ईर्शाळगड दुर्घटना : मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला थरारक अनुभव!
21-Jul-2023
Total Views |
मुंबई : ईर्शाळगड दुर्घटनेत विस्थापित झालेल्या नागरिकांचे राज्य शासनाकडून पुनर्वसन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. तसेच, राज्य शासन या दुर्घटनाग्रस्तांच्या पाठीशी असून त्यांना सर्वतोपरी मदत शासनाकडून करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलताना स्पष्ट केले. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चादेखील केली. तसेच, चॉपर्सची मागणीही करण्यात आली, परंतु खराब हवामानामुळे याची मदत घेता आली नाही, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तसेच, यापुढे अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी राज्य सरकारकडून उपाययोजना केल्या जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले.
दरम्यान, ईर्शाळगडावर राहणारे काही लोक हे ५०- ६० वर्षांपासून राहत असल्याची माहिती देतानाच ईर्शाळवाडी गाव दरडग्रस्त गावांच्या यादीत नव्हते, असेही त्यांनी सांगितले. तसेच, दरड कोसळल्यानंतर रात्रीच्या वेळेस स्थानिक आ. बालदी व मंत्री गिरीश महाजन हे तेथे तात्काळ पोहोचले. त्यांनी तात्काळ मदतकार्य होण्यासाठी कार्यवाही सुरु केली. दरम्यान, ईर्शाळगडाचा कडा संपूर्ण ४७ घरांवर कोसळला. तसेच, १७-१८ घरांवर कोसळलेला मलबा हटविण्याचे कार्य सरकारी अधिकाऱ्यांनी, एनडीआरएफ यांनी सुरु केले.
दरम्यान, २० जण मृत्युमुखी पडले असून अजूनही ७ जणांना उपचार सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले. तसेच, मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांशी बोलून त्यांना धीर देण्याचे काम शासनाकडून करण्यात आले. मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ५ लाखांची शासकीय मदत जाहीर करण्यात आली. तसेच, त्यांना शासकीय मदतदेखील जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या संपूर्ण घटनेचे वर्णन विदारक असल्याचे सांगतानाच मृत्युमुखी पडलेल्यांवर त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा करुन डोंगरावरच अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, अद्याप मदतकार्य सुरु असून काहीजणांना सुखरुप बाहेर काढण्याचे काम प्रशासन यंत्रणा करत आहे, तसेच, काही लोकांचे स्थलांतर करणे हे खुप महत्त्वाचे होते, त्यामुळे गावातील शाळेमध्ये काहींना ठेवले असून उर्वरित लोकांना २ कंटेनरची सोय करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री म्हणाले, तत्काळ घरे बांधून त्यांना नवीन घरे देण्यात येणार असून सिडकोच्या माध्यमातून दरडग्रस्तांना नवी घरे देणार, असे त्यांनी विधानसभेत सांगितले. तसेच, ज्या ठिकाणी दरड कोसळण्याची संभावना आहे, ज्या लोकांना कायमस्वरुपी योग्य ठिकाणी करणार असून राज्यातील दरडप्रवण क्षेत्रातील लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.