प्रगतीचे अग्रदूत: देवेंद्र फडणवीस

    22-Jul-2023
Total Views |
Article On Deputy CM Devendra Fadnavis Written By IPS Sanjay Barve

फडणवीस यांनी नागपुरात युवा नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. पक्ष कार्यकर्ता ते मुख्यमंत्री अशा तीन दशकांच्या या प्रवासात त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाला अनेक आयाम जोडले. तीन दशकांच्या राजकारणातील या प्रवासाने त्यांना बरेच काही करायला आणि शिकायला मिळाले आहे.

२०१४ च्या शेवटच्या तिमाहीत एका तरुण राजनेत्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली. १५ वर्षांचा विधिमंडळाचा अनुभव आणि आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाची स्पष्ट दृष्टी असलेल्या फडणवीसांनी लगोलग राज्यासमोरील दीर्घकाळ प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यास सुरुवात केली. पायाभूत सुविधांच्या विकासाच्या त्यांच्या उपक्रमांना अल्पावधीतच मोठे गोमटे यश प्राप्त झाले. परिणामी, आज महाराष्ट्राजवळ ‘समृद्धी’ महामार्गासारखा ‘सुपर हायवे’ आहे. मुंबई, पुणे आणि नागपुरातील मेट्रो प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत. जलसंधारणाच्या उपक्रमामुळे, जलयुक्त शिवारामुळे, महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा आणि पीक पद्धतीही बदलली आहे.

जलद प्रगती साधण्याचा हा प्रयत्न म्हणजे फ्रँकलिन डेलॅनो रूसवेल्ट यांचे ’न्यू डील’ आणि किन्सच्या निवडक अर्थशास्त्रीय ठोकताळ्यांचे एक कुशल मिश्रण होते. सरकारने पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात खर्च केल्याने ग्रामीण तसेच शहरी भागात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या आणि अर्थचक्र गतिमान झाले. याच्या जोडीला सरकारच्या जवळ-जवळ सर्व विभागांना दिलेल्या तंत्रज्ञान आणि ‘आयटी’च्या बूस्टर मात्रेमुळे अधिकार्‍यांना उत्तरदायित्वाची सुस्पष्ट जाणीव आली आणि शासकीय योजनांमधील आर्थिक गळती रोखण्यातदेखील मोठ्या प्रमाणात यश आले.

पोलीस विभागासाठी त्यांचे योगदान म्हणजे गुप्तचर आणि दहशतवादविरोधी पथकांचे बळकटीकरण, ’महाराष्ट्र सायबर’ची निर्मिती आणि ’क्राईम अ‍ॅण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अ‍ॅण्ड सिस्टीम’ची काटेकोर अंमलबजावणी होय. नव्या आणि प्रगत तंत्रज्ञानासाठी तसेच कार्यप्रणालींच्या अद्ययावतीकरणासाठी त्यांनी नेहमीच पुरेसा निधी उपलब्ध करून दिला. या मजबूत गुप्तचर नेटवर्कच्या जोरावरच एका विशिष्ट समुदायासाठी आरक्षणाची मागणी करणारे प्रचंड मोठे मोर्चे हाताळणे सोपे झाले. कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या पोलिसांना होणार्‍या संभाव्य गडबडीची आगाऊ आणि नेमकी कल्पना मिळत असल्याने ते प्रत्येक अप्रिय अथवा विघटनकारी योजना हाणून पाडू शकले. सार्वजनिक सुव्यवस्था, शांतता आणि स्थैर्य यावर त्यांनी नेहमीच भर दिला. कारण त्यांना माहीत होते की, प्रगती आणि समृद्धीसाठी शांतता आणि सुव्यवस्था या अत्यावश्यक पूर्वअटी आहेत.

फडणवीस हे ‘आयबी’, ’रॉ’, ’एनआयए’ या केंद्रीय यंत्रणा आणि राज्य पोलीस दलामधील समन्वयाचे मोठे पुरस्कर्ते आहेत. ते नेहमीच अधिकार्‍यांना समन्वयाने काम करण्यासाठी प्रोत्साहित करत असत. देशाच्या सुरक्षेसाठी केंद्रीय यंत्रणा आणि राज्य पोलीस यांचे टीमवर्क अत्यंत महत्त्वाचे आहे आणि श्रेयवादापलीकडे विचार करून एकत्रितपणे कार्याभिमुख होण्याचा हा दृष्टिकोन महाराष्ट्र राज्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरला. मला ऑगस्ट २०१९ मध्ये घटनेतील ‘कलम ३७०’ रद्द केल्यानंतर घडलेल्या घटनांची येथे प्रकर्षाने आठवण येते. त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर शंका असतानाही मुंबई शहरात आणि राज्यात पूर्णपणे शांतता राहिली. त्यावेळी अचूकपणे मिळवलेली गुप्त माहिती आणि त्यानुसार पोलिसांनी केलेल्या प्रभावी कारवाईमुळे हे शक्य झाले. फडणवीस यांनी आपल्या क्षेत्रीय अधिकार्‍यांना पूर्ण मोकळीक दिली आणि अशा संवेदनशील बाबी हाताळण्याच्या त्यांच्या व्यावसायिक कौशल्यावर विश्वास ठेवला, म्हणूनच हे शक्य होऊ शकले.

