देशातील पावसाची समस्या, ‘अल-निनो’ आणि गोविज्ञान

    21-Jul-2023
Total Views |
Article On El Nino and Geoscience Impact On the monsoon

यावर्षी पश्चिम महाराष्ट्रात ‘गोविज्ञान संशोधन संस्थे’ने हा ’पुरुषोत्तम मास’ हा गोविज्ञान विषयक जागृतीचा महिना ठरविला आहे. त्यानिमित्ताने देशातील पावसाची समस्या, ‘अल-निनो’ आणि गोविज्ञान याविषयावर प्रकाश टाकणारा हा माहितीपूर्ण लेख...

गेल्या काही वर्षांत गोविज्ञान आणि गोभक्ती, हे विषय केवळ भारतभर नव्हे, तर भारताच्या बाहेरही विस्तारले आहेत. भारताबरोबर जगातील ५० देश असे आहेत की, त्यांनी तेथील ‘गो-विकास’ कार्यक्रम हा त्यांच्या शासकीय धोरणाचा भाग बनविला आणि तो भारतीय गोवंशाच्या (जगातील लोकप्रिय नाव - झेबू ) आधारे केला आहे. मग ते देश ऑस्ट्रेलिया, चीन असोत किंवा दक्षिण आशियातील मोठमोठे देश असोत. दक्षिण अमेरिकेत अनेक देशांत भारतीय गोवंशाची संख्या तेथील लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे. दैनंदिन जीवनात गोजीवनाला स्थान देणे, हा तेथील जीवनशैलीचा भाग बनला आहे. भारतात गाय तर जीवनातील प्रत्येक पातळीवर उपयोगी पडणार्‍या बाबींची मातृभूमी आहे.

दुष्काळात तेरावा महिना आणि गोविज्ञान

विद्यमान वर्ष हे जगात कृषी आघाडीवर संकटाचे वर्ष म्हणावे लागेल. निम्म्या जगावर अतिवृष्टीचे सावट आहे, तर बर्‍याच मोठ्या भागांत अधिक तापमानाची समस्या भेडसावते आहे. वास्तविक जगभराच्या हवामानाचा विचार करणार्‍या आंतरराष्ट्रीय पातळीवरील वेधशाळांनी जगात अधिक तपमानाचे वर्ष, वादळी पावसाचे वर्ष व अकाली पावसाचे वर्ष जाहीर केले होते. भारतीय वेधशाळांनी आणि हवामान संशोधन संस्थांनी हे वर्ष ९० ते ९६ टक्के पावसाचे वर्तविले होते. जागतिक संस्थांनी आशियात ८६ टक्के पाऊस पडणार असल्याचे एक विधान जानेवारीमध्ये केले होते. त्याची प्रचिती आता येऊ लागली आहे. त्यामुळे केवळ पावसावर अवलंबून असलेली शेती खरीप आणि रब्बी या मोसमात काहीशी अडचणीत येण्याची शक्यता आहे. अलीकडील २५-३० वर्षांत, तर ५० टक्क्यांपेक्षा अधिक शेती ही रासायनिक खतांच्या शेतीवर अवलंबून दिसते. दोन पावसामध्ये मोठी अंतरे पडण्याची शक्यताही वेधशाळांनीच व्यक्त केली आहे. जेव्हा पाऊस कमी असतो, तेव्हा धरणाचा पाणीपुरवठाही काहीसा अनियमित होतो. त्यामुळे रासायनिक खते वापरुन रोख पैसा देणार्‍या (कॅशक्रॉप) शेतीही नुकसानीची होते.

वास्तविक देशात या सर्वांवर गोआधारित शेतीचे चांगले चांगले उपाय उपलब्ध आहेत आणि त्याचा उपयोगही पाच ते दहा टक्क्यांवर पोहोचला आहे. पण, भारत हा कृषिप्रधान देश असल्याने कोरडवाहू शेतीत किंवा बागायती शेतीत उत्पादन कमी होऊन चालणार नाही. असे उत्पन्न कमी येणे, हा त्या-त्या शेतकर्‍याचा तोटा, तर असतोच; पण देशाच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम होतो. अर्थात, ही काही फक्त भारताची स्थिती नाही. निम्म्यापेक्षा अधिक जगाची हीच स्थिती आहे. जगापुढे त्याचे कारण दिले जाते. ते प्रशांत महासागरात ‘अल-निनो’ हा उष्ण पाण्याचा आंतरखंडीय जलप्रवाह महासागराच्या वरच्या स्तरावर आला आहे. सुमारे तीन वर्षांनी जागा होणारा हा ‘अल-निनो’ सार्‍या जगात सध्या पावसाची भयानक चक्रीवादळे निर्माण करीत आहे. जगाच्या प्रत्येक खंडात आणि उपखंडात लोकवस्ती वाहून नेणारे महापूर येताना दिसत आहेत आणि दुसर्‍या बाजूला निम्मा मोसमी पावसाचा काळ संपला तरी पेरण्या नाहीत, अशी स्थिती.

