कुब्रिकच्या ‘फ्रेम’मधून...

    22-Jul-2023   
Total Views |
Article On Film Director Writer Stanley Kubrick

चित्रपट एक माध्यम आहे. भाषेची अडचण न भासणारं एक सार्वत्रिक माध्यम. दृक्श्राव्य माध्यम म्हणतो आपण त्याला. पण, तेवढ्यापुरतं मर्यादित नाही. एक सहज लक्षात न येणारी तिसरी बाजू म्हणजे अनुभव. तो अनुभव मूर्त नसतो. जे अमूर्त ते घडवण्याची कामगिरी दिग्दर्शक करत असतो. स्टॅनली कुब्रिक हा असाच एक दिग्दर्शक. चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यापूर्वी केवळ छायाचित्रे तो जमवत असे. यातून स्थळ निवड झाली की मगच चित्रीकरणाला सुरुवात होई. ‘परफेक्शनिस्ट’ म्हणून त्याला उगाच म्हणत नाहीत. यावरून त्याचे आणि कलाकारांचे वादही प्रचलित आहेत.

मुळात त्याने आपल्या करिअरची सुरुवातच फोटोग्राफीने केली. एक उत्तम छायाचित्रकार म्हणून तो नावाजला होताच. चित्रपट बनवण्याच्या प्रक्रियेचा आराखडा सुस्पष्ट करूनच पुढच्या कार्याला सुरुवात व्हायची. आपल्या संपूर्ण आयष्यात त्याने केवळ १३ चित्रपट बनवले, तरीच वयाच्या १९व्या वर्षी त्याच्या नावावर चार चित्रपट होते. परंतु, तो प्रत्येक चित्रपट ‘हिट’ झाला. आपल्या अपयशाबाबत अत्यंत जागृत असलेला हा दिग्दर्शक लेखक, निर्माता स्टॅनली कुब्रिक यांच्याविषयी त्याच्या चाहत्यांनी सांगितलेल्या माहितीचे मराठीत संकलन करून कुब्रिकच्या व्यक्तिमत्त्वाची सूक्ष्म चिकित्सा नरेंद्र बंडबे या त्यांच्या चाहत्यांनी ’कुब्रिक’ या पुस्तकातून केली आहे.

नरेंद्र बंडबे हे पेशाने पत्रकार आहेत. सिनेमाविषयी अतोनात प्रेम! यातही कुब्रिक त्यांचा अतिशय लाडका फिल्ममेकर. आपण त्याचे सर्व चित्रपट पाहिल्यानंतर आपल्याला त्याची बाधा झाली असे ते म्हणतात! त्यांच्यासारख्या अनेक चाहत्यांचा एक पंथच आहे, ज्यात त्यांच्यासहित कुब्रिकचे सर्व चाहते स्वतःला ‘कुब्रिकियन’ म्हणवून घेतात. कुब्रिकविषयी लिहिताना नरेंद्र म्हणतात की, “कुब्रिक कायम अलिप्त राहायचा. त्याचा सिनेमा मराठी वाचकांसाठी नवा नसला तरीही त्याच्या निर्मितीचे अनेक संदर्भ नवीन होते. त्याच्यावर पुस्तक लिहिण्याची कल्पना २०११ साली सुचलेली. चित्रपट तर पाहिले होते मात्र ते बनवण्यामागच्या कुब्रिकच्या पद्धतीचे संशोधन सुरु केले.”

