत्या निवारा केंद्रास भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी आमदार मनीषा कायंदे, आमदार महेंद्र थोरवे, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे , आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहीरराव, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे उपस्थित होते.

दुर्घटनाग्रस्त ईर्शलवाडी मध्ये एकूण १ ते १८ वयापर्यंतचे ३१ मुलं-मुले असून त्यापैकी २१ जण आश्रम शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने या इर्शाळ वाडी दुर्घटनेतील या अनाथ मुलांचे पालकत्व स्वीकारले आहे. ही मुले १८ वर्षाचे पूर्ण होईपर्यंत त्यांच्या शिक्षण व पालनपोषणाची जबाबदारी संस्थेने घेतली असून त्यांच्या आवश्यक त्या सर्व गरजा पूर्ण करण्यात येणार आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन ही स्वयंसेवी आहे खा. डॉ शिंदे यांनी यावेळी दूरध्वनी द्वारे संबंधितांशी संवाद साधला. स्वतः मुख्यमंत्री या संपूर्ण घटनेवर आणि मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत.शंभर टक्के पुनर्वसन होईपर्यंत मदत कार्य सुरू राहील असा विश्वास यावेळी दुर्घटनाग्रस्त मुलांना देण्यात आला. तसेच मदत साहित्याचे वितरण करण्यात आले.

यापूर्वीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२० साली महाड येथील तारीक गार्डन या दुर्घटनाग्रस्त इमारतीत बचावलेल्या दोन लहान बालकांचे संपूर्णता पालकत्व स्वीकारले होते. तसेच २०२१ साली पालघर येथे रोजगाराअभावी आत्महत्या केलेल्या कामगार दाम्पत्यांच्या २ मुलांचे होते.