पुरुषोत्तम मासात गोदान आणि गोविज्ञान

या वर्षी पंचांगात अधिक महिना आला आहे. त्याला ‘धोंडा महिना’ही म्हटले जाते. ‘दुष्काळात धोंडा महिना’ अशी म्हणही आहे आणि बर्‍याच वेळा ती वस्तुस्थितीही. त्या महिन्यात ‘गोदान’ करण्याची पद्धती आहे. या दोन्ही बाबींचे समीकरण असावे, असे बर्‍याच वेळा वाटते. धर्मकृत्याच्या बाबतीत हा महिना ’अधिक महिना’ किंवा ’पुरुषोत्तम मास’ मानला जातो. या महिन्यात गोसेवेच्या अनेक पद्धती सांगितल्या आहेत. गोदान करणे, गाईच्या शेणाच्या शेण्या आणि देशी गाईचे तूप या आधारे निरनिराळे यज्ञ गाईस चारा देण्याची व्यवस्था करणे किंवा काही अनुष्ठाने करणे, तसेच गोदान करणे याबाबी अधोरेखित केल्या आहेत. अर्थात, गोविज्ञानाकडे ‘गोशेती’ म्हणून बघायचे किंवा ‘गोभक्ती’ म्हणून बघायचे, हा तसा व्यापक चर्चेचा विषय. तरीही दुष्काळसदृश स्थितीत गोआधारित शेतीचे छोटे-छोटे प्रयोग झाले, तर कमी पावसाच्या काळातही शेती, ही अधिक जोमाने येईल. यावर महाराष्ट्रात देशातही प्रत्यक्ष जे प्रयोग झाले आहेत, ते समजून घेतले, तर कमी पावसाचे वर्ष, हे अधिक उत्पन्नाचे वर्ष ठरण्याची शक्यता आहे. पण, त्यासाठी संबंधित शेतकर्‍यांनी ते प्रयोग प्रत्यक्षात बघण्याची गरज आहेे. यावर्षी पश्चिम महाराष्ट्रात ‘गोविज्ञान संशोधन संस्थे’ने हा ’पुरुषोत्तम मास’ हा गोविज्ञान विषयक जागृतीचा महिना ठरविले आहे.

बर्‍याच वेळा या अधिक मासाचा संबंध ‘अल-निनो’शी आहे, असे वाटते. यावेळी ‘अल-निनो’ प्रभाव फारच मोठा आहे. भारतात निम्म्या भागात अतिवृष्टी आहे, तर निम्म्या भागात मोसमी पाऊस अतिशय मंद गतीने येत आहे. ‘अल-निनो’त प्रशांत महासागरात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढल्याने त्यायोगे निर्माण होणारा मोसमी पाऊस याचे प्रमाण आणि वेळापत्रक विस्कळीत होते. भारतीय पंचांगशास्त्रात सांगितलेले गोविज्ञानाचे महत्त्व बर्‍याचवेळा त्या ‘अल-निनो’शी जुळते. त्याचा जर विचार केला, तर गोभक्तीचे रूपांतर हे गोविज्ञानात व्हावे, असे त्या ऋषिमुनींना अपेक्षित असावे. जुन्या पंचांगात ‘धोंडा महिना’ हा समस्या महिना सांगितला आहे आणि अनेक पोथ्यांतून या महिन्यात केलेल्या गोसेवेतून समस्या निवारण होऊन प्रगतीचा काळ सुरू होतो, असेही म्हणले आहे. गेली एक हजार वर्षे ही भारतीय विज्ञानाचे आणि शास्त्रांचे ग्रंथ जाळण्यात धन्यता मानणार्‍याच्या परचक्रात गेली. अर्थात, हा फारच व्यापक विषय आहे. पण, गोविज्ञानाबाबत एक निश्चित म्हणता येईल की, देशभर संघ परिवारातील ‘गोविज्ञान अनुसंधान संस्था‘ आणि गोसेवा विभाग यांनी गेल्या २५ वर्षांत केलेले काम ओल्या आणि सुक्या दुष्काळातही नवा आत्मविश्वास देणारे आहे. त्यांनी महाराष्ट्रात अमृतपाणी आणि गोमूत्रपाणी यांचे उपयोग दिले आहेत. त्याच्या आधारे नेहमीच्या शेतीतील आणि मोठमोठ्या दुष्काळातील समस्या या अमृतपाणी व गोमूत्रपाणी यांनी सोडवल्या जाऊ शकतात.