हे पुस्तक चित्रपटात रस असणार्‍या आणि चित्रपट तयार होण्याच्या पद्धतीने जाणून घेण्यासाठी इच्छुक असणार्‍यांसाठी आहे. हे कुब्रिकचे समग्र चरित्र नाही, तर त्याने निर्मिती केलेल्या कलाकृतींच्या अनुषंगाने त्याच्या आयुष्यात समांतर घडत जाणारे बदल लेखकाने अधोरेखित केले आहेत. पुस्तकात एकूण २१ प्रकरणे आहेत. तसेच पुस्तकाला दोन दिग्गजांनी प्रस्तावना दिल्या आहेत. पत्रकार कुमार केतकर आणि प्रसिद्ध चित्रपट समीक्षक अशोक राणे यांनी पुस्तकाला प्रस्तावना दिली आहे. कुमार केतकरांनी आपल्या प्रस्तावनेतून नरेंद्र बंडबे यांच्याबद्दलचे आपले अनुभव सांगितले आहेत, तर अशोक राणे यांच्या प्रस्तावनेतून हे पुस्तक कसं वाचावं, याची दिशा मिळते. चित्रपट म्हणजे नेमकं काय? ते लिहितात, “चित्रपट ही एक स्वतंत्र, स्वयंभू आणि प्रगल्भ कला आहे. या अंगाने तिची रचनाबद्धता, सौंदर्यशास्त्र उलगडून दाखवलं जातं. अपवादात्मक पातळीवर असं लेखन घडतं. कारण तशी असोशी, ती संवेदना आणि माध्यमाचं एकूणच कलामूल्य पाहावं लागतं.” पुस्तकाचा संदर्भ देत नरेंद्र यांच्या कुब्रिक प्रेमाविषयी ते सांगतात, “कोणतीही कलाकृती समजून घ्यायची असेल, तर ती निर्माण करणारा कलाकार, तिची बालपणापासून कलावंत म्हणून होत असलेली जडणघडण, त्यांच्या कलानिर्मितीच्या तळाशी असलेले संचित या सर्व गोष्टी जणू घ्यायच्या असतात.”

केवळ १३ चित्रपट बनवणार्‍या या कुब्रिकच्या नावाचं वेड ज्यांना लागलं, तसेच ज्यांनी त्याच्याबद्दल कोणत्या ना कोणत्या प्रकारे लिहून ठेवलं, त्यातून कुब्रिकला शोधून मराठी वाचकांच्या समोर या पुस्तकाने मांडले आहे. खरा कलाकार कोण? जो आपल्या कलेच्या माध्यमातून समाजात घडणार्‍या घटनांवर ‘फ्लॅश’ टाकतो. या ‘फ्लॅश’पासून स्टॅनलीची सुरुवात झाली. जॉन रॉन्सन याला आलेला स्टॅनलीच्या स्वीय साहाय्यकाचा फोन आणि त्याबद्दलचे त्याचे अनुभव लेखकाने आपल्या पहिल्या ’स्टॅनली का डिब्बा’ या प्रकरणात दिलेय. कुब्रिकचं चित्रपटाचं आयुष्य केवळ न सांगता कुब्रिक कसा घडला, त्याच्या आवडीनिवडी लेखकाने या पुस्तकातून सांगितल्या आहेत.

बुद्धिबळाचे धडे या प्रकरणात स्टॅनली खेळाकडे कसे पाहतो हे सांगून, त्याच्यात असलेली चिकाटी, सोशिकता आणि शिस्तप्रियता कुठून आली याचा मार्ग दाखवतो. ’यंग मॅन विथ कॅमेरा अ‍ॅण्ड अन आयडिया’, ‘विक्षिप्त मर्लोन ब्रांडो- वन आईड जॅकस’, ‘आय एम स्पार्टाकस’, ‘लाईट ऑफ माय लाईफ’ अशा नावांतूनच उत्सुकता निर्माण होते. ‘लाईट ऑफ माय लाईफ’ या प्रकारांत ‘लोलीता’ चित्रपटाच्या मेकिंगमागच्या असंख्य अडचणी सांगितल्या आहेत. आपण चित्रपटला असतो, मात्र त्यामागची प्रदीर्घ कथा आपल्या ठाऊक नसते. कादंबरीचे हक्क मिळवण्यापासून ते ‘स्क्रीननप्ले’साठी हिरवा कंदील मिळेपर्यंत सर्वच. भूमिकांसाठी पात्रांची निवड, करार आणि त्यानंतर मिळालेलं घवघवीत यश. हे प्रकरण वाचताना आपण १९६१च्या काळात जाऊन सिनेमा निर्मितीची प्रक्रिया समजून घेत असतो. कुब्रिकचा शेवटचा चित्रपट ‘आईज वाईड शट’ या चित्रपटाच्या कहाणीने पुस्तकाचा शेवट होतो. पुस्तकाच्या शेवटाला संदर्भ ग्रंथ सूची लेखकाने दिली आहे.

पुस्तकाचे नाव : कुब्रिक
लेखक : नरेंद्र बंडबे
प्रकाशक : सदामंगल पब्लिकेशन्स
पृष्ठसंख्या : १६२
मूल्य : ४०० रू.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.