ज्ञानवापी संकुलाचे होणार पुरातत्व सर्वेक्षण

४ ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करा : वाराणसी जिल्हा न्यायालय

    21-Jul-2023
Total Views |
gyanvapi-case-court-order-on-asi-surve
 
वाराणसी : वाराणसीमधील ज्ञानवापी संकुलाचे शास्त्रीय सर्वेक्षण करण्याचा आदेश वारणसी जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणास (एएसआय) दिला आहे. सर्वेक्षणाचा अहवाल ४ ऑगस्टपर्यंत सादर करायचा आहे. वाराणसीमधील ज्ञानवापी संकुलाचे पुरातत्त्व सर्वेक्षण करण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका हिंदू पक्षातर्फे वाराणसी जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांच्यासमोर झालेल्या सुनावणीनंतर १४ जुलै रोजी आदेश राखून ठेवण्यात आला होता.

न्यायालयाने शुक्रवारी आदेश जारी केला आहे. त्यामध्ये वाराणसी संकुलाचे म्हणजे जेथे असलेल्या पुरातन काशी विश्वनाथ मंदिरास मुघल आक्रमक औरंगजेबाने उध्वस्त करून मशिद बांधली होती, त्या संपूर्ण परिसराचे शास्त्रीय सर्वेक्षण करण्यात यावे, असे न्यायालयाने एएसआयला निर्देशित केले आहे. यावेळी न्यायालयाने संकुलातील वास्तूस कोणताही धक्का न पोहोचविता आवश्यक त्या शास्त्रीय तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वेक्षण करण्यास सांगितले आहे. या सर्वेक्षणामध्ये कथित मशिदीच्या वजुखान्याचा म्हणजेच जेथे न्यायालयीन सर्वेक्षणामध्ये शिवलिंग सापडले आहे, त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. मात्र, उर्वरित परिसराचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल ४ ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणार – विष्णू शंकर जैन, हिंदू पक्षाचे वकील

ज्ञानवापी संकुलातील कथित मशिद ही बहुतांशी वेळा रिकामीच असते. त्यामुळे या वेळात एएसआयने सर्वेक्षण केल्यास नमाजपठणामध्ये कोणताही अडथळा येणार नाही. यामध्ये अत्यंत आधुनिक तंत्राचा वापर करण्यात येणार असून, रडार आदी बसविण्यात येणार असून भूगर्भशास्त्रज्ञांनाही पाचारण करण्यात येणार आहे. अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीचा परिसर अतिशय मोठा होता, त्यामुळे तेथील सर्वेक्षणास ३ वर्षांचा कालावधी लागला होता. त्या तुलनेत ज्ञानवापी संकुलाचे सर्वेक्षण पूर्ण होण्यास ३ ते ६ महिने लागू शकतात, अशी माहिती हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी दिली आहे.