नेता म्हणून सत्तेवर राहण्याच्या व विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याच्या दोन परीक्षा ते यशस्वीपणे उत्तीर्ण झाले आहेत. प्रत्यक्ष सत्ता हाती नाही, पण सत्तासूत्र मात्र सांभाळायचे आहे, हा नियतीने त्यांना सोडवायला दिलेला तिसरा सर्वांत अवघड पेपर आहे. या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले की, महाराष्ट्राचे किमान पुढचे दशक त्यांचे असेल.
दहा वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष झाले. तेव्हा, नागपूरचाही नेता नसलेला हा नेता आणखी दहा वर्षांनी महाराष्ट्राच्या सत्तेच्या केंद्रस्थानी येईल, असा कोणी विचार केला असता तर त्याला वेड्यातच काढले गेले असते. एकेकाळी यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी होते. त्यांच्या राजकीय अस्तानंतर ती जागा शरद पवार यांनी घेतली. त्यानंतर काही वर्षांतच बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मंत्राने शिवसेनेत नवचेतना उत्पन्न करून महाराष्ट्राच्या राजकारणात स्वत:चे वेगळे केंद्र उभे केले. शिवसेना व शरद पवार यांच्या महाराष्ट्रातील राजकारणाच्या मर्यादा स्पष्ट होत चालल्या असल्या तरी त्यांना आव्हान देईल, असे नवे नेतृत्व निर्माण होत नव्हते.
२०१४ साली देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तेव्हाही पक्षात व बाहेरही त्यांना फारसे कोणी गांभीर्याने घेत नव्हते. कोणताही जनाधार नसलेला हा ब्राह्मण नेता मुख्यमंत्री करून आपण किती घोडचूक केली आहे, हे काही काळातच केंद्रीय नेत्यांच्या लक्षात येईल व त्यानंतर आपलाच क्रमांक लागेल, अशी वाट पाहणार्या आशाळभूत नेत्यांची संख्या कमी नव्हती. मराठा आरक्षण आंदोलनासारख्या अनेक आंदोलनांनी त्यांची कसोटी पाहिली. परंतु, स्वत:चे कर्तृत्व, मुत्सद्देगिरी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविलेला फडणवीसांच्या नेतृत्वावरचा विश्वास, यावर त्यांनी महाराष्ट्रात स्वत:चे राजकीय स्थान निर्माण केले. नियतीही त्यांच्या मागे उभी आहे, याचे संकेत तिने द्यायला सुरुवात केली होती. पण, नियती सुखासुखी कोणालाही आपला कौल देत नाही. त्याआधी त्याची सर्व बाजूने कसोटी घेते व त्यात तो नेता यशस्वी झाला, तरच आपले दान ती त्याच्या पदरी टाकते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्रजी दुसर्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असे सर्वांना वाटत असताना, नियतीने त्यांची परीक्षा पाहणारा एक खेळ खेळला.
भाजपला आपल्या बळावर सरकार बनवता येणे शक्य नाही, हे लक्षात आल्यावर महाराष्ट्रातील ज्या दोन शक्तींना, शिवसेना व शरद पवार यांना फडणवीसांनी संदर्भहीन केले होते, त्या दोन्ही शक्ती त्यांच्या विरोधात एकत्र आल्या. त्यांचा विरोध भाजपला नव्हता, तर देवेंद्र यांच्या नेतृत्वाला होता. देवेंद्र नेतृत्वस्थानी नसलेल्या भाजपला आपण कसेही हाताळू शकतो, याची त्यांना खात्री होती. देवेंद्रजींच्या पक्षातील व पक्षाबाहेरील विरोधकांना नियतीने एक संधी निर्माण करून दिली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचा द्वेष याचं एकमेव मुद्द्यावर ही आघाडी उभी होती. पण, अशा परिस्थितीतही ते ज्याला खलनायक बनवू पाहत होते, तोच नायक बनला होता. एक विरोधी पक्ष नेता म्हणून आपण किती प्रभावी काम करू शकतो, हे त्यांनी सिद्ध केले. त्यानंतर आपण जसा यशस्वी राज्यकारभार करू शकतो, विरोधी पक्ष नेतेपद सांभाळू शकतो, तसेच विश्वासघाताला तशाच भाषेत उत्तर देणारे राजकारणही करू शकतो, हे त्यांनी सिद्ध केले. ते करीत असतानाही आत्यंतिक कसोटीच्या प्रसंगी एखादा नेता किती परिपक्व व धीरोदात्त राजकारण करू शकतो, याचा त्यांनी प्रत्यय दिला.
आज महाराष्ट्राचे राजकारण एका निर्णायक वळणावर उभे आहे व ते या वळणावर आणायला देवेंद्रजीच कारणीभूत आहेत. देव आणि दानवांनी अमृत मिळविण्याकरिता समुद्रमंथन केले. या समुद्रमंथनातून प्रथम विष बाहेर आले व ते पचवावे लागले. महाराष्ट्राचे राजकारण आज असे घुसळून निघत आहे व त्यातूनही अनेक प्रकारचे हलाहल बाहेर पडत आहे. हे विष देवेंद्रजी कसे पचवितात, हे पाहणे ही नियतीची तिसरी परीक्षा आहे. नेता म्हणून सत्तेवर राहण्याच्या व विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याच्या दोन परीक्षा ते यशस्वीपणे उत्तीर्ण झाले आहेत. प्रत्यक्ष सत्ता हाती नाही, पण सत्तासूत्र मात्र सांभाळायचे आहे, हा नियतीने त्यांना सोडवायला दिलेला तिसरा सर्वांत अवघड पेपर आहे. या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले की, महाराष्ट्राचे किमान पुढचे दशक त्यांचे असेल. त्यांच्या कल्पनेतला महाराष्ट्र घडवायला त्यांना संधी मिळेल. त्यांचे नेतृत्व आणि महाराष्ट्राचे राजकारण अत्यंत कसोटीच्या कालखंडातून जात आहे. देवेंद्र नव्या राजकीय संधी निर्माण करीत असताना, त्यांचे विरोधकही त्यांना पराभूत करण्याच्या संधी शोधत आहेत. या तिसर्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले व ते तसे होतीलही, असे मागच्या अनुभवावरून दिसते. तसे झाले तर अवघ्या महाराष्ट्राचे व्यासपीठ त्यांच्या कर्तृत्वाला खुले होईल. हे घडावे, यासाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!
दिलीप करंबेळकर