देवेंद्र फडणवीस एक सच्चा महाराष्ट्रसेवक

    21-Jul-2023
Total Views |
Article On Deputy CM Devendra Fadnavis Written By Anupam Kher

देवेंद्रजी हे गेल्या ४५ वर्षांत आपला कार्यकाळ पूर्ण करणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ठरले. त्यामुळेच देशभरात यशस्वी प्रशासक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. देवेंद्रजी म्हणजे एक राजकीय रणनीतीकार, ज्याने आपल्या रणनीतीच्या जोरावर आपल्या विरोधकांना मैदानाबाहेर फेकले. देवेंद्रजी म्हणजे एक उत्कृष्ट वक्ता, जो आपल्या बुद्धिमत्तेने आणि अभ्यासूवृत्तीच्या जोरावर विरोधकांना कायमच पुरून उरतो आणि याहीपलीकडे एक असा कार्यकर्ता, जो ‘राष्ट्र प्रथम’, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वत: याच तत्वानुसार अव्याहतपणे वाटचाल करतो आहे.

विशेषकरून गेल्या तीन वर्षांत देवेंद्रजींनी पक्षासाठी आपली राजकीय कारकिर्द पणाला लावली. वैयक्तिक हिताचा विचार न करता, राज्याच्या हितासाठी देवेंद्रजींनी निष्ठापूर्वक आपल्या वरिष्ठांचा निर्णय शिरसावंद्य मानला. पक्षनिष्ठा काय असते, हेच देवेंद्रजींनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. देवेंद्र फडणवीस हे प्रत्येक कार्यकर्त्याचे प्रेरणास्थान असल्याचे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच म्हटले होते.

मी नुकतीच देवेंद्रजींची एक मुलाखत ऐकली होती. मुलाखतकाराने त्यांना विचारले होते की, पंतप्रधान मोदींनी ‘देशात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र’ म्हटले होते, मग तेच देवेंद्र उपमुख्यमंत्री पदी समाधानी आहेत का? त्यावर देवेंद्रजी म्हणाले होते, “मी आधी मुख्यमंत्री का झालो? कारण, भाजपने ती संधी मला दिली. देवेंद्रचे अस्तित्व केवळ भाजपमुळेच आहे. भाजपशिवाय देवेंद्रचे अस्तित्व नाही. माझा पक्ष जे म्हणेल, ते मी करेन.” असे हे देवेंद्र फडणवीस ट्विटरवरही आपली ओळख सांगताना ‘महाराष्ट्र सेवक’ असं लिहितात. त्यांच्या कृतीतूनही तेच दिसून येते.

मी माझ्या आयुष्यातील सर्वाधिक काळ मुंबईत वास्तव्य केले आहे. मला पूर्ण कल्पना आहे की, मुंबईकरांना त्यांचा प्रवास सुलभ करणार्‍या लोकल गाड्यांच्या पर्यायाची गरज होती. त्यासाठीचा आराखडा तयार करण्यासाठी आम्हाला बरीच वर्षे लागली आणि ती योजना म्हणजेच मुंबई मेट्रो. मुंबई मेट्रोला अनेक राजकीय कारणांमुळे पूर्ण होण्यास बरीच वर्षे लागली. मी वाचले होते की, देवेंद्रजी मेट्रोच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी मध्यरात्री भेट देत. मुंबई मेट्रोसाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत अनेक कायदेशीर लढाया लढल्या. त्यांच्या या वचनबद्धतेचा परिणाम असा झाला की, आज मुंबईतील काही मार्गांवर मेट्रो धावते आणि भविष्यात इतरही सध्या काम चालू असलेले मेट्रो मार्ग मुंबईकरांच्या सेवेत लवकरच दाखल होतील.

एकीकडे महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करताना दिसतो, तर दुसरीकडे महाराष्ट्राचा काही भाग आजही पाणीटंचाईच्या समस्येचा सामना करताना दिसतो. यामुळेच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींनी आपल्या कार्यकाळात ‘जलयुक्त शिवार’, ‘आपले सरकार’, मेट्रो प्रकल्प, ‘सीएम वॉर-रूम’ आणि ‘समृद्धी महामार्ग’असे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवून महाराष्ट्राच्या विकासाला चालना दिली. (अनुवाद : श्रेयश खरात)

अनुपम खेर