भारतीय कृषिशास्त्रातील ज्ञानकोश ‘ऋषि-पराशर’

भारतातील अनेक प्राचीन ग्रंथांत याचे उल्लेख पदोपदी आहेत. ‘ऋषि-पराशर’ या ग्रंथात शेतीच्या समस्येच्या काळात प्रत्येक नक्षत्राचे सामर्थ्य आणि त्यातील प्रत्येक दिवस यात शेतीच्या दृष्टीने करायचे काम, याचे एवढे व्यापक वर्णन दिले आहे की, आधुनिक विज्ञानाने आश्चर्यचकित व्हावे. त्या-त्या नक्षत्रात त्या-त्या दिवशी वार्‍याची स्थिती काय असते, यावर विवेचन केले आहे. त्यातील काही वार्‍यात शेतीला पूरक असे भुंगे येतात आणि काही वार्‍यात समस्या निर्माण करणारे किडे पसरतात. अशा वेळी त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा, याचे विवेचन आहे. मूळ ग्रंथ फारच व्यापक आहे. कृषिशास्त्रात नव्याने संशोधन किंवा ‘पीएचडी‘ करणार्‍यांनी त्यात लक्ष घातले, तर त्यांना त्याचा उपयोग होईल. यानिमित्ताने भारतीय सनातन कृषी क्षेत्रातील कृषिविज्ञान आणि गोविज्ञान हे विषय प्रयोगाचे होतील.

गेल्या २५ वर्षांत ‘गोविज्ञान संशोधन संस्थेने’ व गोसेवा विभागाने प्रत्येक गावापर्यंत गोआधारित शेतीचा विषय पोहोचवला आहे. तो विषय त्यांच्या अंगी पडण्यासाठी सतत काम करावे लागते. ते काम सतत सुरू आहेही. पण, यावर्षी ते अधिक जोमाने करावे लागणार आहे. कारण, कमी पावसाच्या शक्यतेने केवळ उत्पन्न कमी येणार आहे, एवढेच नव्हे तर गेली ३०-४० वर्षे शेतकर्‍यांना रासायनिक खताची सवय लागल्याने, ही शेती अधिक नुकसानीची होण्याची शक्यता आहे. शेतात रासायनिक खते घालून जर ते पुरेसे पाणी मिळाले नाही, तर ती शेते अधिक खराब होतात. काही शेतांना धरणांचे पाणी मिळते, दुष्काळी स्थितीत तेही पुरेसे नाही.

गोविज्ञान, गोदान शहरातही शक्य

यावर्षी कमी पावसाची शक्यता लक्षात घेता, प्रत्येक शेतकर्‍याने व शहरी नागरिकानेही एक एक पाऊल पुढे येण्याची गरज आहे. ग्रामीण भागात प्रत्यक्ष शेतात जे अमृतपाणी व गोमूत्रपाणी हे प्रयोग केले जातात, ते घराच्या भोवतीचा बगीचा आणि घरातील बाल्कनीत आपण जी कुंड्यांमध्ये झाडे लावतो, त्यावरही अमृतपाणी व गोमूत्रपाणी याचा वापर केला, तर साधी बाल्कनीही प्रशस्त बाग असल्याचा आनंद मिळेल, त्याच बरोबर गोआधारित शेतीचाही एक प्रयोग होईल. त्याचे वर्ग घेण्याची व्यवस्था ‘गोविज्ञान संस्थे‘कडे आहे. पण, या सार्‍या बाबी ज्यांना शक्य नाहीत, त्यांनी ‘गोविज्ञान संस्थे‘चे काम समजावून घेऊन त्यांच्या कामाला सढळ हस्ते मदत करण्याची गरज आहे. यावर्षी गोविज्ञान हे शेतीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. पण, त्याचबरोबर देशभर ‘गोविज्ञान अनुसंधान केंद्रा‘चे जे जाळे आहे, त्याआधारे गोवैद्यक, शेणाच्या आधारे रंग, बांधकाम, पर्यावरण रक्षण हेही काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. देशातील हजारो एकल विद्यालये, वनवासी कल्याण आश्रम यांनी ते काम एक प्रमुख काम म्हणून हाती घेतले आहे, यात संघ परिवारातील संस्थाही आहेत. प्रत्येकाने त्यात सहभागी होणे, हे देशातील प्रयोगशीलता वाढविण्यासारखे आहे.

(अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक-गोविज्ञान संशोधन संस्था, पुणे. मोबाईल क्रमांक-८९९९३३८५८६, प्रा. अनिल व्यास. मोबाईल क्रमांक-८८८८८७१३१० आणि ज्येष्ठ मार्गदर्शक बापुराव कुलकर्णी. मोबाईल क्रमांक-९४२३५०८९७८ आणि ९४२३५६८९७९ (सर्व व्हॉट्सअ‍ॅप).

मोरेश्वर जोशी
९८८१७१७८५५