त्यांच्या नेतृत्वाखाली २०१५ ते २०१९ या काळात राज्य गुप्तचर विभाग (SID) आणि (ATS)ने भारतविरोधी शक्तींचे अराजक माजवण्याचे आणि अस्थिरता निर्माण करण्याचे अनेक प्रयत्न हाणून पाडले. त्याबाबत जरी येथे अधिक विस्ताराने सांगणे उचित नसले, तरी एवढे मात्र निश्चितपणे सांगू इच्छितो की, ’एसआयडी’ आणि ’एटीएस’ राज्यासाठी अदृश्य ढाल बनून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पडद्याआड काम करतात. अशा प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी फडणवीस हे प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीवर नेहमीच अगदी मध्यरात्रीही उपलब्ध असत. सतत कामात व्यस्त राहणारे फडणवीस रात्रीचे फार उशिरा निजत आणि त्यांना विश्रांतीची गरज आहे, हे जाणवून अनेकदा अधिकार्‍यांना त्यांना थोडा वेळ विश्रांती घेण्याची विनंती करावी लागे. कर्तव्याप्रती अशी बांधिलकी क्वचितच आढळते.

महानगरांमधील गुन्हेगारी, सायबर गुन्हे आणि महिला व वयोवृद्ध व्यक्तींविरुद्धचे गुन्हे यांबाबत त्यांना नेहमीच काळजी असे. मुंबईसह इतर शहरांमध्ये निर्माण झालेले ’सीसीटीव्ही’चे जाळे त्यांच्याच पुढाकाराने पूर्णत्वास गेले आणि त्यामुळे रस्त्यावरील गुन्हेगारी नियंत्रित करण्यात आणि घडलेले गुन्हे शोधण्यात पोलिसांना मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झाले. फडणवीस यांनी उपलब्ध करून दिलेल्या तंत्रज्ञानाच्या जोरावर लाठीधारी पोलीस ‘व्हिडिओ अ‍ॅनालिटिक्स’ शिकले आणि नव्या युगातील ‘ट्रोल’ आणि गुन्हेगारांना रोखण्यासाठी ‘वेब कॉलिंग’देखील करू लागले.

पोलिसांवरील कामाच्या ताणाची पुरेपूर जाणीव असल्यामुळेच त्यांनी पोलिसांसाठीची वैद्यकीय साहाय्य योजना सोपी केली आणि सेवारत असताना विम्याचे कवचही प्रदान केले. आजमितीस गृह खाते फडणवीसांकडे असल्यामुळे पोलिसांना त्यांच्याकडून सवलतीच्या दरात घरे स्वतःच्या मालकीची घरे मिळण्याची मोठी आशा आहे. विविध विभागांनी सादर केलेल्या फाईल्स आणि त्यातील टिपणे वाचायला फडणवीसांना वेळ कधी मिळतो, असा प्रश्न अनेकांना नेहमी पडत असे. परंतु, गुंतागुंतीच्या प्रकरणातही त्यांचे आकलन त्वरित आणि मुद्देसूद असे. सरकारी दिरंगाईचे नेहमीचे डावपेच न वापरता जर प्रकरण सार्वजनिक हिताशी संबंधित असेल आणि राज्याच्या हिताचे असेल, तर त्यांनी त्यास कधीही उशीर केला नाही. ‘बोला, सविस्तर सांगा, चर्चा करा’ अशा तद्दन नोकरशाही ‘रिमार्क्स’पासून ते नेहमीच फटकून असत.

स्वतः कायद्याचे पदवीधर असलेल्या फडणवीस यांना कायद्याच्या मुद्द्यांवर क्वचितच मदतीची गरज पडत असे. अधिकार्‍यांनी प्रस्तावित केलेली बाब न्यायालयीन पडताळणीत टिकेल अथवा टिकणार नाही, याची ते बारकाईने तपासणी करीत. त्यांच्या या कायदेविषयक कौशल्याचा अधिकार्‍यांना आश्चर्य मिश्रित धाक वाटे. कायदेशीरदृष्ट्या योग्य असण्याबाबतचा त्यांचा आग्रह कायद्याचे राज्य या संकल्पनेवरील त्यांचा अंगभूत विश्वासही अधोरेखित करतो. फडणवीस यांनी नागपुरात युवा नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. पक्ष कार्यकर्ता ते मुख्यमंत्री अशा तीन दशकांच्या या प्रवासात त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाला अनेक आयाम जोडले. तीन दशकांच्या राजकारणातील या प्रवासाने त्यांना बरेच काही करायला आणि शिकायला मिळाले आहे. त्यांच्या भविष्यातील उन्नत यशासाठी माझ्या शुभेच्छा आणि अपेक्षा की, त्यांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा महाराष्ट्राला दीर्घकाळ लाभ होवो.

संजय बर्वे